Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनवी दिल्लीनागपूरविदर्भ

काव्या मारन आणि दि हंड्रेड लीग वाद; डॅा अनिल पावशेकर ✍️

ज्येष्ठ क्रीडा समीक्षक व स्तंभलेखक

0 5 1 7 5 8

काव्या मारन आणि दि हंड्रेड लीग वाद; डॅा अनिल पावशेकर ✍️

ज्येष्ठ क्रीडा समीक्षक व स्तंभलेखक

बिनधास्त न्यूज मिडीया

हैदराबाद सनराईझर्सच्या सर्वेसर्वा आणि को ओनर असलेल्या ३३ वर्षीय काव्या मारन सध्या वादाच्या भोवर्यात सापडल्या असून भारतीय जनता आणि क्रिकेट प्रेमींच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. देशाची अस्मिता, जनभावना पायदळी तुडवत त्यांनी व्यवसायिकतेला प्राधान्य दिल्याने क्रिडा जगतात त्यांच्याविरूद्ध क्षोभ उसळला आहे. टी ट्वेंटी विश्वचषकाचे कवित्व नुकतेच संपले असून आयपीएल ची चाहूल लागली असतानाच काव्या मारनला पाक प्रेमाचा पान्हा फुटल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आयपीएल मध्ये तिच्या संघावर होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवाय सनराईझर्स हैदराबादचे ट्विटर हॅंडल सस्पेंड झाल्याने हा वाद लवकर मिटण्याची शक्यता वाटत नाही.

झाले काय तर क्रिकेट आता केवळ एक खेळ राहिला नसून तो सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाली आहे. आयपीएल याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. यांत बड्या व्यावसायिकांनी धनराशी ओतल्याने त्याला ग्लॅमरस रूप आले आहे. मात्र असे असले तरीही आपल्या देशातील संघ मालकांना व्यवसायिकता टिकवून ठेवतांना देशाशी नाळ जोडून ठेवणे गरजेचे आहे आणि इथेच खरी गोम आहे. भारतीय खेळाडू विदेशी लीगमधून खेळत नाहीत. पण भारतीय मुळाचे संघमालक विदेशी लीग मध्ये त्यांच्या संघांना सहभागी करतात. अर्थातच यात वावगे काहीच नाही. पण असे करत असताना कोणत्या देशांचे खेळाडू त्यांच्या संघात सामील करून घ्यायचे यात तारतम्य बाळगणे जरूरी आहे आणि इथेच वादाची ठिणगी पडली आहे.

दी हंड्रेड लीगच्या ८ संघांपैकी आयपीएल संघातून प्रसवलेले मॅंचेस्टर सुपर जाएंट्स, एमआय लंडन, सदर्न ब्रेव्ह आणि सनराईझर्स लीड्स हे चार भारतीय मालकांचे संघ आहेत. या लीग साठी १२ मार्च २०२६ ला झालेल्या ॲाक्शन मध्ये काव्या मारनने सनराईझर्स लीड्स संघासाठी पाक खेळाडू अब्रार अहमदवर जवळपास दोन करोड चौतीस लाखांची बोली लावली. भारतीय संघमालक असूनही त्यांनी पाक खेळाडूवर बोली लावल्याने त्या क्रिकेट प्रेमींच्या रडारवर आल्या आणि वादाला तोंड फुटले. सतत भारता विरुद्ध भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर दौलतजादा करताच भारतीय जनमानस खवळले आणि सोशल मिडियात बॅायकॅाट सनराईझर्सचा ट्रेंड चालू झाला.

खेळ आणि राजकारण यांची गल्लत करू नये हे कितीही सांगितले तरी देशभावनेचे काय हा प्रश्न उरतोच. ज्या पाक ने आपल्या देशावर १९४६-४७, १९६५, १९७१ आणि १९९९ अशी चार युद्ध लादली, अपरिमित जीवित आणि वित्तहानी झाली, २००८ मुंबई, २०१६ उरी, २०१९ पुलावामा आणि २०२५ पहलगाम असे दहशतवादी हल्ले केले, त्या हल्लेखोर देशाच्या खेळाडूंसाठी पायघड्या घालण्यात काय अर्थ आहे? सैन्याची अतोनात हानी, निरपराधांचे रक्त सांडवणार्या शत्रू देशाच्या खेळाडूंना भाव देणे कितपत योग्य आहे? केवळ व्यवसायिक फायद्यासाठी देशभावनेला तिलांजली देण्याचा नीचपणा सनराईझर्स कडून झाला आहे. भलेही यांत संघ प्रशिक्षक म्हणून न्यूझीलंडचा डॅनियल वेट्टोरी, काव्या मारन सोबत उपस्थित होता परंतु संघ मालकांपुढे, त्यांच्या आवडीनिवडी पुढे कोणाचेही चालत नसते.

बातमी तर अशी आहे की सनराईझर्सनी केवळ अब्रार अहमदच नव्हे तर उस्मान तारीक, फहीम अशरफ आणि सैम अयुब साठी पण फिल्डिंग लावली होती, त्यात अब्रार अहमद त्यांच्या गळाला लागला. या अब्रारच्या लीला काय वर्णाव्या, चॅम्पियन्स ट्रॅाफीत शुभमनला क्लीन बोल्ड करताच घुंगरू सेठ सारखी मान हलवत सेलिब्रेशन केले होते. तर आशिया चषकात साहबजादे फरहान, हॅरीस रौफने खेळभावना न दाखवता ॲापरेशन सिंदूरची खिल्ली उडवली होती. याच अब्रारने यापुर्वी एअर स्ट्राईक च्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेना आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची थट्टा केली होती. तर एसीसी आणि पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी भारतीय संघाने त्यांच्या हस्ते आशिया चषक स्वीकारण्यास नकार देताच ते आशिया चषक स्वतःसोबत घेऊन गेले.

जनक्षोभ काय असतो याचा तडाखा केकेआर संघाला यापूर्वी बसला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असताना केकेआर संघाने आयपीएल साठी बांगलादेशी मुस्तफिजूर रहमानला करारबद्ध केले होते. मात्र त्यांना आपली चूक कळली आणि त्यांनी मुस्तफिजूरला बाहेरचा रस्ता दाखवला. याच नाट्यात बांगलादेशने टी ट्वेंटी विश्वचषकावर बहिष्कार टाकला परंतु त्याचा काही परिणाम स्पर्धेवर झाला नाही. उलट बांगलादेश याप्रकरणी एकाकी पडला. भलेही त्याला पाक ने पाठिंबा दिला पण स्वतः पाक संघ स्पर्धेत सहभागी होऊन नामनिराळा राहिला. तसेही भारत पाक द्विपक्षीय मालिका २००८ पासून बंद आहे, केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये दोन्ही संघांची गाठ पडते. क्रिकेट सामन्याला धर्मयुद्ध समजणाऱ्या आणि सातत्याने भारता विरुद्ध आतंकवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानशी यामुळेच द्विपक्षीय क्रिकेट मालिका बंद असून आयपीएलची कवाडे पाक खेळाडूंना २००८ पासून बंद आहेत.

या प्रकरणी काव्या मारन यांनी खुलासा केला आहे की पाक खेळाडूंना निवडण्याचा निर्णय हा संघाची गरज, क्रिकेटींग मेरीट यावर आधारित आहे. तसेच दी हंड्रेड लीग ही भारतीय लीग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर क्रिकेट महर्षी सुनिल गावसकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते पाक खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पैशाचा उपयोग भारताविरूद्ध होण्याची शक्यता असून यातून पुन्हा आपल्या सैनिकांचे,निरपराध नागरिकांना रक्त वाहणार. एखाद्या लीग चे विजेतेपद मिळवण्याची किंमत भारतीयांचे प्राण देऊन चुकवणार काय हा त्यांचा प्रश्न आहे. हाच पैसा आयुधं, शस्त्रे विकत घेऊन आपल्याच विरुद्ध वापरण्यात येत असेल तर हे कितपत योग्य आहे? सनराईझर्सचा पाक खेळाडूं प्रतीचा स्नेह क्रिकेटवर अतोनात प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या जखमांवर मीठ चोळणारा आहे. क्रिकेट, क्रिकेटपटू, आयपीएल संघ, त्यांचे संघ मालक यापेक्षा इथल्या जनतेचे, चाहत्यांचे देशप्रेम सर्वतोपरी आहे आणि याचा मान राखला जावा हे काव्या मारन, सनराईझर्सला कळायला हवे.
—————————————————
दिनांक १७ मार्च २०२६
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे