‘…आणि चोरकप्प्यात सापडला, आठवणीतील बहुमूल्य खजिना’; सविता पाटील ठाकरे
‘…आणि चोरकप्प्यात सापडला, आठवणीतील बहुमूल्य खजिना’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्ययत्न स्पर्धेचे परीक्षण
तुला परवा पाहिलं मी.! केवढा बदललास तू? अर्थात काळही मोठा गेला. तब्बल ५२ वर्षे झालेत. डोळ्यावर चष्मा, केस गळलेत तुझे…अरे ! खरच पाहिले तुला. नातवासोबत खेळत होतास बगीच्यात आणि काय रे कधीही न हरणारा तू मात्र, तुझा नातू तुला हरवत होता. तुझ्या चेहऱ्यावरचे ते श्रीमंतीचं तेज जरा कमी झालेलं वाटलं मला, पण तुझा तो करारीपणा मात्र आजही जसाच्या तसा आहे. नाही का लक्षात आले तुला? मी कोण?
अरे….मी मोहिनी. मनोज, तुझ्या प्रेमात आकंठ बुडालेली तुझी लाडकी मोहिनी. गेल्या ५२ वर्षात सर्व काही जपून ठेवलंय मी. होय आजही तुझं ते पहिलं प्रेम पत्र ठेवलंय मी चोरकप्प्यात कायमचे जपून. किती प्रेम करायचो आपण. मान्य आहे मला तो काळ नसेल आंतरजातीय विवाह करण्याचा. पण मग माझी काय चूक यात? सतत माझ्यामागे असायचा तू. माझं काय चुकलंय. सांगतोस का एकदा तरी?
मला आपण एकत्र घेतलेल्या आणाभाका,शेवटपर्यंत साथ देण्याची वचनं. सारं आहे रे माझ्या मनात. एका खास चोरकप्प्यात मी जपलय सर्व. “काही कटू आठवणी आठवू नये असं वाटतं. कडवट आठवणींच्या सरींनी दुःखाचं तळ साठतं.” अकस्मितपणे आज तू दिसलास आणि नकळत मीही भूतकाळात शिरली. तुला माफ तर मी तेव्हाच केलेले. माझं?..माझं नको विचारूस. तुझ्या अकस्मित लग्नानं मी पूर्णतः उध्वस्त झाली होती तेव्हा…अर्थात आजही मी उन्मळून पडलेलीच आहे. उन्मळलेल्या झाडाला कधी पालवी पाहिलीस का तू? तसं माझं आहे, मरायचं नाही म्हणून जगण्यासाठी ती पालवीच माझा आधार आहे.खूप विचारांती मी दूर राहिली तुझ्यापासून. तुझं घराणं, मोठं नाव, समाजाची भीती त्यामुळे नाही आली रे मी पुन्हा तुझ्या रस्त्यात. पण ना.. चोरकप्प्यात सापडला, आठवणीतील आणि माझ्या प्रेमाचा बहुमूल्य खजिना.
मी स्वतः आहुती दिली माझ्या जीवनाची. जाऊ दे ना. नातू मात्र मस्त आहे हं तुझा. माझं?? काय मला काय विचारतोस
माझ्या परिवाराबद्दल? माझा परिवार असायला मी लग्न तर करायला हवं ना. नाहीच केलं मी लग्न. आज मी कुमारी मोहिनी आणि मनाने मोहिनी मनोज. हीच आठवण चोरकप्प्यात ठेवून जगते. अशीच जगेन आणि कदाचित अशीच मरेनही. ‘चोरकप्पा’ गुपित ठेवण्याची हक्काची जागा, अमूल्य खजिना जिथून कोणी नेऊ शकत नाही असं स्थान. होय असू शकतं ना अदृश्य रूप चोरकप्प्याचे. जसं मनाच्या चोरकप्प्यात असतात अनेक चांगल्या वाईट आठवणी. ‘हे मनाचे चोर कप्पे अगदी खुले नसतात; पण चोर कप्प्यातल्या गोष्टी जर आपण कुठेतरी व्यक्त झालो तर निदान ते किलकिले तरी होतात.’
मराठी सारस्वत रसिकांनो आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘चोरकप्पा’ हा आगळा वेगळा विषय दिला. अन् नेहमीप्रमाणेच कवी कवयित्रींच्या लेखणीला बहर आला अनेकाविध रचनांनी समूह सुंदर सजला. कुणी मनाचा चोर कप्पा उघडला, तर कोणी वस्तू ठेवण्यासाठी असलेल्या चोर कप्प्याला न्याय दिला. कुणी काळजातला चोरकप्पा अचूक हेरला तर, कुणी खेळाच्या वस्तू लपून ठेवण्यासाठीचा चोरकप्पा काव्यात गुंतला. असो, सर्वांनी विषयाला आपापल्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.
सौ.सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह



