एक धागा सुखाचा..!
अनिता व्यवहारे ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
एक धागा सुखाचा..!
‘सुख म्हणजे नक्की काय असतं..?’ आठवतं का स्टार प्रवाह वर असलेली ही मालिका. मालिका सुरूवातीला तशी चांगली होती. टी आर पी ही बऱ्यापैकी होता.पण ती पुढे रेंगाळली आणि मग..! असो, पण या मालिकेतून हे कळलं की, ‘सुख हे एखाद्या फुलासारखं नाजूक पण सुगंधी असतं’आणि ‘दुःख हे काट्यासारखं असलं तरी ही ते जसं टोचतं तसं काही शिकवून जातं…’ आणि ‘या दोघातच आपलं खरं जीवन सामावलेलं असतं.!’ एक नसलं तर दुसऱ्याचं अस्तित्व असूनही नसल्यासारखं असतं! सुख, दुःख या एका नाण्याच्या दोन बाजू असतात, त्यामुळे त्यात समतोल ठेवला तरच आपल्याला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळत जाते.
कारण या सुखदुःखाच्या धाग्यातून आपली जीवन कथा विणली जाते. मुळातच आपला आयुष्य हेच विविध भावभावनांनी विणलेले एक सुंदर वस्त्र असत.त्यात एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जरतारी वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे.. आणि मग या वस्त्रात कधी संघर्ष, संकटाचे धागे असतात तर कधी या जरतारी वस्त्राला माया, प्रेम आपुलकी, जिव्हाळा, विश्वास यांची नक्षीदार वेलबुट्टी लावली तर ते वस्त्र म्हणजेचं आपल आयुष्य अधिक सुंदर होईल…! तसं पाहिलं तर सुख हा शब्द जरी फार मोठा नसला तरी, तो आयुष्यात खूप मोठ्ठ काम करून जातो. म्हणूनच फक्त सुखाचे हे धागे विणून जरी वस्त्र बनवता येत नसल तरी..
एक एक धागा सुखाचा जपून ठेवावा….
दुःखाच्या गर्दीत तो ओळखून घ्यावा..!
कारण तोच कोलमडलेल्या जीवाला पुन्हा बळ देतो., चालायला शिकवतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी…! या तत्त्वाप्रमाणे सुख शोधायचा असेल तर तर ते बाहेर कुठे मिळणार नाही. आपल्या छोट्या छोट्या आठवणीतच,आपल्या व आपल्या माणसांच्या मनात चं ते लपलेलं असतं. तो शोधायला फारसं गर्दीतही जावं लागत नाही. तो मिळवायला पैसे खर्च करावे लागत नाही. एखादे वेळी खूप भूक लागते जीव कासावीस होतो.भुकेने व्याकुळ झालेलं मनानं दुखी होत अशावेळी आईच्या बाजूला जाऊन उभे राहिलं की, तिच्या नजरेला ते समजतं आणि ती जेव्हा दोन घास प्रेमाने भरवते,तेव्हा तिच्या प्रेमाचा, मायेचा, ममतेचा ‘एक धागा सुखाचा’ अलगद मनाला स्पर्शून जातो. म्हणजेच सुख हे एका छोट्या क्षणात, एका स्पर्शात आणि आईच्या स्वयंपाकातही मिळतं.
थोड्याशा प्रेमाने मिळालेल्या सहवासात आपुलकीच्या वागणुकीत तो धागा लपलेला असतो. विद्यार्थ्यांना जेव्हा शाळेतली गणित अवघड वाटू लागतात तेव्हा गणिताचे शिक्षक त्यांचा हात धरून गणित सोडवायला शिकवतात. तो देखील एक सुखाचा धागा असतो.त्यात असलेला आत्मविश्वास,आधार आयुष्यभर मनात घर करून राहतो, असे हे सुखदुःखाचे धागे पांघरून जीवन रुपी वस्त्र परिधान करताना ते सर्वांचे सारखेच असते असे नाही म्हणूनच गदिमा.. म्हणतात..
या वस्त्राते विणतो कोण? एकसारखी नसती दोनं.!
कुणा न दिसले त्रिखंडात हात त्या विणकऱ्याचे…!
तो जो कोणी आहे तो आपले जीवन रुपी वस्त्र विणतो ते एकसारखे नसते.. जसे कसे घटाघटा चे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे..!’ आणि ते त्याच्या विण ते कोणा न कळे…! कुणामुखी पडते लोणी पुन्हा मुखी अंगार..!
म्हणजेच प्रत्येकाची जीवनकथा ही वेगळी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या रूपात साकारली जाते तिला जर विशिष्ट आकार द्यायचा असेल तर तो देताना आपलाही धागा देखील तितकाच निर्मळ असावा लागतो.
पांघरसी जरी कसला कपडा..
ये सी उघडा जासी उघडा
हीच जगाची रीत, नियतीचे संकेत असतात..तेव्हा हे सुखाच्या धाग्यांनी आयुष्याच्या भरजरी वस्त्र पांघरताना आपलं आचरण असं असावं ..
धागा धागा अखंड विणू या
विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणू या
विश्वंभर तो विणकर लौकिक
कार्यारंभी नित्य स्मरू या
बंधुत्वाचा फिरवित चरखा एकत्वाचे सूत्र धरू या….!’
अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर



