Breaking
परीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

आपले ‘गुरुजी’

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर ता उमरगा जिल्हा धाराशिव.

0 4 8 2 8 4

आपले ‘गुरुजी’

गुणवत्ता पूर्वक रुपवान जीवन घडवणारे गुरुजी. साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्‍यावर टोपी. नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन. अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची. “कसे आहात गुरुजी?’ वगैरे घरातील मंडळी कशी आहे. आई वडील कसे आहेत असे विचारायचे. पोरं गुरुजींना पाहून धूम पळायची. विटी-दांडू, गोट्या, दगड घडवून गोट्या तयार करून खेळायच, रपाधपीचा कापडी चेंडू, आंब्याच्या कोयी, चिंचूके, लाकडी गाडी गाडी करत फिरवले जात असलेले सायकलीचे जुने टायर, रिंग, काडीपेटी एकत्र करून बस तयार करून खेळायच,अशा खेळांच्या साऱ्या जिनसा जागीच सोडून गुरुजींना बघून पळायचं!

त्या वेळी मला शिकवाचे कांबळे गुरुजी, जोशी गुरुजी, कदम गुरुजी, सुतार गुरुजी, मोरखंडीकर गुरुजी कदेरे गुरुजी. सातवी पास होते. पण, एवढं मन लावून शिकवायचे. 1970 च्या अगोदर सातवी किंवा दहावी पास झाले की, गुरुजी म्हणून नोकरी लागायची. काही शिक्षक तर म्हणावं अशा खेड्यात जाऊन शाळा सुरू करायचे. गुरुजींची उपजीविका गावावर अवलंबून असायची. कारण गावातील लोक घरातील दुध,दही आणि ताक सुध्दा शाळेत नेऊन शिक्षकांना देत होती. नंतर जेमतेम पगार सुरू झाला. खर्च असा नव्हताच. अगदी गावात असलेला एखादा मोकळा वाडाही गुरुजींना मोकळ्या मनानं उघडून दिला जायचा.

सांज-सकाळी कुणाच्याही मळ्यातून हिरव्या पालेभाज्या यायच्या. गुरुजींच्या घराचा कोपरा कडधान्यांनी भरून जायचा. गुरुजी ग्रामव्यवस्थेचे अविभाज्य घटक असायचे. कुणाच्या घरी पत्र आलं,की त्या घराला गुरुजींची आठवण व्हायची. पोरगं विजार सावरत पळायचं आणि गुरुजींना घेऊन यायचं. तोपर्यंत घरातला बाप्या अंगणात वाकळ टाकायचा. चुलीत तुराट्या घालून चहाचं आधण ठेवायची. गुरुजी येऊन पत्र वाचायचे. गंगाळभर चहा समोर यायचा. मग, अंधार पडेपर्यंत शिवारगप्पा सुरू व्हायच्या. त्यातच जेवणाची वेळ व्हायची. गुरुजी उठू लागल्यावर बाप्याचा आग्रह सुरू व्हायचा. कारभारीण दाराच्या आतून पदर सावरत आदरानं म्हणायची : “आता दोन घास खाऊनच जावा की गुरुजी!’ ते ‘नको नको’ म्हणत असतानाच काठवटीत भाकरीची थपथप सुरू व्हायची आणि त्याच तव्यावर हिरव्या मिरच्या भाजून कंदिलाच्या मंद प्रकाशात.

गावात मुलीला पाहायला पाहुणे येण्यापासून तिचं लग्न लागेपर्यंत गुरुजींची महत्त्वाची भूमिका असायची. दुखणं-पाखणं, अंत्यविधी, सणवार, प्रवचनं-कीर्तनं अशा प्रत्येक ठिकाणी सूत्रं गुरुजींकडंच असायची. त्या काळी शाळा ही देवळात, एखाद्या मोकळ्या घरात, नाहीतर झाडाखाली भरायची. खोडाला खिळा ठोकून त्याला लाकडी फळा लटकवला जायचा. फळ्यावर पुसट उमटलेली अक्षरं विद्यार्थ्यांच्या मनावर मात्र गडदपणे उमटायची. गावभर पाढ्यांचा, बाराखडीचा आवाज घुमायचा.नावाची- आडनावाची अशीच बोंब असायची. शिंपी, लोहार, सुतार, कुंभार असे व्यवसाय असतील तर तेच आडनाव हजेरीवर लावलं जायचं. आईनं पोराचं नाव दगड्या सांगितलं तर ते तसंच लिहावं लागायचं. लिहिताना गुरुजींनी “दगड्या’चा उच्चार “दगडू’ असा केला तर त्याची आई म्हणायची : “दगड्याच लिवा. दगडू म्हणल्यावर त्यो भोकाड वाशितो’!

शाळेची घंटा म्हणजे रुळाचा तुटलेला तुकडा असायचा. घणघण असा ओळखीचा आवाज गावभर घुमायचा.वर्गात फरशी नसायची. साधी जमीन. आठवड्यातून एक दिवस वर्ग शेणानं सारवावा लागायचा. गुरुजींचा आदेश आल्यावर आम्ही विद्यार्थी शेण गोळा करायला निघायचो. नदीवरून बादल्या भरून आणण्याचं काम थोराड शरीराच्या मुलांकडं असायचं. तोपर्यंत मुली परकरांचे ओचे-कोचे खोवून सारवण्याच्या तयारीत वर्गाच्या चारही कोपऱ्यांत बसलेल्या असायच्या. एकंदर वर्ग सारवून घेणं हा आमच्यासाठी सोहळाच असायचा.

शाळा सुरू असताना काही पोरं गायब झाल्यावर ती पोरं कुठं गेली असतील ते गुरुजी अचूक ओळखायचे. शर्ट-विजार ओली असेल तर मासे धरायला ओढ्याला. करदोरा ओला असेल तर मुलगा नदीवर पोहून आलेला. हाता-पायांवर ओरखडे असतील तर बोरीच्या झाडावर चढून बोरं खाऊन आलेला. तोतरं बोलला तर बिबीची फुलं खाऊन आलेला. हाता-पायांवर मोठाल्या लाल रेषा असतील तर, कुणाच्या तरी शेतात शिरून ऊस तोडून खाऊन आलेला. जीभ लालसर जांभळी असेल तर जांभळं खाऊन आलेला. बोटात बारीक काटे असतील तर सबरीची बोंडं खाऊन आलेला. तोंडाभोवती चिकटपणा असेल तर गुऱ्हाळात जाऊन गूळ खाऊन आलेला, हाता-पायांवर पांढुरका चिकटा असेल तर कुणाच्या तरी शेतात जाऊन हरभरा खाऊन आलेला. अशा निरनिराळ्या खुणांवरून गुरुजी विद्यार्थ्यांची चोरी नेमकी पकडायचे. गुरुजींनी बरोबर कसं ओळखलं म्हणून त्या वयात आम्हा विद्यार्थ्यांना अतोनात आश्‍चर्य वाटे. शाळा अशा मजेत चालायच्या! आम्हाला खाकी चड्डी आणि पांढरा सदरा असायचा. अनेकांच्या चड्डीच्या मागच्या बाजूला कमी-जास्त मोठी असलेली आयताकृती ठिगळं असायची. सदऱ्याचा पुढचा भाग फाटलेला म्हणून ते फाटलेलं झाकण्यासाठी पुढून शर्टिंग आणि मागचं चड्डीचं ठिगळ झाकण्यासाठी. असं चित्र आता दिसेनासं झालय हेच खरं.,!

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव.
=============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे