1 मे महाराष्ट्र दिन
कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, नागपूर

1 मे महाराष्ट्र दिन
“सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, ‘महाराष्ट्र माझा’ “
दिनांक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यामुळे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपला महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी निर्माण झाला. या महाराष्ट्रात हिंदवी राज्याचे संस्थापक व महान यौध्दा छत्रपती शिवाजी महाराज, दलितांचे कैवारी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी अनेक रत्ने या मातीत जन्माला आली. राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार भाषांच्या आधारे भारतातील राज्यासाठी सीमा परिभाषित केल्या गेल्या. या कायद्याचा परिणाम म्हणजेच मुंबई राज्य निर्माण झाले. ते मात्र कच्ची व गुजराती आणि मराठी व कोकणी बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्राचे मिळून बनले होते. संयुक्त महाराष्ट्र समिती, मुंबई राज्याने दोन राज्यात विभाजन करण्याच्या चळवळीत आघाडीवर होती. एक भाग जेथे गुजराती व कोकणी बोलतात आणि दुसरा भाग जिथे प्रामुख्याने मराठी व कोकणी बोलतात.
दिनांक 25एप्रिल1960 रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या ‘बाॅम्बे पुनर्रचना कायदा 1960’ नुसार या चळवळीचा परिणाम म्हणून गुजरात व महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाली. हा कायदा 1 मे 1960 रोजी लागू झाला. यापूर्वी 21 नोव्हेंबर 1950 रोजी फ्लोरो फाऊंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. त्यामुळे मराठी माणसे चिडली. एका बाजूने चर्चगेट तर दुसर्या बाजूने बोरीबंदरकडून जनता आंदोलन घोषणा करीत फ्लोरो फाऊंटनकडे जमली. पोलीस ताकद लावून मोर्चावर लाठीचार्ज करण्यात आले. पोलीसाचे प्रयत्न अयशस्वी ठरले. या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झालेत.
या बलिदानातूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्या जागी 1965 ला हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. तसेच 12 तासावरून कामाचे 8 तास करण्यात यावेत. भारताने आपला पहिला कामगार दिन 1 मे 1923 रोजी मद्रास आताचे चेन्नई येथे साजरा केला. यात काॅम्रेड सिंगारवेलू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ‘हिंदुस्थान मजूर किसान पक्षाची’ स्थापना केली होती. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांचा आर्थिक, शारीरिक, मानसिक विचार करून कामाचे 8 तास कायद्यात बसवून घेतलेत.
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
==========



