Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भ

“अभिषेक शर्माची धुरंधर कामगिरी”; डॅा अनिल पावशेकर

क्रीडा समीक्षक व स्तंभलेखक, नागपूर

0 4 8 2 9 0

“अभिषेक शर्माची धुरंधर कामगिरी”; डॅा अनिल पावशेकर

क्रीडा समीक्षक व स्तंभलेखक, नागपूर

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपुरातील जामठ्याच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर रंगलेल्या पहिल्या टी ट्वेंटीत अभिषेक शर्माच्या धुरंधर कामगिरीने टीम इंडियाने या मालिकेत विजयी शुभारंभ केला आहे. अभिषेकने रचलेल्या भक्कम पायावर फिनिशर रिंकू सिंगने उत्तम साज चढवला. तर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाजी मारणारा किवी संघ पहिल्या सामन्यात सुमार गोलंदाजीने अपयशी ठरला. ग्लेन फिलिप्स आणि चॅपमन हे दोन्ही धडाकेबाज खेळाडू बाद होताच किवींच्या हातातून सामना निसटला आणि त्यांना ४८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

झाले काय तर आक्रमक सलामीवीर अभिषेकने “आज कुछ तुफानी करते है” मुडमध्ये फलंदाजी करत प्रारंभी न्यूझीलंडला बॅकफुटवर आणले. त्याचे सहकारी संजू सॅमसन आणि इशान किशन अल्पजीवी ठरले. या दोघांनीही वेगवान सुरुवात केली होती परंतु निव्वळ हाणामारी केल्याने कसे होणार? किवी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना वेसण घालायला चेंज ॲाफ पेस, पेस ॲाफ चे क्लुप्ती वापरली, त्यात ते यशस्वी ठरले. तरीही अभिषेक वर त्याचा प्रभाव पडला नाही. त्याने संयम, आक्रमकतेचे अफलातून मिश्रण दाखवून टोलेबाजी करत किवींच्या तोंडचे पाणी पळवले.

ज्याप्रकारे अभिषेकने सुरुवात केली ते पाहता टीम इंडिया अडीचशेचा टप्पा नक्कीच गाठू शकली असती पण मिडल ऑर्डरला सूर्या, दुबे आणि हार्दिक पांड्या हे अपेक्षेपेक्षा लवकर बाद झाले. मात्र तोपर्यंत अभिषेक सूर्याच्या ४७ चेंडूत ९९ धावांच्या भागीदारीने डाव रंगात आला होता. खरेतर हार्दिक पांड्या, शिवम दुबेचा मौसम चालू होतो शेवटच्या पाच षटकांत आणि तिथेच ते कमालीचे बहरतात. मात्र या दोघांची कसर पूर्ण केली ती रिंकू सिंगने. टी ट्वेंटीत शुभमन “गील या गारगोटी साठी सॅमसन आणि रिंकू या हिरा मोतीला” बराच काळ वनवास भोगावा लागला आणि संघाला काही सामने सुद्धा गमवावे लागले होते.

या सामन्यात रिंकू सिंगने संधीचे अक्षरशः सोने केले. त्याने अक्षर पटेल सोबत १३ चेंडूत २४ धावांची तर अर्शदीप सोबत १३ चेंडूत २९ धावांची बहुमूल्य वेगवान भागीदारी करत आपल्या संघाला फिनिशिंग टच दिला. वास्तविकत: अर्शदीपने मॅच अवेअरनेस दाखवत १९ व्या षटकात रिंकू सिंगला स्ट्राईक दिली असती तर धावसंख्या आणखी फुगली असती, तिच गोष्ट पांड्याची. तो दोन तीन षटके आणखी टिकला असता तर विजयाचा फरक खूप मोठा झाला असता. मात्र आता अशा जर तर चा काही उपयोग नाही. पण याची कसर किवी गोलंदाज डॅरेल मिचेलने भरून काढली.

शेवटचे षटक किंवा डेथ ओव्हर्स मध्ये तज्ञ गोलंदाज हवा असतो. किवी कर्णधार सॅंटनरने तिथे डॅरेल मिचेलला गोलंदाजी देत आ बैल मुझे मार केले. संपूर्ण सामन्यात एकदाही गोलंदाजी न केलेल्या मिचेलला स्थिरावलेल्या रिंकू समोर उभे केले गेले. कसाया समोर प्राण्यांचे जे हाल होते, तेच डॅरेल मिशेलसोबत झाले. फिनिशर रिंकूने विसाव्या षटकात दोन षटकार दोन चौकार ठोकत २१ धावांची लयलूट केली. १९ षटकापर्यंत मर्यादित असलेली धावसंख्या २३८ वर जाताच सामन्याचे मोमेंटम पुर्णत: टीम इंडीया कडे शिफ्ट झाले.

याचाच दबाव किवी फलंदाजांवर दिसला. त्यांच्ये पहिले दोन बळी निव्वळ घाईगडबडीत गेले. अर्शदीपने नेहमीप्रमाने विकेटची बोहनी केली तर रचिनची घाई पांड्याच्या पथ्यावर पडली. सातव्या षटकात पन्नाशीत तिसरा बळी जाताच हा सामना टीम इंडिया सहज जिंकेल असे वाटत होते परंतु ग्लेन फिलिप्स आणि चॅपमनने सामन्याची सुत्रे हाती घेत मैदान गाजवले. या दोघांनी ४२ चेंडूत ७९ धावांची भागीदारी करत टीम इंडियाला घाम फोडला. अर्थातच ३९ धावांवर फिलिप्सला धावबाद करायची सोपी संधी संजू सॅमसन ने दवडली. तर चॅपमनला १५ धावांवर रिंकूने जीवदान दिले.

मात्र सातत्याने १४ ची धावगती कायम राखतांना किवींचे बळ अपुरे पडले. फिलिप्स, चॅपमन बाद होताच किवींच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या. भलेही ग्लेन फिलिप्स ने जवळपास अभिषेक सारखी फलंदाजी करत सामन्यात थरार निर्माण केला परंतु त्यांच्याकडे रिंकू सारखा फिनिशर नव्हता. खरेतर हाच फॅक्टर या सामन्यात महत्वाचा ठरला आणि दोन्ही संघातील अंतर स्पष्ट करून गेला. नाव मोठं लक्षण खोटं ठरलेल्या खेळाडूंपेक्षा रिंकू सिंग सारखा टी ट्वेंटी स्पेशलीस्ट खेळाडू संघात असला तर काय फरक पडतो याचा हा सामना म्हणजे उत्तम उदाहरण होय.

थोडक्यात काय तर अभिषेकचे फलंदाजीतले धुमशान, रिंकूचा फिनिशिंग टच, डॅरेल मिचेलचे विसावे महागडे षटक, फिलिप्स चॅपमनची अपयशी झुंज ही या सामन्याच्या ठळक बाबी ठरल्या.

—————————————————
दिनांक २२ जानेवारी २०२६
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
—————————————————

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे