मनाला नियंत्रित ठेवणारा श्वास; अनुराधा भुरे
मनाला नियंत्रित ठेवणारा ‘श्वास’
माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या सर्व शरीर क्रिया चालू ठेवणारा ‘श्वास’ जीवनाचा अविभाज्य अंग. माणूस अन्नाशिवाय वीस दिवस राहतो. पाण्याशिवाय पाच दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो ,पण श्वासाशिवाय तो दोन मिनिट सुद्धा जिवंत राहू शकत नाही. जेव्हा श्वसनाची ही क्रिया थांबते तेव्हा आपण हे जग सोडून गेलेलो असतो, ह्रदय क्रिया बंद पडते शरीराचा सगळं कार्य बंद पडत म्हणून श्वास शरीरक्रियासाठी खूप महत्त्वाचा आहे.
श्वासाची ही क्रिया आपल्या जन्माच्या आधीपासून सुरू होते. त्यावेळी आईच्या गर्भातील नाळेतून हा श्वास आपल्याला मिळत असतो.जन्माला आल्याबरोबर ही नाळ तोडली जाते आणि इथून नाकाने आपल श्वसन चालू होते ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत. आपली एकाग्रता जर जास्त असेल तर प्राणवायूचा श्वासनलिकेतून फुफ्फुसापर्यंत होणारा प्रवास सुद्धा आपल्याला नक्की जाणवेल. बाहेर पडणाऱ्या श्वासामुळे पोट लगेच आत जाते व सर्व शरीरभर एक चैतन्य जगवतो हे लक्षात येईल. मनाच्या एकाग्रतेसाठी ध्यान धारणेत खोल दीर्घ श्वास हा सर्वात सोपा उपाय मानला जातो. मन एकाग्र करण्यासाठी कोणत्याच बाह्य साधनांचा जसे की जपमाळ वगैरे गरज पडत नाही. प्रत्येक वेळी आत जाणार श्वास ताजी प्राणशक्ती आपल्या शरीरात घेऊन जात असतो. ज्यावेळी आपण काही रोमांचकारी भितीदायक समोर पाहतो तेव्हा आपल्या श्वासाची गती बदललेली असते. आपल्याला हे ही लक्षात येईल आपण रागात असतो तेव्हाही आपल्या श्वासाची गती बदललेली असते. आनंद, दुःख ,प्रेम, इर्षा राग सर्वच वेळी शरीरात श्वासाची गती बदललेली दिसते.
जितका आखूड किंवा अल्प आपला श्वास होईल तितकं आपलं मन चंचल असेल. जितका शांत स्थिर आपला श्वास होईल तितकं आपलं मन स्थिर असेल. हा श्वास आपल्या शरीरात आणि शरीराबाहेर होणाऱ्या हालचाली वर क्रियांवर अवलंबून असत. या अशा अद्भुत असाधारण श्वासाचे महत्त्व आपल्याला कळायलाच हवं. आजच्या धावपळीच्या युगात शरीर आणि मन यांच संतुलन राखण खूप कठीण झालं आहे , कारण आपण शरीर आणि मनाला नियंत्रित करणाऱ्या या श्वासाकडे दुर्लक्ष करतोय. खरं तर आपण श्वास घेतो तो फक्त छातीपर्यंत. त्याला खाली उतरूच देत नाही ,नव्हे तर तितका वेळच आपल्याकडे नाही. इथे प्रत्येकजण आज आपल्या भविष्याची चिंता, एकमेकांचे हेवेदावे, द्वेष यात एवढे व्यस्त आहोत की पूर्ण श्वास घेणं आपण विसरलोयच. जीवनाचा आधारच हा श्वास आणि त्याकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही.
आपल्या जीवनाचा आधार श्वास आणि शरीराचा आधार आपली नाभी किंवा बेंबी आपण घेतलेला श्वास सरळ नाभीपर्यंत गेला तरच शरीरात ऊर्जा चेतना आनंददायी मन आपण अनुभवू शकतो .शरीरातील ही खोल श्वासाची आवर्तनं सहज शरीरभर पसरून आपल्या आज्ञा चक्रपर्यंत गेल्यामुळे ध्यान अधिक सक्रिय व्हायला मदत होते. आपला प्रत्येक श्वास आपल्या जीवनाला बदलण्याची क्षमता ठेवतो. म्हणून श्वासाच्या ऊर्जेचा उपयोग करून आपण प्रत्येक जण शांत मन सतेज बुद्धी आणि निरोगी शरीर अनुभवू शकतो. निरंतर चालणाऱ्या श्र्वासाच्या क्रियेवर लक्ष केंद्रित केल्यास मन अखंड वर्तमान काळात राहू शकते.आयुष्यातील अनेक ताणतणावाच कारण भूतकाळातील काही चुका किंवा भविष्याची चिंता हेच असतात. जर नियमित प्राणायाम , विलोम अनुलोम ,कपालभाती अथवा मेडीटेशन यांचा सराव केला तर आपल मन उल्हसित राहून आपला आत्मविश्वास वाढायला सुद्धा मदत होईल.
अनुराधा गळेगावे (भुरे)
जिल्हा परिषद प्रा शाळा मेंडका
तालुका मुदखेड जि. नांदेड.



