नागपंचमीला श्री नागेश्वर मंदिर, आवास येथे भाविकांची गर्दी
नागपंचमीला श्री नागेश्वर मंदिर, आवास येथे भाविकांची गर्दी
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग: वर्षातून एकदा येणारा श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो. या महिन्यात विविध सण, उत्सव येत असतात. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. हा पवित्र महिना सुरू होताच शेतकरी वर्गाला, कोळी समाजाला वेध लागतात ते नागपंचमीच्या दिवशी आवास येथील श्री नागेश्वर मंदिरात जाऊन श्री नागेश्वराचे दर्शन घेण्याचे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शुक्रवार दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी नागपंचमी निमित्ताने भाविकांनी अलिबाग तालुक्यातील आवास या गावी असलेल्या प्रसिद्ध अशा श्री नागेश्वर मंदिरातील श्री नागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती. भाविक अत्यंत शिस्तीने व रांगेने दर्शन घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ चालूच होती. मंदिरा बाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभर पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतल्याने भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेणे सोईचे झाले. भाविकांना सहज दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी श्री नागेश्वर मंदिराचे पुजारी अनिरुद्ध राणे व अजित राणे यांनी विशेष अशी खबरदारी घेऊन त्या दृष्टीने व्यवस्था केली होती.
सकाळी १० वाजता मंदिरात श्री सिद्धेश्वर प्रासादिक संगीत भजन मंडळ, आवास [ पाठक आळी ] यांचा सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम झाला. गायक भूषण माळवी, पखवाज वादक यतिश शिंदे, तबला वादक सचिन गुरव, ज्ञानेश्वर कदम व सर्व सहगायकांनी आलेल्या भाविकांना मंत्रमुग्ध केले. तसेच रात्री ८ वाजता मंदिरात श्री नागेश्वर प्रासादिक संगीत भजन मंडळ, आवास [ पेठ आळी ] यांचा सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम झाला. गायक विशाल पाटील, पखवाज वादक प्रितेश राऊळ, तबला वादक श्रवण राऊळ व सर्व सहगायकांनी आलेल्या भाविकांना मंत्रमुग्ध केले.
मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात फुलं, हार, नारळ या पूजेच्या साहित्याची तसेच मिठाई, खेळणी, इतर वस्तू यांची दुकाने व छोटी हॉटेल्स थाटली होती. त्यामुळे या परिसराला दरवर्षीप्रमाणे जत्रेचे स्वरूप आले होते. आलेल्या भाविकांची व दुकानदारांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून ग्रुप ग्रामपंचायत आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीत प्रभाकर राणे, उपसरपंच राजेंद्र वाकडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक जयेश पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष खबरदारी घेऊन चोख व्यवस्था केली होती.



