“स्वातंत्र्य आणि समतेचा सूर्य; डॉ.बाबासाहेब आंबेडकर”
कार्तिक झेंडे पाटील ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर

“स्वातंत्र्य आणि समतेचा सूर्य; डॉ.बाबासाहेब आंबेडकर”
१४ एप्रिल १८९१. पिढ्यानपिढ्यांच्या गुलामगिरीला छेद देत स्वातंत्र्य आणि समतेचा लखलखता सूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवाच्या रूपाने उदयाला आला. त्यावेळेसची परिस्थिती फार भयानक होती. अन्याय – अत्याचाराच्या वरवंट्याखाली समाज भरडला जात होता. समाजात विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. सर्वसामान्य नागरिकाला स्वतःचा हक्क मागण्याचीही मुभा नव्हती. जातीभेद, वर्णभेद या विषारी विकृतींमध्ये समाज अडकला होता. आणि अशा वेळेस डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समता, न्याय आणि बंधुता यांचा विचार या देशाला दिला. समाजातील वंचित, शोषित, उपेक्षित, दुर्लक्षित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना त्यांचे हक्क, अधिकार व स्वतंत्र जगण्याचा स्वाभिमान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. भारताच्या संविधानामुळे बाबासाहेबांच्या या विचारांना मूर्त स्वरूप मिळालं. आज आपल्या देशाची राज्यघटना ही देशामधल्या प्रत्येक नागरिकासाठी वंदनीय आहे. कारण, ‘बाबासाहेबांनी लिहिलेली हीच राज्यघटना देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे संरक्षण करते’. बाबासाहेबांचे हे कार्य अविस्मरणीय आहे. पुढच्या येणाऱ्या कैक पिढ्यांसाठी बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा इतिहास हा प्रेरणा देणारा ठरेल.
डॉ.बाबासाहेबांनी समाजातल्या जातिभेदाला मूठमाती दिली. समतेचा विचार आपल्या कृतीतून मांडला. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!” हा बाबासाहेबांनी दिलेला विचार अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द देतो. सामाजिक भेद नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी शेवटपर्यंत लढा दिला. बाबासाहेबांचा जन्म देखील त्याकाळी अस्पृश्य म्हणून गणल्या जाणाऱ्या कुटुंबात झाला. बाबासाहेबांनी लहानपणापासून समाजातील जातीय विषमता जवळून पाहिली. इतकच नव्हे तर ती अनुभवली देखील. समाजातली ही जातीय दरी नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला. त्याकाळी सार्वजनिक पाणवट्यावर पाणी भरण्यासाठी देखील अस्पृश्यांना बंदी घातली जाई. त्यांना पाणी भरू देत नव्हते. समाजातली हीच अन्यायाची वागणूक बाबासाहेबांनी मोडीत काढली. महाडच्या चवदार तळ्याच्या काठावरती उभा राहून चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. स्वतः त्या तळ्यातलं पाणी प्राशन करून दीन दलितांसाठी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी खुलं करून दिले. आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची शिकवण या प्रसंगातून मिळते.
बाबासाहेब जितके करारी, धाडसी आणि जिद्दी होते. तितकेच ते उच्चविद्याविभूषित देखील होते. आपल्या संघर्षाला जर ज्ञानाची जोड असेल तर तो लढा अधिक प्रखर होतो. देश – विदेशातील अनेक नामांकित विद्यापीठातून बाबासाहेबांनी शिक्षण घेऊन अनेक पदव्या संपादन केल्या आहेत. बौद्धिक ज्ञान आणि सामाजिक जाणीव यांचा संगम बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वात दिसतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार या पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे.
ते देशाचे पहिले कायदामंत्री होते. प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वातंत्र्याचा अधिकार देणारे संविधान ही बाबासाहेबांची अलौकिक देण आहे. गुलामीच्या वरवंट्याखाली रगडल्या जाणाऱ्या समाजाने स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला तो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच. हेच सर्वसमावेशक कार्य येणाऱ्या कैक पिढ्यांसाठी दिपस्तंभाच्या भूमिकेत राहणार आहे. बाबासाहेबांचे कार्य ही एक फार मोठी सामाजिक क्रांती होती. संघर्षाची प्रेरणा होती. आणि हीच प्रेरणा प्रत्येक भारतीय नागरिकाची ताकद आहे.
कार्तिक झेंडे पाटील
ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर
=========



