‘अंगभूत क्षमता नकोय बंदिस्त, हवीय मुक्त बिंधास्त’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय 'हायकू काव्य' स्पर्धेचे परीक्षण
‘अंगभूत क्षमता नकोय बंदिस्त, हवीय मुक्त बिंधास्त’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेचे परीक्षण
कधी गर्भात, कधी अंड्यात, एका इवल्या जीवाला हक्काचा कोष लाभतो. नाजूकशा ह्रदय स्पंदनात दिसामासाने होश येतो. कोमलशा अवयवांत हळूहळू जोश येतो. मन मेंदूत विचारांचा हलकासा प्रवेश होतो. तेव्हा स्वअस्तित्वाचा, रोमरोमात जल्लोष होतो. मात्र हे किती छोटेसे जग आहे? जिथे नीट हलताही येत नाही. या जाणीवेने थोडासा अस्वस्थ होतो. … आणि एक दिवस गर्भमार्ग मोकळा होतो. अंड्यावर चोचीचा प्रहार होतो. आतून जीव बाहेर येतो. मग मात्र त्याला वाटते. हे जग त्या जगापेक्षा मोठे आहे. इथे अजून कुणीतरी आहे. कुणीतरी मला भरवतेय चारा. मग पुन्हा एक दिवस, तो सोडून निवारा, बाहेर झेपावतो हळूच ओलांडून घरट्याचा उंबरा. त्याला जाणवते, माझ्या अंगाला लागतोय वारा. माझ्या पंखांचा फुलतोय पिसारा. जाणवतोय मला भोवताली पसारा. हे जग तर वेगळेच आहे.
हिरव्यागार पानांचा, आजूबाजूला डोलारा, दूर काहीतरी निळसर दिसतेय, माझ्या मनाला खुणावतेय, कुतुहल जागे होतेय, आणि पंख फडकावत ते पिल्लू भरारी घेतेय. नजर त्याची विस्फारतेय, आरे हे जग तर विस्तारतेय. कुठे मला घेऊन जातेय? इथे कोण कोण भेटतय? किती दूर दूर जातेय? कल्पनाही अपूरी पडतेय. अनाकलनीय कांहीतरी घडतेय. आणि त्याला समज येते की. हेच खरे जग आहे.! भोवती विशाल नभ आहे. अमर्याद महासागर आहे, धरती आहे पर्वत आहे. डोंगर दर्या शिखर आहे. नद्या नाले पठार आहे. मला हे सारे कवेत घ्यायचे आहे.! होय.. मला हे सारे जिंकायचे आहे.!!
आणि चालू होते “त्या” जीवाची अविरत धडपड. वादळवारा अंगावर घेत. हर संकटांना तोंड देत. रोज नवे लक्ष्य नवे ध्येय, करीत राहतो पादाक्रांत, अविचल अविश्रांत. याच प्रवासात होवू लागतात काही घात अपघात, मनभेद मतभेद आपापसात, ईर्षा असूया मनात, याच्यातील अफाट क्षमतांना कुणी लावू पाहते लगाम, छाटू पाहतेय पंख. मारू पाहतेय अस्मितेवर डंख. ठोकू पाहतेय पायात साखळदंड, आणि जखडू पाहतात देहास दोरखंड….!
काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरिता समूह प्रमुख आ. राहुल दादांनी एका पक्ष्याला दोरीने बांधलेले चित्र दिले आहे. ज्याचा अर्थ असा होतो की, प्रचंड क्षमता. योग्यता असूनही एखाद्याला कोणतीतरी बाह्य शक्ती जखडून टाकते. तिच्या गरूडझेपेला लगाम लावते. तिची प्रगती रोखते. आपल्या अवतीभवती अशाच काही शक्ती आहेत ज्या आपला मार्ग रोखू इच्छितात. असंख्य अडथळे आपल्या मार्गात उभे करतात. आपला आवाज दाबतात. आणि आपण चैतन्यहिन होवून अवसान ढाळून त्या पक्ष्याप्रमाणे पडून राहतो. मात्र वेळीच सावध होत जळकुट्या मानवी विकृती विरूद्ध दंड थोपटून बंड करावे लागते. आपले पंख छाटू पाहणार्या विकृतीला डंख मारण्यास आत्मबल जागृत करावे लागते . आणि दलदलीतून कमळाप्रमाणे फुलून निघावे लागते. अपमान, अपयशाचे हलाहल पचवून. मानाने ताठ उभा रहावे लागते.
प्रस्तुत चित्र पाहता यातला लुप्त क्षण पकडून प्रेरणादायी हायकू निर्मिती होवू शकते. मानवी मानसिकतेच्या दुष्ट छटा व्यक्त होऊ शकतात. तशाच आत्मशक्ती जागृत करणार्या छटा सुद्धा दाखवता येऊ शकतात. एकंदरीत अतिशय समर्पक रचनांती पेशकश अनेकांनी केली आहे. मला परिक्षणाच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनःपूर्वक आभार.
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक/लेखक/ कवी
©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह



