चला आयुष्य बदलवू या..!!!
कुसुमलता दिलीप वाकडे

चला आयुष्य बदलवू या..!!!
सेवेत असताना आपण, ‘मला वेळ नाही, वेळ नाही’ असचं आपलं सतत चालू असतंय आणि ते बरोबर देखील आहे. नोकरीत असताना इतर गोष्टीला आपण वेळ देवू शकत नाही. आता आपण सेवानिवृत्त झालोत. स्वतः करीता नक्कीच वेळ द्यायला हवा किंवा सेवेत असताना वेळेची जुळवाजुळव करून स्वतःकरिता अर्धा तास नक्कीच द्यावा. त्याकरिता आयुष्य बदलवू शकणाऱ्या सवयी स्वतःच रुजवायच्या आहेत.
आरोग्य धनसंपदा:
पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि साधा संतुलित आहार या कंटाळवाण्या वाटणार्या सवयीच दीर्घायुष्याकरिता एक यशस्वी मार्ग असतोय, त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या.
ध्यानाची सवय लावा:
ध्यान मन शांत करण्यासाठी नाही तर मजबूत करण्यासाठी करा. ध्यानामुळे विचार स्पष्ट होतात. भावनावर नियंत्रण मिळते आणि आपण प्रतिक्रियेऐवजी सजग प्रतिसाद देवू लागतो. इतर कुणावर क्षुल्लक गोष्टींवर नाराज न होता थोडा वेळ शांत राहा किंवा दोन मिनिटांकरीता बाहेर जा. आपोआप एकमेकांवरील राग शांत होईल. राग ओढवून कुठलीच गोष्ट साध्य होत नाही.
रोज लिहिण्याची सवय:
नियमित लिहिल्यामुळे मनातील गोंधळ स्पष्ट होतो विचारांना दिशा मिळते आणि स्वतःशी प्रामाणिक संवाद घडतो. त्यातून आपोआप नकळत नियोजन तयार होते. मन शांत राहतं कामाला वेग येतो. वेळेत कामे होतात वक्तशीरपणा जडतो.
आशावादी दृष्टिकोन:
आशावादी लोक अडचणीमध्ये संधी शोधतात आणि त्याच्या सहवासामुळे आपली उर्जा व विचारसरणी सकारात्मक राहते. त्यामुळेच आपला दृष्टिकोन आशावादी असावा. तरांचा विश्वास आपल्यावर असतो.
स्वतःची ओळख निर्माण करा :
स्वतःचे विचार, अनुभव आणि ज्ञान व्यक्त केल्याने तुमची स्वतंत्र ओळख निर्माण होते आणि दीर्घकालीन प्रभाव तयार होतो. ती तयार करायची सवय आधीपासूनच लावून घ्या. मीपणा सोडून इतरांना मदत करा
निसर्गाशी जोडलेले रहा:
मन प्रफुल्लित असते निसर्गाशी संपर्कात राहणे म्हणजेच मनाला शांतता, स्पष्टता आणि भावनिक संतुलन देतोय. निर्णय अधिक परिपक्व होतात. इतरांसोबत मने जुळतात. मित्रमंडळीसोबत भेटीगाठी होतात. त्यामुळेच रोज काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात द्यावा.
कुटुंबासाठी वेळ:
स्वतःकरिता जगत असताना कुटुंबाला अर्थात पत्नी, मुले, आईवडील यांच्यासोबत संवाद घडवून आणावयाचा. दिवसाचे एकत्र जेवण प्रत्येकाचे कामाचे शेड्यूल असल्यामुळे होत नाही; म्हणून रात्रीचे जेवण एकत्र करून सरतेशेवटी दिवसभरातील कामाची संवादातून मन मोकळे करावे. अर्थातच घरच्याची अडचण एकमेकांनी समजून घ्यायची असते. या ‘सात गोष्टी’ मनाशी जुळवून घेतल्या तर, नक्कीच आयुष्याचा प्रवास सुखी व आनंदी होणार यात तिळमात्र शंका नाही.
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
(लेखिका सेवानिवृत्त पदवीधर शिक्षिका आहेत)



