‘पाऊले’ चालती पंढरीची वाट….!!
प्रशांत दत्तात्रय ठाकरे माध्यमिक शिक्षक, दादरा नगर हवेली.
‘पाऊले’ चालती पंढरीची वाट….!!
सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल विठ्ठल हा वारकऱ्यांचा जयघोष सुरू आहे, अर्थात पंढरीची वारी चालू आहे. तमाम भक्तगण आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेले आहेत. या वारीत जीवाची भेट शिवा सोबत होते व जीवन सफल होते त्या अनुषंगाने न थांबता न थकता सर्वांची पाऊले पंढरपूरच्या दिशेने पुढे जात आहेत. ‘पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते.
वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय! असा जयघोष केला जातो. वारी करणाऱ्या व्यक्तीस ‘वारकरी’ म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे, विठ्ठलाचे हे भक्त असतात.आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असतात. ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. ह्या माळेचा जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय, ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो.
आवडे देवासी तो ऐका प्रकार ।। नामाचा उच्चार रात्रंदिवस ।।१।।
तुळशीमाळ गळा गोपीचंद टिळा ।। ह्रदयी कळवळा वैष्णवांचा ।।२।।
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ।। साधन निर्धारी आण नाही ।।३।।
एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम ।। तो देवा परम पुज्य जगी ।।४।
यातून वारकऱ्यांचा भक्तीभाव प्रकट होतो. ७०० वर्षापेक्षा जास्त काळाची परंपरा असलेली ही वारी म्हणजे महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायाचा महाकळसच आहे. या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे चैतन्यसोबत शिस्त, वेळ, नियम यांचं कसोशीने केलेलं पालन होय. एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंटलाही लाजवेल असे नियोजन करताना प्रत्येक वारकरी स्वयंशिस्तीवरच भर देतो. इथे कुणी ना मोठा असतो ना कोणी लहान….सर्वांसोबत एकत्र राहणं, एकत्र चालणे, एकत्रच खाणं पिणं, खेळणं, रिंगण, फुगडी यातून जीवनाचे सार सापडतं. “हीच वारी मानवी जीवनाला अज्ञाताकडून ज्ञाताकडे, अविवेकाकडून विवेकाकडे, अविचाराकडून सुविचाराकडे नेण्याचे पुण्य कर्म करत असते”.
प्रत्येक वारकरीच नव्हे तर, मराठी मनाला या वारीचा अनुभव याची देही याची डोळा घ्यावा ही आस असते. पंढरपूर नगरात तल्लीनता मनी लाभते सत्कर्म आपोआप घडतात. एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, असे आग्रहाने वडीलधारी मंडळी आवर्जून सांगतात.आषाढी एकादशीला पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस भरभराटीची,सुखांची,आनंदाची, चैतन्याची वारी म्हणतात. शेतकरी आपल्या शेतात पेरणी आटपून वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत डोलदार वाढावं ही मनोमन कामना पांडुरंग चरणी करतात. यातून सुखसमृध्दी यावी, घर धनधान्याने भरून निघावे हेच शेतकरी चिंतन मनन करतो.
त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची देवाणघेवाण आपल्या माणसाची जपणूक, साठवण करतो तीची शिदोरी गाठीला बांधून सदभाव व्यवहारात आणतो.
वारी म्हणजे नैतिकता. आजच्या स्वार्थी युगात जर खऱ्या अर्थाने नैतिकतेचे पाठ शिकायचे असतील, तर वारीसारखी दुसरी पाठशाळा कुठेच सापडणार नाही. सर्वांना सामावून घेणारी प्रत्येकाला आपलं करणारी ही वारी नरहरी सोनार, गोरा कुंभार, चोखामेळा, संत मुक्ताबाई, जनाबाई कान्होपात्रा या संत शिष्टांनी दाखवलेल्या मार्गावर अव्याहतपणे सुरूच आहे.
पांढरे कपडे, डोक्यावर टोपी आणि साठ वर्षांपुढील वय तोच केवळ वारकरी. ही संकल्पना गेल्या अनेक वर्षापासून वारीने मोडून काढली आहे. लहान मुलांपासून तर आबाल वृद्धांपर्यंत सर्वांचा वारीमध्ये समावेश होतो. या वारीची अनुभूती भारत देशातीलच नव्हे तर परदेशातील ही अनेक लोक घेत आहेत. ही खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची मोठी प्राप्ती आहे. स्वार्थ आणि प्रपंच या सर्वांच्या पलीकडेही विठ्ठलाची भक्ती महत्त्वाची आहे, हा विचार मनात ठेवून अनेक वारकरी नियमितपणे न चुकता दरवर्षी वारीसाठी निघत असतात. विठ्ठलाच्या कृपेने मिळालेल्या या मानवी जन्माचं सार्थक करण्यासाठी आयुष्यातून एक तरी वारी अनुभवावी संकल्प करूया..!
प्रशांत दत्तात्रय ठाकरे
माध्यमिक शिक्षक, दादरा नगर हवेली.



