सांग कधी कळणार तुला..भाव माझ्या मनातला..!
तारका रूखमोडे अर्जुनी मोर,जि.गोंदिया
सांग कधी कळणार तुला..भाव माझ्या मनातला..!
‘सांग कधी कळणार तुला..भाव माझ्या मनातला |
रंग कधी दिसणार तुला..लाजणाऱ्या फुलातला ||
अहाहा! किती सुंदर..प्रेमरसात चिंब भिजलेली ही आर्त प्रेमभावना.खरंच काही काही गाणी ऐकता क्षणीच हृदयात घर करतात.आता तर फेब्रुवारी म्हणजे ‘प्रेमाचा महिना’, ‘प्रेम’ ही सृष्टीने मानवाला दिलेली अनमोल भेट,एक पवित्र भावना..! म्हणूनच या महिन्यात हे गीत मनात आवर्जून रुंजी घालू लागते.
आठवतं का?..रमेश देव व सीमा देव या उभयंतावर ‘अपराध’ चित्रपट आकारलेला.गीतकार मधुसूदन कालेलकर व आशा भोसले, महेंद्र कपूर यांच्या अतिशय भावपूर्ण स्वरात चिंब भिजलेला.या चित्रपटात श्याम दाते(रमेश देव) हा नभोवाणी गायक व त्याच्या आजारपणात वसुधा(सीमा देव) ही परिचारिका त्याची सेवा सुश्रूषा करताना दोघेही एकमेकांना आवडू लागतात. दोघांच्या लडिवाळ संवादातून प्रेमाचे कंगोरे उलगडत जातात.दोघांचं एकमेकांकडे चोरून बघणं,नजरेतील त्या नाजूक नजाकतीला स्मित देणं..बघताच पापणीचं लाजेनं चूर होणं.त्याच्या स्मित हास्यात तिचं हरवून जाणं.
त्याच्या समोर बसली असताना नभोवाणीतील त्याच्या आवाजातील बंदिश तिला खुणावू लागते.ती मनातच त्याच्या स्वप्नात हरवून जाते.त्याचा तो हळूवार स्पर्श,ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने जणू मनात तरंग उठतात,तिच्या ओठांवरची लालिमा गडद होत जाते.तिच्या मनरुपी उधाणलेल्या सागरलाटांपरि तिच्या भावनाही उधाणतात..जणू सांगतात जीव गुंतला तुझ्यात.जगणे झाले फक्त तुझे.पण हे फक्त तिच्या मनातील स्वप्नातच. त्याचीही तिच अवस्था,त्याच्याही नजरेत भरतात तिचे तेजस्वी डोळे,बोलका हसरा भाव,सौंदर्य,सात्विकता,नम्रता अशा अनेक भावच्छटा त्याला हळूच उलगडायला लागतात.पण दोघेही तोवर अबोल अव्यक्त असतात.
आणि…सांग कधी कळणार तुला..खरंच त्या दशकात भावछटेच्या नाजूक पात्यांमधून असे हळूहळू सूर छेडले जायचे..हृदयाचे प्रेमकंगोरे असे हळूहळू उलगडायचे.कधीकधी तर दोन चार वर्षही लागायचे भावनारुपी पौर्णिमेच्या आविष्काराला! अगदी अलवार मनोमिलन कधी पत्रातून तर कधी आरक्त नजाकतीतून..असं हे पूर्वीच्या प्रेमाचं मौन स्वरूप.किती गोड ना!
‘प्रेम’ ही अडीच अक्षरी भाषा,हल्ली काळानुरूप बदललीय.हल्लीचं युग हे सोशल मिडियाचं.काळ बदलला पत्राची जागा मेसेज,ई-मेल,स्नॅपचॅटने घेतलीय.सरळ व्यक्त होणं..नाही आवडलं तर क्षणार्धात मोडूनही टाकणं..फसवणंही.त्यामुळे त्या नात्यातील तो गोडवा ओलावा कमी झाल्याचं दिसून येतं.वाटतं खऱ्या प्रेमाची परिभाषाच नव्या पिढीने बदलली की काय? असो काहीही..त्या काळात डोळ्यातून प्रेम व्यक्त व्हायचं या काळात मोबाईलच्या माध्यमातून ते व्यक्त होतं.
प्रेमभाव व्यक्त करण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली तरीही..प्रत्येक जण मात्र यातूनच प्रेमाचा अर्थात सुखाचा भावकोमल किनारा शोधत असतो.निराश मनात जगण्याची आशा,प्रेरणा,इच्छा,गोडी,नवचैतन्य निर्माण करण्याची जबरदस्त ताकद प्रेम भावनेत असते.तुम्हीही प्रेमात पडले असाल तर या ‘प्रेमदिवसाच्या'( व्हॅलेंटाईन डे) हक्काच्या दिनी मूक भावनेस आपल्या जिवलगास एक गुलाब देऊन तर बघा.! मग बघा कसं एका गुलाबाने तिच्या मनात हजारो गुलाब फुलतील..तिचे गाल आरक्त होतील..तिच्या मूक भावना धीट पापण्याखाली झुकतील..जणू तुला पुन्हा खुणावू लागतील..'”खेळ कधी कळणार तुला..दोन वेड्या जिवातला..रंग कधी दिसणार तुला..लाजणाऱ्या फुलातला..सांग कधी कळणार तुला..भाव माझ्या मनातला..!”
तारका रूखमोडे
अर्जुनी मोर,जि.गोंदिया



