कामगाराप्रती समाजमन जपणारे ‘विलास सूर्यवंशी’
विठोबा पवार कामगार नेते, मुंबई
कामगार व्यक्ती विशेष
कामगाराप्रती समाजमन जपणारे ‘विलास सूर्यवंशी’
बहुआयामी, अष्टपैलू, परोपकारी व बुद्धिजीवी व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. विलास गुलाबराव सूर्यवंशी मुक्काम हंगा हे तालुका. पारनेर जिल्हा अहिल्यानगर गावचे सुपुत्र असून, मुंबईला कला विभागातून बारावी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले लहानपणापासून चुणूकदार स्वभाव अभ्यासू व वाचनाची आवड, कलाक्षेत्राची आवड, त्यामुळे मोठेपणी या सर्व कलागुणांमध्ये त्यांनी नेत्रदीपक प्रगती केली साहित्य, कला, पत्रकारिता व सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रांमध्ये काम करायचे ठरवून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. मुंबई पोर्ट ट्रस्ट सारख्या कायमस्वरूपी स्थैर्य देणाऱ्या व चांगला पगार असणाऱ्या सरकारी विभागात नोकरी मिळाल्यावर आपली नोकरी इमाने इतबारे करण्याचे व नवीन तंत्रज्ञान अवगत करून उद्योगाचे काम करून प्रमोशन मिळवायचे असे ठरवून नोकरीला सुरुवात केली.
आज ते चार्जमन या मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील जबाबदारीच्या व अधिकारी व कामगारांमध्ये दुवा साधण्याचे काम करणाऱ्या चार्जमन पदावर यशस्वीरित्या काम करीत आहेत. कमी माणसांमध्ये अधिक काम करण्याचे आव्हान स्वीकारून वेळप्रसंगी कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांची मदत घेऊन मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील हॉस्पिटल सारख्या अति महत्त्वाच्या विभागात यशस्वीरीत्या काम करीत आहेत. अधिकाऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे काम करणे व करीत असलेल्या कामासंबंधी कोणतीही तक्रार न होणे. ही कामाची कसोटी आहे चार्जमान या पदावर काम करताना श्री. विलास सूर्यवंशी हे या कसोटीला उतरले असून अत्यंत जबाबदारीने व चांगल्या रीतीने अधिकारी व कामगार यांचा समतोल राखून काम करीत आहेत. त्यांचा सामाजिक पिंड असल्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये काम करीत असल्यामुळे कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविड रुग्णांची त्यांनी सेवा केली. त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे व धीर देण्याचे काम केले. त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये व कामगारांमध्ये ते प्रसिद्ध आहेत मुंबई पोर्ट ट्रस्ट व्यवस्थापनाने त्यांचा कोविड योद्धा हा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. हा त्यांच्या कामाचा गौरव आहे.
सामाजिक कामाची आवड असल्यामुळे अभ्यासुवृत्तीमुळे भाषण कौशल्य नेतृत्व गुण संघटन कौशल्य यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी लागल्यावर लगेचच देश पातळीवर नेतृत्व करणाऱ्या व महात्मा गांधीजी यांच्याबरोबर काम करणाऱ्या दिवंगत डॉ. शांती पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखालील मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉइस युनियन या युनियनचे मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील अति महत्त्वाच्या असलेल्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटच्या कामगारांचे कामगार प्रतिनिधी म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. पत्रकारीतेत काम करीत असल्यामुळे संभाषण कौशल्यामुळे कामगारांचे प्रश्न श्री. विलास सूर्यवंशी हे यशस्वीरित्या सोडवितात कामगारांचे प्रश्न अधिकाऱ्यांसमोर प्रभावीपणे व अभ्यास पूर्णपणे मांडून कामगारांना न्याय मिळवून देणे सत्काराच्या किंवा युनियनच्या डिपार्टमेंट मधील मिटिंगचे भारदस्तपणे सूत्रसंचालन करणे, कामगारांना योग्य मार्गदर्शन करणे व सल्ला देणे, कामगारांना प्रमोशन घ्यायला प्रवृत्त करणे, कामगारांना मोजक्या शब्दांमध्ये अर्ज लिहून देणे. इत्यादी गोष्टीमुळे श्री. विलास सूर्यवंशी कामगारांना आपले जवळचे कामगार प्रतिनिधी वाटतात.
आपल्या कार्यामुळे युनियनचे मुख्य पदाधिकारी व मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील अधिकारी यांनी श्री. विलास सूर्यवंशी यांच्या कामाची दखल घेतली त्यामुळे त्यांचे अधिकाऱ्यांजवळ चांगले संबंध प्रस्थापित झाले. युनियनच्या वतीने होणारी आंदोलने, सभा, मोर्चे, सांस्कृतिक कार्यक्रम, गेट मीटिंग समज्याच्या निर निराळ्या आंदोलनामध्ये, सभा बैठकांमध्ये इत्यादी मध्ये श्री. विलास सूर्यवंशी यांचा सक्रिय सहभाग असतो मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील संपूर्ण इलेक्ट्रिक खाते युनियन मध्ये शेवटपर्यंत एक संघपणे संघटितपणे राहिले त्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी काम केले त्या कार्यकर्त्यांमध्ये श्री. विलास सूर्यवंशी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सध्या बरीच वर्ष मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल मध्ये नोकरी करत असल्याने सर्व डॉक्टर जवळ व स्टाफ जवळ त्यांचा जवळचा व स्नेहाचा संबंध आहे. त्यामुळे हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या कामगारांना व कामगारांच्या कुटुंबीयांना विशेष करून वयस्करांना ते सेवाभावी वृत्तीने मदत करतात म्हणून ते कामगारांमध्ये परिचित आहे.
आपल्या कार्यामुळे त्यांनी मुंबई पोर्टर्समध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. देश पातळीवर ३० पेक्षा अधिक राज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे काम नेणाऱ्या मा. ना. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून श्री. विलास सूर्यवंशी काम करतात मा. रामदासजी आठवले साहेब त्यांना जवळून ओळखतात.
पत्रकारिता हा त्यांचा आवडीचा विषय त्यामध्ये त्यांनी भरीव असे काम केले आहे व्यसनमुक्ती, ब्राऊन शुगर, एच आय व्ही, पल्स पोलिओ, हुंडाबळी, गर्द नागरिकांचे विविध प्रश्न व समस्या सामाजिक, धार्मिक विषय, भारताचे संविधान इत्यादी विषयावर श्री. विलास सूर्यवंशी यांनी निरनिराळ्या वृत्तपत्रातून, मासिकातून, दिवाळी अंकातून दर्जेदार सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे व समाजाला दिशा देणारे लिखाण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचाराचा त्यांच्यावर प्रभाव असल्यामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे लढणे हा त्यांचा बाणा आहे. त्याचा प्रभाव त्यांच्या लिखाणातूनही जाणवतो त्यांना काव्य लेखनाची आवड आहे. त्यांच्या व्यसनमुक्ती काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले आहे त्यांनी ब्राऊन शुगर या विषयावर दिलेल्या व्याख्यानामुळे मुंबई स्थानीय लोकाधिकार समिती मार्फत त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे.
विश्वविक्रमी काव्य संमेलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. एप्रिल २०१९ डायमंड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली आहे व राष्ट्रीय प्रमाणपत्र व मेडल त्यांना मिळाले आहे. सर्वोत्तम काव्यरचनेबद्दल दि. भाई संगारे साहित्य दर्पण गौरव पत्र त्यांना मिळाले आहे श्री. शिवाजी मंदिर कला विभाग दादर मुंबई यांच्याकडून त्यांना अभिनय पुरस्कारही मिळाला आहे विविध साहित्य लेखन स्पर्धेमध्ये लक्षवेधी सर्वोत्कृष्ट प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई यांच्याकडून कवियत्री शांताबाई शेळके काव्यरत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
‘मराठीचे शिलेदार’ समूह नागपूर यांच्याकडून काव्यरत्न व साहित्यरत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे. चंदन साई नंदन साई गीतांचा त्यांचा व्हिडिओ अल्बम ती सिरीज येथून प्रकाशित झाला आहे विलास सूर्यवंशी यु ट्यूब चॅनल वर जनजागृतीसाठी दर्जेदार हे सरकार व संविधान गीत आहे अलीकडेच गणेश गीताची त्यांनी निर्मिती केली आहे. ते गीतही युट्युब वर आहे असे बहुआयामी, अष्टपैलू नेतृत्व गुण असलेले साहित्यिक, कामगार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, श्री. विलास सूर्यवंशी समाजामध्ये कामगार क्षेत्रामध्ये साहित्यामध्ये कवी , गितकार, पत्रकार म्हणून सुपरीचीत आहेत. त्यांच्या सामाजिक, कामगार क्षेत्रातील, साहित्यिक क्षेत्रातील काम काजामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी ची पुरेपूर साथ आहे म्हणूनच यशस्वी रित्या काम करू शकले त्यांचा एक मुलगा त्यांचा कलेचा वारसा जोपासत आहे. ते ‘मुंबई पोर्ट’ ऑथरिटी मधून दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा.
विठोबा पवार
कामगार नेते, मुंबई



