“पेटवू या मशाली,मनामनाच्या गाभाऱ्यातील काजळी नष्ट करण्यासाठी”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“पेटवू या मशाली,मनामनाच्या गाभाऱ्यातील काजळी नष्ट करण्यासाठी”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
आज…आज अंतिम निर्णय घेतलाय मी..किती? किती? वाट पाहू अजून.? उणेपुरे सात वर्ष झालेत शिक्षण पूर्ण करून. हाताला फोड येईस्तोवर दगड फोडून मला शिकवले मायबापानं, त्यांचं विंचवाचं बिऱ्हाड मी स्थायी करेल या एकाच आशेवर. पण मी त्यांना सुख देणं तर दूरच राहिलं, पुन्हा बोझ म्हणून आयतं खातोय…किती चकरा मारल्या मी नोकरीसाठी. मरू दे…माझ्या नशिबात आई-वडिलांना सुख देणे नसेलही कदाचित..असं आहे तर मग मला जगण्याचा सुद्धा अधिकार नाही…मी संपवतो स्वतःला कायमचं…!!
खूप ठिकाणी असंच दृश्य पाहतो आपण…निराशेच्या गर्तेत सापडलेली तरुण पिढी टोकाचा निर्णय घेते. पण मला मात्र शेवटी सुरेश भटांच्या या ओळी आठवतात…
उषःकाल होता होता काळ रात्र झाली….
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…..
अर्थात वाईट परिस्थितीवर मात करून पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याची जिद्द….त्याही पुढे जाऊन ते म्हणतात…
धुमसतात अजून विझल्या चितांचे निखारे….
अजूनही रक्त मागत फिरती वधस्तंभ सारे…
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली…
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली….
आजच्या सामाजिक परिस्थितीत अंतर्मुख करायला लावणारे हे शब्द सरळ हृदयाला भेटतात.
उठा रे सारे पेटूनी..
घेऊ मशाल कृतीची.. जपणूक
माणुसकीची.. दुरावलेल्या नात्यांची..
वादविवाद भांडणतंटे यात गुरफटलेल्या मानवासाठी हा काव्यरूपी संदेश क्रांतीची ज्वाला अधिकच प्रज्वलित करतो. मशाल…अर्थात क्रांतीचं, त्यागाचं,प्रकाशाचं,विद्रोहाचं रूप…
तिमिरातूनी तेजाकडे नेणारं खरं स्वरूप… चला… पेटवू मशाली.. खरच पेटवू….खूप ठिकाणी गरज आहे या मशालरुपी क्रांतीची …… अन्यायाला जाळण्यासाठी.. न्यायव्यवस्थेला गती देण्यासाठी… अज्ञानरूपी अंधकाराला दूर सारण्यासाठी…. मनामनाच्या गाभाऱ्यातील काजळी नष्ट करण्यासाठी… मैदानावरील खिलाडू वृत्तीसाठी… बिघडलेल्या राजकीय वातावरणाला नीट करण्यासाठी… जातीभेद नष्ट करण्यासाठी… महिलांवरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी… मशाल पेटवू मनामनाच्या अंतरंगात अन् अंतरंगातील प्रत्येक कप्प्यात…!!
आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी….’पेटवू मशाली’ हा विषय मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी दिला आणि विविध विषयांवरती सर्व कवी कवयित्रींनी आपापल्या पद्धतीने वैचारिक अधिष्ठान बळकट करत कविता प्रस्तुत केल्या. खऱ्या अर्थाने प्रज्वलित मशालीचा ज्ञानप्रकाश आज समूहात सर्वदूर पसरला..तेव्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन..महत्त्वाचे म्हणजे…..सतत लिहित रहा …पर्यायाने त्यासाठी वाचत रहा…!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



