Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

सामान्य माणसाची असामान्य जिद्द: “आता थांबायचं नाय”

अनिता व्यवहारे ता.श्रीरामपूर जि अहिल्यानगर

0 4 8 3 0 0

सामान्य माणसाची असामान्य जिद्द: “आता थांबायचं नाय”

रथ हृदयाचा, पथ विजयाचा, सारथी तूच तुझा…
जल्लोषाचा इंद्रधनु, तू पसर तू बहुदिशा..!
क्षितिजाच्या शाईने रे लिही इतिहास नवा…
कर्माच्या या किरणांनी तू रच ब्रह्मांड नवा…!

या ओळींप्रमाणेच खऱ्या अर्थाने नवा ब्रह्मांड रचणाऱ्या जिद्दी माणसांची खरी कहाणी सांगणारा, २०१६ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या संघर्षावर आधारित “आता थांबायचं नाय” हा चित्रपट. आत्मविकासाचा, जिद्दीचा आणि बदल घडवणाऱ्या सामर्थ्याचा एक विलक्षण अनुभव. शिवराज वायचळ दिग्दर्शित, आणि भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, प्राजक्ता हनमघर अशा दर्जेदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट तुम्हाला तुमच्याच आयुष्याच्या आरशात डोकावून पाहायला लावतो.

मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात रस्त्यांवर काम करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या वर्गातील माणसांकडे समाज नेहमीच उपेक्षेने पाहतो. पण भरत जाधव यांनी या भूमिकेतून अशा माणसाच्या मनातली जिद्द, आत्मसन्मान आणि कुटुंबासाठीची तळमळ सहजतेने साकारली आहे.
महानगरपालिकेतील महाआयुक्त एका निर्णयानुसार, विविध वयोगटातील २३ कामगारांना दहावी उत्तीर्ण होणे बंधनकारक ठरते. त्यांना रात्रशाळेत प्रवेश घेण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे सुरू होते एक वेगळीच त्रेधा-तिरपीट – घर, नोकरी, जबाबदाऱ्या सांभाळत शिक्षणाची वाटचाल.
या संघर्षात येणाऱ्या अवहेलना, अपमान, पण त्याचवेळी घडणाऱ्या सकारात्मक घटना, आशावाद आणि मिळणारे प्रोत्साहन हे सर्व त्यांच्या मनात नवा उभारी निर्माण करतं.

हृदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू
गगनाचा देवही तू, वणव्याची आग तू,
धगधगता श्वास तू, लखलखता लाव्हा तू…!

हा त्यांचा ध्यास त्यांच्या मार्गात उभ्या राहणाऱ्या अडथळ्यांना पार करतो. शिक्षकांचं एक वाक्य त्यांना स्फुरण देतं.. “जे हात झाडू घेऊन शहराची धूळ झाडतात, तेच हात पेन घेऊन नशिबाची धूळही साफ करू शकतात.” या साऱ्या भावनांचं उत्कट रूप गाण्यातून प्रकट होतं.. “सांग सांग भोलानाथ… टेन्शन मिटेल का? डोळ्यात पाणी, मनात वादळ… कसलं रे देतोस हे कठीण कोड?” या ओळींतून त्यांचा अंतर्मनातील आवाज त्या अज्ञात शक्तीकडे धाव घेतो…

“आमच्या वाटेवरती तरी तू असतोस का?”
आणि मग त्यांच्या मनात प्रकाश फाकतो.
“काळ्या नभाचा तू ध्रुवतारा,
पिऊन घे रे अंधार सारा…

उठ रे…! चाल रे…! झेप घे एकवटून बळ सारे…
वाहू दे दाही दिशा… आता थांबायचं नाय!”
ही केवळ एक यशोगाथा नाही, तर सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीची सत्यकथा आहे. चित्रपटातील भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता यांना आपण अनेकदा विनोदी भूमिकांमध्ये पाहिलं आहे. पण इथे त्यांच्या अभिनयाची तीव्रता, संयम आणि भावनिक प्रगल्भता आपल्या काळजाला भिडते.

या चित्रपटात कोणताही एक “नायक” नाही – एक बाप, एक पती, एक आजोबा… आणि एक कष्टकरी माणूस. तो माणूस जो केवळ पोटासाठी नव्हे, तर आपल्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्याकरिता लढत असतो. भरत जाधव यांची भूमिका ही अभिनय नाही, ती एक जगलेली जाणीव आहे. त्यांच्या डोळ्यांतली काळजी, चेहऱ्यावरचं थकवा, आणि तरीही हसऱ्या चेहऱ्याने जगापुढे उभं राहण्याची वृत्ती, हे पाहताना आपल्यालाही नकळत हुंदका येतो. हा चित्रपट एक सामाजिक भाष्य आहे. तो सांगतो की, स्वप्न बघायला मोठा पदवीधर नव्हे, तर मोठ्या मनाचा माणूस लागतो. हा चित्रपट तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासोबत पहाच… कारण, यातून तुमच्याही मनात उसळी मारेल तीच भावना “आता थांबायचं नाय…!”

अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि अहिल्यानगर
=======

4/5 - (3 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे