Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

‘मनधरणी’ एक भावनिक साद; वृंदा करमरकर

सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 0

‘मनधरणी’ एक भावनिक साद; वृंदा करमरकर

सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण

आता विश्वात्मक देवे|येणे वाग्यज्ञे तोषावेऻ
तोषोनी मज द्यावे|पसायदान हे||

संत ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वात्मक देवाजवळ साऱ्या विश्वाच्या कल्याणासाठी जे दान मागितलं, ते दान देण्यासाठी आर्ततेने त्या भगवंताची एकप्रकारे ‘मनधरणी’ केली आहे. अर्थात ही मनधरणी अत्यंत निस्वार्थीपणे केलेली दिसते. ‘मनधरणी’ करणे हा शब्द आपल्याला अगदी लहानपणापासून परिचित आहे. शाळेच्या ट्रीपला जाण्याची परवानगी मिळावी, म्हणून आपण कितीदा तरी आईची मनधरणी केलेली आहे. मग वडिलांकडून आपोआप परवानगी मिळायची. पण मोठेपणी सुद्धा मनधरणी करण्याचे प्रसंग आपल्यावर खूपदा आलेले आहेत. अगदी नोकरी करीत असताना रजा मंजूर करण्यासाठी बॉसची सुद्धा मनधरणी करावी लागते. वाद टाळण्यासाठी पती-पत्नीला एकमेकांची, मुलांना आई-वडिलांची तसेच आई-वडिलांना आपल्या रुसलेल्या मुलांची मनधरणी करावीच लागते.

पौराणिक काळात तर, याबाबत द्रौपदीचे उदाहरण देता येईल.द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग. भर राजसभेत तिनं अथिरथी महारथींची हा प्रसंग टाळावा म्हणून एकप्रकारे मनधरणी केली. आपल्या महापराक्रमी पतींकडं पाहिलं. त्यांनी माना खाली घातल्या. शेवटी भगवान श्री कृष्ण तिच्या मदतीला आले. एवढ्या सत्शील पतिव्रतेवर अशी मदत मागण्याची वेळ आली. तर आपल्या सारख्या सर्वसामान्य जनांची काय कथा! माणसाचा प्रतिकूल काळ असतो तेव्हा तर त्याला मदतीसाठी दुसऱ्यांची मनधरणी करावी लागते. पण, जन सुखाचे सोबती, संकट काळी अव्हेरिती असाच अनुभव येतो. सध्या हवामानातील बदल, जागतिक तापमान वाढ यामुळं पावसाचं प्रमाण अनियमित झालं आहे. शेतात बी पेरून पिक हातात येईपर्यंत बळीराजाचा जीव टांगणीला लागतो. त्यात नुकसान झालं तर सरकारची मनधरणी करण्यात त्याची शक्ती खर्च होते. कधीकधी सावकारीच्या फासात त्याची मान सापडते.

सध्या राजकारणाच्या क्षेत्राकडं पाहिलं तर सत्तेच्या बेरीज वजाबाकी त नाराज लोकप्रतिनिधींची मनधरणी करण्यात सत्ताधारी मग्न आहेत. आधी मतं मागण्यासाठी जनतेची मनधरणी, नंतर सत्ता टिकवण्यासाठी मनधरणी यातच त्यांचा वेळ चालला आहे. जनतेचे प्रश्न कधी मार्गी लागणार कुणास ठाऊक? नाती जपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माणसाला त्रास होतो. गैरसमजाचं वादळ शमवण्यासाठी त्याला काही जणांची मनधरणी करावी लागते. पण नाती जपण्यासाठी जर अशी मनधरणी करावी लागली तर अवश्य करावी. एकंदरीत या मनधरणी चं व्यापक रूप आहे असंच म्हणावं लागेल.

सध्या सर्वत्र भक्तीचा दरवळ पसरला आहे. उन्हापावसाची तमा न करता हजारो वारकरी त्या विठू माउलीच्या भेटीची आस मनी ठेवून पंढरीकडं चालले आहेत. त्याच अनुषंगानं आपण विठूरायाची मनधरणी करुया आणि सर्वांना सुख, आरोग्य मिळो असं मागणं मागूया. आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘मनधरणी’ विषय यथायोग्य आहे. शिलेदारांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार!

वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे