प्रवरेच्या फुलांविषयी
अनिता अनिल व्यवहारे ता श्रीरामपूर जि अहमदनगर
प्रवरेच्या फुलांविषयी
प्रवरा माईच्या तीरावरील श्री हरिहर केशव गोविंद महाराजांच्या बिल्वपुरीतील विद्या मंदिरात कर्म साधना करताना “माझी माय सरसोती, मले शिकविते बोली” या बहिणाबाईंच्या ओळींची प्रचिती मला आली आणि त्यातून माझी शब्दामृत सरिता फुलून आली म्हणूनच ‘प्रवरेची फुले’ हा काव्यसंग्रह साकारण्याची संधी मला मिळाली. ‘मराठीचे शिलेदार’ समूह नागपूर यांच्या प्रेरणेतून माझी काव्यमाला बहरत गेली. सामाजिक बांधिलकीची जाणीव मनात रुजविताना जीवनाच्या रंगमंचावरची मी एक कलाकार म्हणून नवनवीन भूमिका साकारताना शब्द शब्द गुंफून काव्य साकारीत गेले.
ज्या सावित्रीने आम्हाला घडविले, त्या स्त्री शक्तीचा दारोदार जागर व्हावा यास्तव त्यांच्याच कर्तुत्वाचा धडा घेत बुद्धी आणि मनातील भावनांचे मिश्रण एकत्र केलं. शिलेदार समूहातील मा. प्रशासक, परीक्षक आणि प्रगल्भ वाचक यांचेकडून मिळालेले प्रोत्साहन माझ्या प्रवरेच्या शब्द फुलांना सुगंधित करीत गेले. त्यांच्या सहकार्यातूनच माझं लेखन विस्तारत गेलं. त्यामुळेच वाचन संस्कृती लोप पावत चाललेली असतानाही मी लिहू लागले. माझ्या या लेखन प्रवासात ज्या विद्यामंदिरात मी ज्ञानदानाचे कार्य करते त्या बालगोपाळांची माझ्यावरील कृपा थोरामोठ्यांचा आशीर्वाद कौटुंबिक प्रोत्साहन या सर्वांचीही मला यात साथ मिळाली.
आज रसिक वाचकांना एवढीच विनंती की, माझ्या चिंतनशील प्रतिभेतून बनलेल्या या दवाच्या थेंबांची सरिता खळखळून वहावी यासाठी आपले आशीर्वाद मला लाभावेत याकरिता आपणही माझ्या कवितेचे वाचक व्हावे. यातूनच मला लेखनाला प्रेरणा मिळेल आणि असं वाटेल. ‘प्रवरेची फुले’ हा पहिलाच कविता संग्रह रसिकजनांच्या हाती देताना मला विशेष आनंद होत आहेच. मात्र या काव्यस्वप्नांचे जे भागीदार आहेत त्यांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते.
अध्यापन आणि संसाराची जबाबदारी पेलताना माझ्या छंदाला माझ्या कुटुंबाचे पाठबळ व प्रोत्साहन लाख मोलाचे आहे. त्याचप्रमाणे ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे अध्यक्ष आदरणीय राहुल दादा यांचे विशेष सहकार्य, मुख्य सहप्रशासक सौ. वैशालीताई, प्रशासक सौ. सविताताई, परिक्षक श्री विष्णू संकपाळ दादा यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन सुद्धा या कामी उपयुक्त ठरले. तसेच माझ्या कवितेला सातत्याने प्रेरणारूपी बळ देणारे समूहातील सर्व सहकारी या सर्वांची ही मी ऋणी आहे. कारण या सर्वांचे लेखन अवलोकन करत करतच माझेही काव्य बहरले. त्यामुळे या टप्प्यावर पोहोचण्यास ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचा खूप मोठा वाटा आहे.
“जग जग माझ्या जीवा, असं जगणं तोलाचं,
उंच गगनासारखं, धरीत्रीच्या रे मोलाचं”
आपल्या स्नेहाचा सुगंध मी अंतकरणात असाच जपून ठेवून लेखन कार्याचा वसा चालू ठेवण्याचा प्रयत्न करील.
अनिता अनिल व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर



