हुकमी एक्का शोधायचा असेल, तर पत्त्यांच्या गठ्ठ्यात नव्हे, तर स्वतःच्या अंतरंगात शोधा; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

हुकमी एक्का शोधायचा असेल, तर पत्त्यांच्या गठ्ठ्यात नव्हे, तर स्वतःच्या अंतरंगात शोधा; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा खेळाडू ‘मार्टिन झुबिमेंडी’ याने निर्णायक क्षणी केलेल्या गोलमुळे स्पेनने विजेतेपदावर आपले नाव कोरले. सामन्यानंतर माध्यमांनी त्याला संघाचा “हुकमी एक्का” असे गौरवले. पण त्या क्षणी मनात एक विचार आला खरोखर हुकमी एक्का तो एक गोल होता, की त्या गोलामागील वर्षानुवर्षांची साधना, शिस्त, जिद्द आणि योग्य क्षणी योग्य निर्णय घेण्याची क्षमता? जीवनाच्या पटावरही प्रत्येकजण अशाच हुकमी एक्क्याच्या शोधात असतो. परंतु, तो बाहेर नसून प्रत्येकाच्या अंतर्मनात दडलेला असतो. जीवन म्हणजे नियतीने मांडलेला एक अफाट पट. या पटावर प्रत्येक जीव आपल्या हातात काही पाने घेऊन उभा असतो. कोणाच्या हातात सुवर्णाच्या कडा असलेले पत्ते असतात, तर कोणाच्या ओंजळीत फक्त साधी, जीर्ण पाने. परंतु नियतीचा हा खेळ एक विलक्षण नियम पाळतो. हातात कोणते पत्ते आहेत, यापेक्षा ते खेळणारा माणूस किती मोठा आहे, यावरच अखेरीस विजयाची मुद्रा उमटते.
पत्त्यांच्या खेळातील हुकमी एक्का हा केवळ एक पत्ता नसतो तर तो परिस्थितीला शरण न जाणाऱ्या शक्यतेचे प्रतीक असतो. जिंकण्याचा शेवटचा विश्वास, हरण्याच्या दारात उभे राहूनही विजयाचा शंख फुंकण्याचे धैर्य. पण जीवनाच्या पटावर हा हुकमी एक्का कुठे सापडतो? तो नशिबाच्या खिशात असतो की माणसाच्या अंतःकरणात माणसाच्या आयुष्यातील सर्वांत मोठा हुकमी एक्का हा त्याच्या खिशात नसतो,तो त्याच्या विवेकात असतो. ती त्याच्या बँकेतील शिल्लक नसते, ती त्याच्या मूल्यांतील समृद्धी असते. तो प्रसिद्धीच्या झगमगाटात नसतो, तो अंधारातही न विझणाऱ्या अंतःकरणातील दिव्यात असतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ पराक्रमाच्या जोरावर नव्हे, तर दूरदृष्टी, गनिमी कावा आणि लोकविश्वास यांच्या बळावर स्वराज्याची सुवर्णगाथा घडवली. महात्मा गांधींच्या हातात तलवार नव्हती; सत्य आणि अहिंसा हेच त्यांचे अजिंक्य अस्त्र होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला हुकमी एक्का बनवून लाखो वंचितांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. निसर्गही हेच शिकवतो. पर्वत उंच असतो; पण त्याच्या कुशीतून वाहणारी नदी अखेरीस सागराला कवेत घेते. तिचा हुकमी एक्का सामर्थ्य नसून सातत्य असते. अंधार कितीही गडद असला, तरी एका सूर्यकिरणाचा विजय निश्चित असतो. बीज कितीही लहान असले, तरी त्याच्या अंतःकरणात दडलेली अंकुरण्याची शक्ती हीच त्याची खरी जमेची बाजू असते.
आजचा माणूस दुसऱ्याच्या हुकमी एक्क्याचा हेवा करतो. परंतु त्याला हे उमजत नाही की प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वांत मोठा एक्का अदृश्य असतो. तो आत्मविश्वासाच्या रूपाने मनात वसतो, परिश्रमाच्या रूपाने हातात उतरतो, चारित्र्याच्या रूपाने व्यक्तिमत्त्वात फुलतो आणि ध्येयाच्या रूपाने आयुष्याला दिशा देतो. जग जिंकणारे लोक जन्मतः विजेते नसतात. ते स्वतःच्या भीतीवर विजय मिळवतात. स्वतःच्या अश्रूंना सामर्थ्यात रूपांतरित करतात. स्वतःच्या जखमांमधूनच प्रकाश जन्माला घालतात. म्हणून त्यांचा विजय हा नशिबाचा नसतो तर तो त्यांच्या आत्मबलाचा उत्सव असतो. म्हणूनच, हुकमी एक्का शोधायचा असेल, तर पत्त्यांच्या गठ्ठ्यात नव्हे, तर स्वतःच्या अंतरंगात शोधा. कारण नियतीचा खेळ जिंकणारा पत्ता कागदाचा नसतो असतो तो सत्यनिष्ठेचा, जिद्दीचा, करुणेचा आणि अखंड प्रयत्नांचा बनलेला असतो.
आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी हा सुंदर विषय दिला आणि नेहमीप्रमाणेच हुकमी एक्का सर्वच समूहात चांगलाच बहरला, सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पावसाच्या सरी आपलं अस्तित्व गाजवत आहेत. सोबतच विषयाला योग्य न्याय देत सर्व कवी कवयित्रींनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन..
पण थोडे काही.. साहित्याच्या विश्वात कोणताही शब्द स्वतःहून हुकमी एक्का नसतो. लेखणी जेव्हा अनुभवाने ओलावते, विचारांनी परिपक्व होते, संवेदनांनी उजळते आणि सत्याशी एकरूप होते, तेव्हाच तिच्या प्रत्येक शब्दाला ‘हुकमी एक्का’चे सामर्थ्य प्राप्त होते. पत्त्यांचा एक्का डाव जिंकतो, परंतु विचारांचा एक्का काळ जिंकतो. आणि काळाच्या कसोटीवर टिकणारे साहित्यच खऱ्या अर्थाने अमरत्व प्राप्त करते. सर्व कवी-कवयित्रींना मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या लेखणीतून केवळ कविता नव्हे, तर विचारांची अशी संपदा जन्माला येवो की प्रत्येक रचना साहित्यविश्वातील ‘हुकमी एक्का’ ठरावी. धन्यवाद.
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



