Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनचारोळीदादरा नगर हवेलीदेश-विदेशनागपूरनाशिकपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“आयुष्य केवळ श्वासांची मोजदाद नाही तर ते मूल्यांची साधना आहे”; सविता पाटील ठाकरे

बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 8 2 8 4

“आयुष्य केवळ श्वासांची मोजदाद नाही तर ते मूल्यांची साधना आहे”; सविता पाटील ठाकरे

बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण

गेला आठवडा संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावून जाणारा ठरला. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झालं. ती धडाडी..तो धाक….ती जरब…तो स्पष्टवक्तेपणा… ती निर्भीडता.. सारं काही क्षणात थांबले. कसे जगले ना दादा..आपले आयुष्य…? जात, पात, धर्म, पंथ, पक्ष, विपक्ष या पलीकडे जाऊन साऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू काढणारे दादा एक अजब रसायन होते. त्यांच्या जाण्याने पुन्हा एकदा काळ सर्वश्रेष्ठ ठरला आणि प्रत्येकाच्या मनाला एकच प्रश्न पडला.. “आयुष्य म्हणजे नेमके काय?”

सत्ता, यश, लोकप्रियता किंवा संपत्ती कशालाही मृत्यूचे नियम बदलता येत नाहीत, ही कठोर पण अपरिहार्य जाणीव अशा प्रसंगी प्रकर्षाने समोर आली. “मानवी आयुष्य नाजूक धाग्यासारखे आहे. बाहेरून ते भक्कम वाटते, पण आतून ते काळाच्या वाऱ्याने कधीही हलू शकते”. ग्रीक तत्त्वज्ञ एपिक्युरसने सांगितले होते की, ‘मृत्यूची भीती आयुष्याला बंधनात टाकते’. अकाली जाणे ही केवळ एका व्यक्तीची हानी नसते, तर ते अनेक नाती, स्वप्ने आणि जबाबदाऱ्या अपूर्ण ठेवून जाते. कुटुंबासाठी ती पोकळी भरून न येणारी असते, समाजासाठी ती विचार करायला लावणारी ठरते.

आपण आपल्या आरोग्याकडे, नातेसंबंधांकडे, मानसिक शांततेकडे किती गांभीर्याने पाहतो? उद्याची खात्री नसताना आजचा दिवस आपण कसा जगतो, याचा लेखाजोखा अशा प्रसंगातून नकळत सुरू होतो. एक तत्त्वज्ञ मार्कस ऑरेलियसने लिहिले होते की, ‘माणसाने रोज असे जगावे, जणू तो शेवटचा दिवस आहे’. कारण तेच जीवनाला सजग आणि अर्थपूर्ण बनवते. आयुष्य म्हणजे केवळ श्वासांची मोजदाद नाही तर ते मूल्यांची साधना आहे. माणूस गेल्यावर त्याचे पद, नाव किंवा अधिकार नाही तर त्याची माणुसकी, त्याने दिलेला आधार आणि समाजात निर्माण केलेली उजळणच टिकून राहते. म्हणूनच प्रत्येक दिवस आपल्याला एक नवा प्रश्न विचारतो…आज आपण केवळ जगलो, की खर्‍या अर्थाने जगण्यासारखे काही केले?

“आयुष्य म्हणजे केवळ जन्म आणि मृत्यू यांच्या मधली मोजमापाची रेषा नाही; तर ते म्हणजे माणसाच्या जाणीवेत सतत आकार घेणारी मूल्यांची प्रक्रिया आहे”. माणूस अनेकदा सुख, यश आणि प्रतिष्ठेत जीवनाचा हेतू शोधतो, पण तत्त्वज्ञान सांगते की बाह्य गोष्टी क्षणभंगूर असतात. खरा ठेवा अंतर्मनातील संयम, करुणा आणि विवेकात असतो. जीवन नदीसारखे वाहते ते थांबत नाही, पण त्या प्रवाहात माणूस स्वतःला घडवू शकतो. आणि असे घडणे, घडवणे हेच खऱ्या अर्थाने….आयुष्य जगण्याचे सार्थक आहे असे मला वाटते.

रसिक सृजनहो… आज ‘बुधवारीय काव्यरत्न स्पर्धे’च्या निमित्ताने ‘आयुष्य हे’ हा विषय मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी दिला. भावपूर्ण रचनांनी सर्वच समूह सुंदर सजलेत. पण थोडं काही.. भावपूर्ण कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसते, तर ती कवीच्या अंतर्मनातून उमटलेली अनुभूती असते. तिच्यात कृत्रिम सजावट नसते, पण प्रामाणिक वेदना, आशा, प्रेम किंवा करुणा असते. शब्द साधे असले तरी भाव गहिरे असतात, प्रतिमा बोलक्या असतात आणि प्रत्येक ओळ वाचकाच्या मनाला स्पर्श करते. जिथे कविता वाचताना डोळे ओलावतात किंवा हृदय क्षणभर थांबते, तिथे समजावे ती कविता खर्‍या अर्थाने भावपूर्ण आहे. अर्थात यात आपल्यापैकी बरेच जण यशस्वी देखील ठरले. तेव्हा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन पुढील लेखनास अनंत कोटी शुभेच्छा.

सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे