‘नशा’ करी जीवनाची ‘दुर्दशा’
श्याम राठोड कारंजा लाड जिल्हा वाशिम
‘नशा’ करी जीवनाची ‘दुर्दशा’
आधुनिक काळात कुटुंबाची परिभाषा बदलली आहे. कोणतेही कुटुंब जीवन जगत असताना, त्यांची सुखाची लालसा वाढते. मग सुखाच्या मागे धावते, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्या समस्येमुळे मानसिक संतुलन ढासळते, मानसिक संतुलन ढासळल्यामुळे माणूस कुठल्यातरी वाईट बाबीशी संगत करतो. असे करता करता चांगल्या विषयापासून परावृत्त होतो आणि एक दिवस तो व्यसनाच्या आहारी जातो. साधारण 80 ते 90 टक्के व्यसनी लोकांना व्यसन सुरू होण्यापूर्वी नैराश्य आलेले असते. निराश व्यक्ती सुखासाठी आसुसलेला असतो त्यामुळे तो व्यसनाच्या जाळ्यात अडकतो. सुरुवातीला थोडं थोडं
व्यसन करता करता प्रमाण वाढू लागते ,आणि व्यसन करणे अत्यंत आवश्यक होऊन बसते.
माणसाला कळतच नाही आणि एक सहज गोष्टच अत्यावश्यक व्यसन बनते. हा काळ पूर्ण होईपर्यंत व्यसनी पदार्थाचा शरीरावर वाईट परिणाम होत असल्यामुळे ते परिणाम मेंदूपर्यंत सक्रिय होतात. आणि मग त्यात गुंतून राहतो ,त्या सवयीचा गुलाम होतो, मनावरचा ताबा सुटून मग वाईट सवयीकडे मन वळू लागते आणि आणि ती नंतर व्यसन होऊन बसते. जुगार लावणी ,दारू पिणे , चरस, गांजा, भांग, अशा अनेक व्यसनाच्या आहारी जाऊन व्यक्ती बरबादीकडे त्याची वाटचाल सुरू होते. हे विषय करत असताना तो मानसिकरित्या सक्षम नसतो आणि या वाईट सवयीमुळे अनेक दुष्परिणाम स्वतःवर आणि परिवारावर सुद्धा होऊ शकते .आपण या बाबीकडे गांभीर्याने पाहावे अन्यथा अनेक वाईट प्रसंग उद्भवू शकतात.
व्यसनी व्यक्तीचे मानसिक ,धार्मिक ,आर्थिक ,सामाजिक नुकसान होते. आई वडील, पत्नी, लहान मुले या सर्वांवर परिणाम पडतो. कधीकधी संपूर्ण परिवाराचं नुकसान होते. व्यसनी माणसामुळे कुटुंबातील व्यक्तींना अनेक त्रासाला सामोर जावे लागते. त्यामुळे घरातील आई वडील किंवा पत्नीला आजार जडतो, आणि मग वैद्यकीय उपचारासाठी खर्च वाढतो अशा प्रकारे परिवाराला यातना भोगावे लागते.
व्यसनाचे दुष्परिणाम:
व्यसनामुळे काही त्वरित परिणाम जाणवतात, तर काही दीर्घकालीन समस्या बनून जातात. त्वरित परिणामामुळे घरात वाद विवाद वाढतात. मन संशयी होतोय. खर्चासाठी वाटेल त्या बाबीकडे तडजोड करतो. नुकसानाबद्दल मनात दुःखाचा भाव निर्माण होत नाही, मन कमकुवत होते त्यामुळे व्यसनी झाल्यामुळे अशी मानसिक लक्षणे दिसू लागतात. आपण व्यसनी आहोत ही बाब नाकारली जाते. व्यसनाची जबरदस्त ओढ लागू लागते, फक्त व्यसनाचा विचार करतो. नकारात्मक भावना वाढीस लागते मग त्यातून मुक्त होण्याची त्यांची इच्छाच संपते.
मग आरोग्याची प्रश्न समोर येतात, रोगप्रतिकार शक्ती कमी होते अशामुळे तो नेहमी आजारी होत राहतो. समाजात सुद्धा किंमत नसते, सामाजिक संपर्क नकोसा वाटतो, एकटेपणा पुन्हा वाढते व मनावर सुद्धा ताण येतो आणि तानातून नैराश्य, नैराश्यातून आत्महत्या किंवा वाईट कृत्य हातून घडते. कधी कधी अपघात घडतात त्यातून कुटुंबप्रमुख हा व्यक्ती जर अपघाताला बळी पडला तर सारे कुटुंबच उध्वस्त होताना दिसतात. व्यसन न केल्यामुळे कधी कधी थरथर कापणे ,घाम येणे ,नाडीचे ठोके वाढणे ,अशी लक्षणे वाढू लागतात. व्यसनी व्यक्ती समाज ,मित्र, कुटुंबापासून दूर जातो. मनावरील नियंत्रण सुटते त्यामुळे वादविवाद होण्याची शक्यता असते अशा प्रकारे व्यसनाची दुष्परिणाम जाणवतात.
व्यसन मुक्तीचे उपाय:
व्यसनी माणसाची व्यसन सोडवायचे असेल, तर सारे कुटुंब मिळून त्याला सकारात्मक भावना वाढीस लागून त्यावर उपचार केला पाहिजे, तर निश्चितच व्यसनमुक्त होऊ शकतो. परंतु ज्या व्यक्तीला व्यसन जडलेला आहे, त्यांची मानसिकता हवी की मी व्यसनमुक्त झालो पाहिजे. त्यांची इच्छा हवी त्यावर टिकून राहण्याचा निर्धार हवा. व्यसनी व्यक्तीवर टीका केली जाते, त्यामुळे त्याला मनस्ताप होऊ शकतो. त्यासाठी त्यांनी मनाची शक्ती वाढविली पाहिजे. मनाची शक्ती वाढविली आणि निर्धार केला तर निश्चितच व्यसनमुक्त होऊ शकतो. त्या व्यक्तीने जर ठरविले की आपण व्यसन मुक्त व्हायचं आहे तर ती निश्चित होऊ शकते.
कारण व्यसनामुळे माझे सामाजिक, धार्मिक, आर्थिक , कौटुंबिक नुकसान झाले हे मान्य करावे. आणि नुकसान होत आहे याची जाणीव असावी. माझ्या हातून चुका झाल्या हे कबूल करून ती पुन्हा होणार होऊ देणार नाही. याची काळजी घ्यावी, मुलाकडे, पत्नीकडे, आई-वडिलाकडे जबाबदारी पूर्वक पाहणे. माझ्यामुळे माझ्या कुटुंबातील व्यक्तीला त्रास होऊ देणार नाही याची काळजी घ्यावी व आवश्यक बाबीकडे लक्ष द्यावे. आवडीच्या गोष्टीकडे लक्ष वेधणे किंवा संगीताकडे वळणे, गायन ,वादन ,आवडीचे छंद जोपासणे, शरीराला आवश्यक असलेल्या बाबीकडे लक्षपूर्वक उपचार करणे शरीर व मनाचे सहसंबंध ठेवणे, परिस्थितीशी जुळून घेणे, आव्हान स्वीकारणे, हलका व्यायाम करणे, सकारात्मक विचार करणे या साऱ्या गोष्टी करीत असताना काही वेळा मनावर आघात होऊ शकतो. तेव्हा मन विचलित न होऊ देता हे टाळण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. उपाशी अजिबात राहू नये रागावर नियंत्रण ठेवावे.
कारण राग, अनादर, दुःख, तणाव नंतर व्यसन ही साखळी तयार होते त्यामुळे पुन्हा व्यसनाकडे जाऊ शकतो. म्हणून एकटे राहू नये किंवा नेहमीच चांगल्या कामात मनाला गुंतवून ठेवावे. देवा विषयी जो भाव मनात असेल त्याविषयी निसंकोच राहावे. आणि ईश्वर हे अंतिम सत्य आहे हे मान्य करावे. कारण सकारात्मक विचार किंवा ईश्वराविषयी असलेली भक्ती किंवा विश्वास बळ देणारी आहे हे सत्य आहे.
व्यसनमुक्त प्रवासाचा विचार केला असता जीवनात अनेक वाईट प्रसंग आले असेल. या प्रसंगामुळे माझे किती वाईट झाले. याचा विचार करावा आणि निर्धार करावा. व्यसन ते व्यसन मुक्त हा प्रवास कठीण आहे. परंतु व्यसनमुक्त होणे अशक्य नाही, शक्य आहे. व्यसन सोडताना पुन्हा पुन्हा असे प्रसंगाची आठवण येते. पण निर्धार करावा सकारात्मक विचार करा व्यसन सोडायची प्रामाणिक तीव्र इच्छा असेल, तर अशक्य काही नाही. प्रामाणिकपणा तीव्र इच्छा या गोष्टी म्हणजेच व्यसनमुक्तीचा पाया आहे म्हणून, ‘नशा करी जीवनाची वाईट दशा’ यापासून परावृत्त व्हावे.
श्याम राठोड
कारंजा लाड जिल्हा वाशिम
=========



