गडचिरोलीत ‘बिनागुंडा’ धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
गडचिरोलीत ‘बिनागुंडा’ धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू
चार दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
गडचिरोली : जिल्हा हा नैसर्गिकतेने नटलेला असून जिल्हयात अनेक पर्यटनाचे ठिकाणे आहेत. जिल्हयात अनेक ठिकाणी उंच पहाड्या व धबधबे असून याची भुरळ जिल्ह्यासोबतच बाहेरील जिल्हयातील पर्यटकांना पडतांना दिसत आहे. मात्र जिल्हयाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामराड तालुक्यातील बिनागुंडा धबधबा मध्ये दोघाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना 11 जून रोजी घडली. नवनीत राजेंद्र धात्रक (27) रा. चंद्रपूर व बादल श्यामराव हेमके (29) रा. आरमोरी असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत यांचे नुकतेच 7 जून ला लग्न झाले. लग्नानंतर ते बादल हेमके यांच्यासह भामरागड तालुक्यातील बिनागुडा येथे फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान नवनीत हा बिनागुंडा धबधब्यात आंघोळ करत असतांना त्याला खोल पाण्याचा अंदाज आला नसल्याने बुडाला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बादल हे सुध्दा पाण्यात उतरले. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते दोघेही खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती लाहेरी पोलीस मदत केंद्राला मिळाली असता भामरागड येथे दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.
सदर घटनने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून हातावरील मेंहदी उतरण्यापूर्वीच पतीचा मृत्यू झाल्याने सुखी संसाराचे स्वप्न अधुरेच राहिले. यामुळे नवविवाहितेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



