किल्ले : सज्जनगड
समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला. सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर ‘उरमोडी’ उर्फ ‘उर्वशी’ नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे. पश्चिमेस खेड – चिपळूण, उत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, दक्षिणेकडे कळंब, ईशान्येस सातारा शहर व अजिंक्यतारा आहे. प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे या किल्ल्याला ‘आश्वलायनगड’ असे नाव होते.
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गड चढण्यासाठी पायऱ्या आहेत. अर्ध्या वाटेवर समर्थशिष्य कल्याण स्वामी यांचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर आहे. किल्ल्याचा दरवाजात श्रीधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे. अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात रामादासांना रामाची मूर्ती व अंगलाईची मूर्ती सापडली होती. अंगलाई मंदिर समर्थांनी बांधले. शके १६०३ माघ नवमी (सन १६८२) रोजी रामदासांनी समाधी घेतली. म्हणून या तिथीला दासनवमी म्हणतात. समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले.
राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे. मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत. जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे. भुयारात समर्थांचे समाधिस्थान आहे. समाधीमागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रयाच्या पादुका आहेत. मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे. दुसऱ्या कोपऱ्यात समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन आहे. मंदिरापुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या आक्काबाई हिचे वृंदावन आहे. गडावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला ‘छत्रपती शिवाजी महाराजद्वार’ असे म्हणतात. हे द्वार आग्नेय दिशेस आहे. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला ‘समर्थद्वार’ म्हणतात.
‘आजही हे दरवाजे रात्री नऊ नंतर बंद होतात’. दुसऱ्या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो. ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या आधी एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे वळावे. समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. त्याच्या मागच्या बाजूस एक मशीदवजा इमारत आहे. सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे. कुस गावापासून जवळच मोरघळ नावाची गुहा प्रेक्षणीय आहे.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध
=========



