Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

होळी : रंग, श्रद्धा आणि एकतेचा उत्सव

अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर जि अहिल्यानगर

0 5 1 8 0 1

होळी : रंग, श्रद्धा आणि एकतेचा उत्सव

“फाल्गुनाची पौर्णिमा आली की वातावरणातच एक वेगळा उत्साह दरवळू लागतो… अंगणात रचलेली होळी, मनात दाटलेला आनंद आणि रंगांनी न्हाऊन निघणारी माणसं हीच तर होळी!” होळी हा केवळ रंगांचा सण नाही, तर तो श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचा जिवंत उत्सव आहे. भारतभूमीवर साजरा होणाऱ्या या आनंदोत्सवामागे अध्यात्म, इतिहास आणि मानवतेचा सुंदर संगम दडलेला आहे. होळी म्हटली की, हिरण्यकश्यप आणि प्रह्लाद यांची कथा आठवते. अहंकाराने अंध झालेल्या हिरण्यकश्यपाने स्वतःलाच देव मानले; पण त्याचा पुत्र प्रल्हाद मात्र विष्णू भक्तीत अढळ होता. कितीही संकटे आली, तरी श्रद्धा ढळली नाही. अग्नीतही त्याचा विश्वास जिंकला आणि दुष्टतेचा अंत झाला.

ही कथा आपल्याला सांगते.अन्याय कितीही बलवान असला तरी सत्य आणि श्रद्धेचा विजय निश्चित असतो. ‘होलिका दहन’ म्हणजे आपल्या मनातील अहंकार, मत्सर आणि द्वेष जाळून टाकण्याची प्रतिज्ञाच जणू! होळीच्या आदल्या दिवशी “होलिका दहन” केले जाते. गावोगावी होळी पेटते आणि त्या ज्वाळांमध्ये वाईट विचारांचा त्याग करण्याचा संकल्प केला जातो. दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा आनंद उसळतो. गुलालाचे उधाण, हास्याचे फवारे, ढोल-ताशांचा नाद आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी, सगळीकडे आनंदच आनंद! रंग उधळताना जणू आपण जीवनालाच नवे रंग देत असतो. राग-लोभ विसरून, भेदभाव बाजूला ठेवून एकमेकांना रंग लावणे म्हणजे नात्यांमध्ये पुन्हा एकदा गोडवा भरणे होय.

होळी हा सण आपल्याला एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश देतो. जात, धर्म, श्रीमंती, गरीबी हे सर्व भेद या रंगांमध्ये विरघळून जातात. एकमेकांना “होळीच्या शुभेच्छा” देताना मनं जवळ येतात. खरं तर, रंग हे फक्त बाह्य रूप रंगवत नाहीत; ते मनालाही रंगवतात. आपलेपणाचा, मैत्रीचा आणि प्रेमाचा रंग जेव्हा मनावर चढतो, तेव्हाच होळी खऱ्या अर्थाने साजरी होते. जीवनात अनेक ताणतणाव, दुःख आणि चिंता असतात. होळीचा सण जणू त्या सगळ्यावर आनंदाची उधळण करतो. रंगांच्या या वर्षावात मन मोकळं होतं, हसू फुलतं आणि नव्या ऊर्जेची सुरुवात होते.

“जणू निसर्गही सांगतो, जुने विसरा, नव्याने जगा!”

होळी ही केवळ रंगांची उधळण नाही; ती प्रेम, श्रद्धा, क्षमा आणि नव्या सुरुवातीचा उत्सव आहे. आपण होळी साजरी करताना सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे, पर्यावरणपूरक रंग वापरले पाहिजेत आणि सर्वांच्या आनंदाचा विचार केला पाहिजे. मनातील कटुता जाळून, नात्यांमध्ये प्रेमाचा रंग भरून, सकारात्मकतेचा संकल्प करूनच आपण होळी साजरी करूया. कारण, खरी होळी बाहेरच्या रंगांत नाही… ती मनाच्या रंगांत असते. होळीच्या या पवित्र अग्निज्योतीसमोर आपण मनातील कटुता, मत्सर आणि अहंकार जाळून टाकूया. प्रल्हादाप्रमाणे श्रद्धा जपूया आणि विष्णू कृपेवर विश्वास ठेवूया. रंगांच्या या सणात आपण नात्यांना नवसंजीवनी देऊ या आणि जीवन अधिक सुंदर बनवू या..!!

रंग फक्त अंगावर नकोत, तर
मनावरही चढू देत प्रेमाचे, क्षमेचे आणि आपुलकीचे…!
होळीच्या ज्वालात जळो कटुता सारी,
रंगांनी न्हाऊ दे नाती प्रेमाची फुलारी
हसू, आनंद, एकतेचा राहो सदा मेळ,
जीवनरंगांनी भरू दे प्रत्येकाचा खेळ…!

अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि अहिल्यानगर
(लेखिका या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत)
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे