भारतीय संस्कृती आणि परंपरा विज्ञाननिष्ठच”
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
“भारतीय संस्कृती आणि परंपरा विज्ञाननिष्ठच”
अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे प्रतिपादन
कोथरूड मध्ये ‘सांस्कृतिक व्याख्यानमाला’
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे.दि.11जाने (प्रतिनिधी) भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाश्चिमात्य विचार सोडून आपली प्राचीन संस्कृती आणि धर्मपरंपरा ही सुध्दा मूळात विज्ञाननिष्ठ आहे, हे लोकांना षड-दर्शनाच्या दृष्टीकोनातून पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आली आहे. विज्ञानावर आधारीत असलेल्या भारतीय हिंदू संस्कृतीची दर्शन सध्याच्या पिढीला घडले तर भारत हाच जगासाठी “विश्वगुरू”ठरेल.” असे मत लोकप्रिय नाट्य सिनेअभिनेते आणि भारतीय संस्कृतिचे अभ्यासक राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.
पुण्यात कोथरूड येथे आयडियल कॉलनीच्या क्रीडांगणावर ‘भारतीय संस्कृती संगम’ संस्थेने “सांस्कृतिक व्याख्यानमाला” आयोजित केली आहे. या मालेचे प्रथम पुष्प श्री. सोलापूरकर यांनी गुंफले. ‘हिंदू संस्कृती,परंपरा आणि विज्ञान’ हा त्यांचा व्याख्यान विषय होता. अध्यक्षस्थानी सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.संजय चोरडिया होते. व्यासपीठावर ‘भारतीय संस्कृती संगम’चे विश्वस्त गोविंद बेडेकर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील आणि राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.
या व्याख्यानात पुढे बोलताना राहुल सोलापूरकर यांनी धर्म, संस्कृती आणि परंपरा यावर आपले सखोल चिंतन मांडले. ते म्हणाले, आपली संस्कृती पाच हजार वर्षांपेक्षा जुनी आहे. पण दुसरीकडे ती अत्यंत टाकाऊ, असहिष्णू, जुनाट, बुरसटलेली असल्याचे काही लोकांकडून हिणवले जाते. परंतु अतिशय श्रेष्ठ असे अद्वैत तत्त्वज्ञान वेदांपासून सुरु होऊन अध्यात्म मार्गे आपल्यापर्यंत पोचले आहे.
जग ज्यांना ‘एपिक’ संबोधतात त्या रामायण, महाभारत यांना आपण स्थान देतो, पण ते फक्त गोष्टी रूपात. त्यातली जीवनदृष्टी समजून, त्याच्या शाश्वत संदेशांना आजच्या काळाशी जोडून अधिक महत्त्व द्यायला हवं, म्हणून पश्चिमेकडून आलेले ‘लिनिअर’ विचार सोडून, आपल्या “चक्रीय विचारांना” आपण पुढे नेणे आवश्यक आहे. ‘षड -दर्शन’ ही हिंदू तत्त्वज्ञानातील अर्थपूर्ण संकल्पना आहे, यात विज्ञान, तत्त्वज्ञान, आचारधर्म आणि नैतिकता याबद्दलचे विचार विज्ञानावर अधिष्ठीत असून त्याची सांगड सध्याच्या वर्तमानाशी घातली तर आपली धर्मपरंपरा आणि संस्कृती किती काल सुसंगत आहे, हे लक्षात येईल.
गंगा हिमालयात प्रकट होते; पण खाली वाहताना तिला अनेक प्रवाह येऊन मिळतात; तशी आपली हिंदू संस्कृती अनादी अनंत काळ पासून चालत आली आहे. अनेक प्रवाह यात मिळत गेले, इथल्या संस्कृतीत सामावले गेले.” या शब्दात राहुल सोलापूरकर यांनी आपले विश्लेषण मांडले. या देशातील समाज हिंदूत्वनिष्ठ विचारांनी एकात्म होऊन पुढे जावा, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी व्याख्यानाचा समारोप केला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय चोरडिया यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमात संस्कृती अभ्यासाचा अंतर्भाव करणे आवश्यक असावे अशी अपेक्षा व्यक्त करून शिक्षण केवळ ज्ञान देण्याचे साधन नसून, ते समाजाची मूल्ये, परंपरा, संस्कृती जपण्याचे माध्यम असले पाहिजे,” अशा शब्दात अध्यक्षीय मनोगत मांडले आणि सूर्यदत्त संस्थेचे सभागृह सर्व सुविधांसहित हिंदू धर्म प्रबोधनासाठी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रचिती सुरु कुलकर्णी यांनी केले. श्रुती केळकर,उमेश सावरकर, मंदार पंडित, नुपूरा कामत यांनी गायलेल्या “जयोस्तुते श्रीमहन्मंगले…” या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘भारतीय संस्कृती संगम’ आयोजित ‘सांस्कृतिक व्याख्यानमालेस रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.



