मैत्रीच्या श्रीमंतीत रंगला ‘प्रवाह मैत्रीचा’
सविता धमगाये, जिल्हा प्रतिनिधी
मैत्रीच्या श्रीमंतीत रंगला ‘प्रवाह मैत्रीचा’
प्रवाह मैत्रीचा समूहातर्फे महिला मेळाव्याचे आयोजन
सविता धमगाये, जिल्हा प्रतिनिधी
नागपूर: मैत्री म्हणजे मेळ संख्यांचा, प्रवाह आनंदाचा, उत्स्फूर्तपणे व्यक्त होण्याचा. मैत्रीत असतो विश्वास खास , मैत्री असते निखळ आनंदाचा झरा, मनाचा तळ गाठायला बरा. अनुभवला श्रीमंतीचा साज, लखलखत्या सौंदर्याचा ताज. किती सुंदर सर्व सख्या नटून आलेल्या. त्याहीपेक्षा मोठा होता तो त्यांच्या डोळ्यात भरून राहीलेलं आत्मविश्वास. आपणही मंच गाजवू शकतो हा विश्वास. प्रवाह मैत्रीचा समुहाने पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींना मैत्रीच्या धाग्यात बांधत एकत्र आणले. निमित्त होते दिनांक 27/10/2024 ला आयोजित महिला मेळाव्याचे.
महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असते. मग ते गृहकार्य असो, नोकरी असो कि समाजाप्रती बांधीलकी असतो. प्रत्येक कार्य ती मन लावून करते. या सर्व कार्यात तिची होणारी दगदग, धावपळ, मानसिक कुचंबणा यातून कुठेतरी मुक्त होऊन जावे असे सतत तिला वाटत असते. पण या मेळाव्याचा रंगढंगच वेगळा. स्वतःमधल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रवाह मैत्रीचा समुहाने केलेला हा अल्पसा प्रयत्न. सहभागी प्रत्येक सखीने आपली कला सादर केली.
महिलांसाठी थीम होती जांभळ्या रंगाची साडी. आणि काय आश्चर्य सुंदर, सुखद रंगात महीला नटून आलेल्या. प्रत्येकीची सादरीकरण अप्रतिम. काहीजणी यापूर्वीही याच मंचावर येऊन गेलेल्या तर काहीजणी पहिल्यांदा मंचावर येणाऱ्या. सगळं अप्रतिम. अगदी साठी पार केलेल्या, अपघातामुळे हातापायात लोखंडी राॅड बसवून उभ्या राहीलेल्या, वाढलेल्या वजनाची, पायातील वेदनांची पर्वा न करता महीला मंचावर अलगत वावरत होत्या. नृत्याची लयलूट, सुमधूर गाण्यांची बहार आणि सोबतीला सुत्रसंचालकाचे खुमासदार शैलीत सुत्रसंचालन याने कार्यक्रमाला उत्सवाचे रूप आणले. मंचावर फुग्यासाठी धावणाऱ्या सख्या जणू बालवाडीतील बालीकाच वाटल्या.
अशा बहारदार कार्यक्रमासाठी मंजूषा साखरे, सविता धमगाये, गायत्रीताई नारनवरे, सरोज वासनिक, विणा गायकवाड, प्रतिभा मेंढे, सिंधू बोदेले, उज्ज्वला उके, सुषमाताई आमटे, संध्याताई राऊत, संगिता मेश्राम मंदाताई आगरे यांनी विशेष सहयोग देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली.



