वैशाख वणव्यातील सुखद गारवा..!!
सौ. स्वाती मराडे-आटोळे
वैशाख वणव्यातील सुखद गारवा..!!
मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर, छत्रपती संभाजीनगर येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद, सभागृहासमोर येताच मन प्रसन्न करणारी अतिशय सुरेख रांगोळी पाहूनच कार्यक्रम किती अप्रतिम असणार आहे याची कल्पना आली आणि खरोखरच अविस्मरणीय क्षणांची जीवनात नोंद झाली. आदरणीय राहुलदादा पाटील यांच्या काटेकोर नियोजनाचा प्रभाव पदोपदी जाणवला. पहिल्या व दुसऱ्या सत्रात उशिरापर्यंत दादा स्वतः उपस्थित नसूनही त्यांनी केलेल्या नियोजनानुसार चाललेला कार्यक्रम मनाचा ठाव घेणाराच. तरीही राहुलदादा आले आणि कार्यक्रमास चार चांद लागले. मग काय दादांच्या उपस्थितीत आणखी जास्तीत जास्त कार्यक्रम व्हावा म्हणून आयोजकांनी बांधलेला चंग व उपस्थित सर्व मराठीचे शिलेदारांनी दिलेली साथ.. यामुळे कार्यक्रम संपायला साडेसात वाजत आलेले तरीही ना कुणी गडबड केली वा ना कुणी जायची घाई. यालाच तर म्हणतात ना आभाळमाया..!
गुरुमाऊली डॉ पद्माताई जाधव यांना प्रथमच भेटता आले. उच्च विद्वत्तेच्या धनी व संवेदनशील संस्कार माऊलीची लाभलेली सोबत याने मन भरून येणार नाही तर काय? हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवावेत असे हे क्षण भरभरून साठवून ठेवले. आदरणीय सविताताई पाटील-ठाकरे आणि प्रशांतभाऊ ठाकरे कार्यक्रमासाठीची तुमची तळमळ आणि धडपड प्रत्यक्ष अनुभवली. सवूताईने केलेले स्वागतीय सूत्रसंचालन वाह आणि वाहहच. पुस्तक प्रकाशनास लाभलेली प्रशांतभाऊंची दमदार वाणी.. अप्रतिमच.
शब्दप्रभू विष्णूदादा संकपाळ.. काय बोलावं.. तुम्ही केवळ आयोजन समितीचे सदस्य नव्हता तर कार्यक्रम जाहीर झाल्यापासून एकेक क्षण कार्यक्रमासाठी जगत होता. तुमच्या कार्यतत्परतेस मानाचा मुजरा. विजयदादा शिर्के वर्षाताई मोटे, कवीवर्य प्रकाश गोधणे.. समस्त संभाजीनगर आयोजन समितीचे कौतुक करावे तेवढे कमीच.या दिवसाची तुम्ही दिलेली अनमोल भेट मनात चिरंतन राहील. आ. तारकाताई रूखमोडेंची समयसूचकता मनास भावली. शर्मिलाताई देशमुख, अरविंद उरकुडे सर, अशोक लांडगे सर, संग्रामदादा कुमठेकर आपणा सर्वांची उपस्थितीही चैतन्य निर्माण करणारीच.
कार्यक्रमास लाभलेले अध्यक्ष आमदार विक्रम काळे, शिवव्याख्याते बालाजी जाधव व अकिल पठाण, नरेश शेळके.. खरोखरच आपण सर्व मनापासून मराठीवर प्रेम करणारे आहात याची प्रचिती आली. मराठीचे शिलेदार समूहातील आलेले सर्व सदस्य तुमची उपस्थिती तर मराठीप्रेमाचा पुरावाच. आपणा सर्वांना भेटून, बोलून, मनोगत ऐकून खूप आनंद झाला. आपणा सर्वांसाठी ही शब्दफुलांची ओंजळ वाहताना मनापासून आनंद होत आहे.
मिटली जिवाची काहिली, आनंद वाहिला ओसंडून
रणरणत्या उन्हात जसा, गुलमोहर येतो बहरून
देखणं नियोजन, देखणं आयोजन, सगळंच अप्रतिम
तृप्त झाले नयन, कार्यक्रम पाहून, मन हे गेले मोहरून.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.



