बेधुंद आसमंत’ जीवनाचा अखंड उत्सव ; वृंदा करमरकर
सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे परीक्षण

‘बेधुंद आसमंत’ जीवनाचा अखंड उत्सव ; वृंदा करमरकर
सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेचे परीक्षण
आसमंत म्हणजे आपल्या भोवतालचे आकाश, वातावरण आणि सृष्टीचा अथांग विस्तार. ‘बेधुंद आसमंत’ शब्द उच्चारताच निळेशार आकाश, ढगांचे पुंजके, मुक्त उडणारे पक्षी, डोलणारी झाडें, वार्याच्या लहरी, गंधाळणारी फुले आणि निसर्गाचे अवखळ सौंदर्य डोळ्यांसमोर येते. पहाटेच्या कोवळ्या सूर्यकिरणानी परिसर उजळून निघतो. पक्ष्यांच्या किलबिलाटाने दिवसाची सुरुवात होते. दवबिंदूंनी नटलेली फुले आणि आणि पाने मनाला प्रसन्न करतात. अशा वेळी आसमंत जणू आनंदाने बेधुंद झाल्यासारखा वाटतो. पावसाळ्यात तर बेधुंद असमंताचे रूप अधिकच मोहक दिसते. पावसाच्या सरी आणि मातीचा दरवळ मनाला वेड लावते. निसर्ग प्रत्येक रूपामध्ये मानवी मनाशी एक अदृश्य संवाद साधत असतो.
ऋतूंच्या बदलानुसार बेधुंद असमंताची अनेक रूपे अनुभवायला मिळतात. पावसाळ्यात काळेभोर ढग, विजांचा लखलखाट, कोसळणाऱ्या सरी आणि मातीचा दरवळ सृजनाचा संदेश देतो. वसंत ऋतूत फुलांचा सुगंध आणि नवपालवीचा हिरवा साज जीवनातील नव्या सुरुवातीची प्रेरणा देतो. हिवाळ्याच्या धुक्यात हरवलेला आसमंत शांतता आणि अंतर्मुखता शिकवतो.
‘आसमंत हा मानवी संस्कृतीचा आरसा आहे’. आपल्या सण उत्सवांपासून लोकगीतांपर्यंत चित्र कलेपासून साहित्यापर्यंत आणि अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत निसर्गाचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते. संत कवींनी निसर्गातून ईश्वराचा अनुभव घेतला, तर आधुनिक साहित्यिकांनी त्यातून मानवी मनाचे सूक्ष्म भाव उलगडले. म्हणूनच आसमंत हा केवळ दृश्य अनुभव नसून तो संस्कृतीचा, संवेदनांचा आणि मूल्यांचा अविभाज्य भाग आहे.
परंतु आजचा माणूस विकासाच्या शर्यतीत इतका गुंतला आहे, की त्याने निसर्गाशी असलेले नाते दुर्लक्षित केले आहे. वाढते प्रदूषण, वृक्षतोड, औद्योगिकीकरण, हवामान बदल आणि पर्यावरणाचा असमतोल यामुळे हा बेधुंद आसमंत विदीर्ण होत आहे. स्वच्छ हवा निरभ्र आकाश आणि ऋतूंचे नैसर्गिक चक्र यावर संकट आले आहे. निसर्गाचे शोषण करून मानव स्वतःच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करत आहे. म्हणून पर्यावरण संवर्धन ही केवळ सामाजिक नव्हे; तर नैतिक जबाबदारी आहे. बेधुंद आसमंत आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो. मुक्तपणे जगा पण मर्यादा विसरु नका, प्रगती करा पण निसर्गाशी नाते तोडू नका, स्वप्ने पहा पण पृथ्वीचे भान राखा, निसर्गातील प्रत्येक घटक परस्परावलंबी आहे.
या सुसंवादातूनच जीवनाचे खरे सौंदर्य फुलते. बेधुंद आसमंत हा केवळ निसर्गाचा देखावा नसून मानवी मनाला समृद्ध करणारा, संस्कृतीला दिशा देणारा आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव जागवणारा जीवनाचा अखंड उत्सवू आहे. या उत्सवाचे जतन करणे ही प्रत्येक सुजाण नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. कारण बेधुंद आसमंत टिकला तरच मानवाचे अस्तित्व आणि त्याचे भविष्यही सुरक्षित राहील.निसर्गाकडून आनंद, संयम, सहजीवन आणि संतुलन यांचे धडे घ्यावेत. मानव आणि निसर्ग यांचे नाते जितके दृढ राहील तितके जीवन अधिक समृद्ध आणि आनंदी होईल. आजच्या त्रिवेणी काव्यस्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘बेधुंद आसमंत’ छहा विषय अतिशय वैचारिक आहे.आपल्याला सखोल विचार करण्याची त्यामुळे सवय लागेल. शिलेदारांनी पण स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. तसेच मला या काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल आदरणीय राहुल सरांचे मी आभार मानते.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
मराठीचे शिलेदार समूह


