0
4
8
2
9
0
मैत्री
एक नातं असंही असतं
जे रक्ताचं मुळीच नसतं
पण ऋणानुबंध तिच्याशी
हृदयातून जुळलेलं असतं
संवाद साधायला चहूकडे
असतील कितीही नाती
पण मनातलं गुपित सांगायला
मैत्रीचा हातच असावा हाती
सुखात असो वा दुखात
सदैव सोबत असणारी
हो, मैत्री तीच वळण आहे
जगण्याला दिशा देणारी
भांडणारी, हक्क जतवणारी
चुकल्यास कान धरणारी
फक्त मैत्रीच तर असते
हृदयाच्या कप्प्यात राहणारी
रुसणारी कधी जवळ घेणारी
आतले सुप्तगुण ओळखणारी
थोडी हसणारी थोडी हसवणारी
मैत्रीच तर असते मनातला ठाव घेणारी
मित्र-मैत्रिणी नसले ना
तर जीवन विराण झाल्यासारखं वाटतं
ती असली जवळ की
वाळवंटातही आभाळ दाटल्यासारखं वाटतं
एक तरी जिवलग मैत्री
सर्वांच्याच नशीबी असावी
जर भेटलीच खूप दिवसांनी
तर घट्ट मिठी तिला बसावी
मोहिनी निनावे
आनंद नगर, नागपूर
0
4
8
2
9
0



