‘निखळ आनंद देणारी रानभेट’; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
‘निखळ आनंद देणारी रानभेट’; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
‘रान हे उठले उठले, मुक्त आभाळ झाले,
तिच्या नुसत्या चाहुलीने, भ्रमर गुंगूनी गेले,
‘रानभेट’ दर्शवणारं हे एक जुनं गीत. त्याची प्रेयसी येताच रान किती आनंदी झालं. त्या दोघांची भेट त्या रानात झाली. अर्थात ही एक कल्पनाच.भवताल हिरवाईनं नटलेला. पक्ष्यांचा मस्त किलबिलाट. शेतातील पिकात भरलेले दाणे. झऱ्याची झुळझुळ, पानांची सळसळ, भ्रमरांचा गुंजारव, फुलांचा सुगंध.जणू पाचूमोत्यांनी परिसर सजलेला. त्याच्या मिठीत विसावलेली ती. स्वर्ग सुख साक्षात हेच.
मला आठवलं माझ्या लहानपणी ‘आवळीभोजन’ असे. साधारण दिवाळी नंतर एखाद्या वनराईत आप्तेष्टांसह जेवण करायचं.त्यासाठी प्रत्येक कुटुंब वेगवेगळे पदार्थ करून आणे. तिथं असलेल्या आवळीच्या झाडाची पूजा करून नैवैद्य ठेवायचा.आवळा हा बहुगुणी असतो. मग सहभोजनाचा आनंद घ्यायचा. आम्हा मुलांना तर ही पर्वणीच असायची. मनसोक्त खेळायला मिळायचं. झाडाभोवती फेऱ्या मारायच्या. फुलं गोळा करायची. तेव्हा सेल्फी, स्टेट्स ही भानगड नव्हती. मोबाईल नव्हतेच. मोठे सर्वजण आपाप सात गप्पा मारत. मग उन्हं कलल्यावर घरी परतायचं. निसर्गा समवेत किती आनंद मिळायचा. मनं मोकळी करायची, नाती दृढ करायची ही चांगली संधी असायची.
आता हे हरपत चाललंय. मोबाईल आला आणि मुलं खेळणं, म्हणजे मैदानी खेळ विसरली. सतत त्या आभासी दुनियेत रमली. मोठ्यांचही तेच. आपसातील संवाद हरपत चालले. घरातल्या माणसांशी बोलायला वेळ नाही मग रान भेट, वनभोजन तर दूरच. सध्या शेतीकडंही तरुण वर्गाचं दुर्लक्ष होत आहे. एकतर ज्वारी, बाजरी, कडधान्यांच्या लागवडीखालील क्षेत्र कमी होत आहे. यातील काही पिकं तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. दर्जेदारबियाणांचा अभाव, शेती खर्चापेक्षा दर कमीमिळणं,शेतात काम करणारा मजूर वर्ग न मिळणं ,तसंच सरकार ज्वारी बाजरी , कडधान्य विकत घेत नाही. कदाचित काही वर्षांनी ही पिकं पुढच्या पिढीला चित्रात बघावी लागतील. शेती वाचवण्याची गरज आहे. तसंच निसर्ग संवर्धन अतिशय आवश्यक आहे. प्रदूषणावर मात करणारा तो प्रभावी उपाय आहे.
निसर्गाचं, शेतीचं महत्त्व ओळखून आपण निसर्गाजवळ गेलं पाहिजे. निसर्ग हा खरामित्र आहे. ताणतणाव नष्ट करून निखळ आनंद घेण्या साठी हुरडा पार्टी, वनभोजन, रान भेट आवश्यक आहे. आपल्या आदरणीय राहुल सरांनी आजच्या त्रिवेणी काव्य स्पर्धेसाठी दिलेला ‘रानभेट’ विषय अफलातून आहे. शिलेदारांनी पण स्पर्धेला छान प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन अभिनंदन.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



