“हरवलेली वाट शोधण्यासाठी जिद्द हवी”; वृंदा करमरकर
सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण
“हरवलेली वाट शोधण्यासाठी जिद्द हवी”; वृंदा करमरकर
सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण
दहा वर्षांपूर्वी आम्ही ज्या काॅलनीत राहात होतो तिथंच बाजूला मजुरांची घरं होती. तिथं हौसा, तिचा नवरा सदू , त्यांची दोन मुलं रहात होती. ही नवराबायको दुसऱ्याच्या शेतात मजुरी करत होती. त्यांचं अर्धा एकर शेत होतं. हौसा कोंड्याचा मांडा करत हसतमुखानं संसार करत होती. पण एकदा दुसऱ्याच्या शेताची राखण करायला रात्री गेलेल्या सदूला वादळवाऱ्याचा फटका बसला. अवकाळी पावसात वीज कोसळली, ती त्या शेतातल्या खोपीवर सदू अक्षरशः होरपळून गेला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. हौसा आणि तिची दोन लेकरं उघड्यावर पडली. दु:ख होतं पण, पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न होता. निग्रहाने हौसा उभी राहिली.
दहा घरची धुणीभांडी, स्वयंपाक अशी कामं करू लागली. तसंच तिच्या अर्धा एकर शेतात ती भाजीपाला पिकवू लागली. काॅलनीतील आम्ही सर्व जणी तीची भाजी विकत घेऊ लागलो. त्यामुळं तिच्या संसाराची हरवलेली सुखाची वाट पुन्हा तिला गवसली. खरंच मानवी जीवन हा प्रवास आहे. इथं कितीतरी लहान मोठ्या वाटा माणसाला भेटतात. जसं सागर किनारी बांधलेलं वाळूचं घर लाटेनं वाहून जातं, तसं दु:खाच्या लाटांमुळं माणसाच्या जीवनातील सुखाच्या वाटा हरवतात. पण प्रयत्नपूर्वक त्या शोधल्या तर सापडतात.
सध्याच्या युवा पिढीकडं पाहिलं तर, नोकरी न मिळणं, परीक्षेत अपयश, प्रेमभंग अशा कारणांमुळं त्यांना निराशा येते. मग सुसंस्कारांची वाट हरवून हे तरुण व्यसनांच्या वाटेकडं ओढले जातात. त्या मुलांच्या आईवडलांच्या भवती अंध:कार पसरतो. मग समुपदेशन, डॉक्टरी सल्ला यातून योग्य वाट सापडू शकते. पण त्यासाठी परिस्थिती विरुद्ध लढण्याचं बळ हवं. त्यासाठी संयमाची गरज आहे. किती कुटुंबांमध्ये आता एकोपा आहे? नात्यांचा गोडवा,आपलेपणा जपणारी प्रेमदायी वाट हरवते. मग उरतात विस्कटलेली नाती. आपापसांत दुरावा, ज्येष्ठांची उपेक्षा, कोरडा व्यवहार. यासाठी प्रयत्नपूर्वक संवादाचे पूल बांधून त्यावरून वाटचाल करण्याची गरज आहे.
पतीपत्नीतील विसंवादानं घटस्फोट वाढले आहेत आणि संसाराच्या सुखाच्या वाटा हरवल्या आहेत. त्या शोधण्यासाठी परस्पर सामंज स्याची गरज आहे. तरच विस्कटलेल्या संसाराला सुखाची वाट गवसेल. सध्या हिवाळा आहे. पहाटे धुकं पडतं आणि वाटा धुक्यात हरवतात. धुकं, दवबिंदू या मोहवणाऱ्या गोष्टी आहेत. पण दिल्ली, मुंबई सारख्या शहरांमध्ये धुकं, विषारी धुकं, धुरकं हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. श्वसनाचे विकार बळावत आहेत. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण गरजेचं आहे. या प्रदूषणाच्या धुक्यात आरोग्याच्या वाटा शोधल्या पाहिजेत. एकंदरीत या हरवलेल्या वाटा शोधण्यासाठी प्रचंड संयम, सकारा त्मक विचार आणि जिद्द यांची गरज आहे. आजच्या त्रिवेणी काव्य स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘हरवलेल्या वाटा’ हा विषय वैचारिक आहे. शिलेदारांनी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
वृंदा (चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



