किल्ले सुधागड/भोरपगड
सौ. स्वाती मराडे-आटोळे
किल्ले सुधागड/भोरपगड
‘सुधागड’ म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. हा एक डोंगरी किल्ला आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत. हे पुण्याच्या पश्चिमेस सुमारे ५३ किलोमीटरवर आहे. लोणावळ्याच्या दक्षिणेस आणि रायगड जिल्ह्यातील पालीपासून पूर्वेस समुद्रसपाटीपासून सुमारे ६०० मीटर उंचीवर आहे. किल्ल्याभोवतीचा संपूर्ण परिसर सुधागड वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. या किल्ल्याची निर्मिती इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.
जवळच २२०० वर्षांपूर्वीची ठाणाळे लेणी आणि खडसांबळे लेणी आहेत. किल्ल्यावरील प्रमुख देवता भोराईदेवी यावरून भोरपगड असे म्हटले जाते. १४३६ मध्ये बहामनी सुलतानाने गड ताब्यात घेतला. १६५७ मध्ये मराठ्यांनी ताब्यात घेऊन त्याचे नाव बदलून “सुधागड” असे ठेवले. गडावर तीन दरवाजे आहेत. पाच्छापूर दरवाजा या दरवाज्यातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर माणूस एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर ,तसेच धान्याची कोठारे, भाडांचे टाके, हवालदार तळे व हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते. वाडापासून आपण पायऱ्यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट हत्तीपागांमधून जाऊन, सरळ एका टोकावर पोहचते.
रायगडावरील ‘टकमक’ टोकासारखेच हे टोक आहे. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड , कोरीगड, तैलाबैला हे किल्ले स्पष्ट दिसतात. तसेच अंबा नदी व नदीच्या आजुबाजूची गावे व परिसर दिसतो. सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट महादरवाज्यात आणून सोडते. महादरवाजाच्या आधी २ दरवाजे लागतात. पहिल्या दरवाजा चढून आल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे टाकं आहे. महादरवाजा हा रायगडावरील ‘महादरवाजा’ची हुबेहूब प्रतिकृती आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. गडावर वाड्याच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत. त्यावर सुबक नक्षीकाम आहे.
सुधागड हे ट्रेकिंगचे लोकप्रिय ठिकाण आहे. कारण हा महाराष्ट्रातील एक उत्तम जतन केलेला किल्ला आहे. गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी साधारण १-२ तास लागतात.ठाकूरवाडी गावातून ट्रेकिंगचा मार्ग सर्वात लोकप्रिय आणि नियमितपणे वापरला जातो. वाटेत पाण्याची टाकी नाहीत. गडावर रात्रीचा मुक्काम कोणत्याही ऋतूत पंतसचीवांचा वाडा आणि भोराई माता मंदिर येथे करता येतो. गडावर पाण्याची दोन तळी आहेत. गडाच्या उतारावर पंढरीची झाडे आहेत. ज्याचा वापर लोकप्रिय चालण्याची काठी बनवण्यासाठी केला जातो.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध
========



