स्वरगंगा गाणे- तराने
अनिता व्यवहारे ता.श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
स्वरगंगा गाणे- तराने
“आओ बच्चो तुम्हे दिखाये झाँकी हिन्दुस्थान की,
इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की”
‘वंदे मातरम !वंदे मातरम..!!’
जय हिंद! जय भारत!! घोष जगी दुमदुमला.. आपला भारत देश स्वतंत्र झाला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनाम वीरांना शतशः नमन. स्वातंत्र्याच्या काळापासून देशभक्ती, देशप्रेम प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजलेलं होतं. आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीने हे ‘प्रेम आणि उत्कटता’ खूप छान व्यक्त केली आहे. काळ आला नि गेला…. पण तरी ही गाणी अजूनही अजरामर तर आहेतच पण त्यांची लोकप्रियता वाढतच चालली आहे.. असेच 1954 साली आलेल्या जागृती या चित्रपटातील, “आओ बच्चो तुम्हे दिखाये झाँकी हिन्दुस्थान की” हे गाणं मुलांना स्वातंत्र्याची किंमत समजायला मदत करते.
सदाबहार गाण्यांचा प्रत्येक शब्द हा जणू सारस्वत ग्रंथच …… इतके अप्रतिम बोल लिहिणारे गीतकार, कवी प्रदीप कुमार यांनी हे गीत फक्त लिहिलेलंच नाही, तर आपल्या आर्द्र सुमधुर स्वरात सूरमणीमय केले. याला संगीताचा साज आणि बाजाने सजवले संगीतकार हेमंत कुमार यांनी. आपल्या भारताचा इतिहास, भूगोल, निसर्ग या गाण्यातून प्रतीत होतो. ही देशप्रेमाची नव्हे तर त्यागाची भूमी आहे. म्हणून “वंदे मातरम” या मातृभूमीला वंदन करू या..!
“उत्तर में रखवाली करता पर्वत राज विराट हैं,
दक्षिण में चरणोंको धोता सागर का सम्राट है”
या भारत भूमीचे चरणतल धुणारा महासागर जणू महासम्राट…. यमुनेच्या तीरावर गंगेचा घाट… वाटेत ठिकठिकाणी स्वर्गीय घरांचा जणू काही एक वेगळाच झगमगाट.. या साऱ्या मधून जणू खळखळ वाहणारा अभिमान… या अभिमानाला साजेसा असा
“ये हैं अपना राजपुताना नाज इसे तलवारों पे,
इसने सारा जीवन काटा बरछी तीर कटारों पे..”
स्वतःचं आयुष्य बाणाच्या टोकावर घेऊन जन्मभूमीसाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे वीर, राजस्थानच्या हजारो पद्मिनीनी इथे जळत्या निखाऱ्यावर उड्या मारत स्वतःला स्वातंत्र्यसंग्रामात झोकून दिलं… अशा या भूमीच्या मातीचा टिळा कपाळी लावून ‘वंदे मातरम’ म्हणत रहावे असेच हे गीत… मराठ्यांचा छत्रपती शिवाजीराजांनी देखील “मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था” आणि अशा वेळी “हर परबत पे आग जली थी, हर पत्थर इक शोला था” असे असताना वीर शिवाजींनी स्वराज्याची आन बान आणि शान जपली होती. देशाची लाज राखली होती.
सारस्वत ग्रंथाची संस्कृती जपत देशाच्या कानाकोपऱ्यातून जणू “बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था”. छातीवर गोळ्या झेलीत रक्ताची होळी खेळणाऱ्या बलिदान करणाऱ्या क्रांतिवीर आणि विरांगना यांना वंदन करू या. आणि गाऊ या..
“इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की” वंदे मातरम’.. स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा दारापर्यंत आला आहे. त्याचे स्वागत करण्यासाठी हे गीत गाऊ या…. देशप्रेमाचा गौरव करू या….!! अशा गीतातून कायमच देश प्रेम बहरत राहो हीच शुभेच्छा..!!
अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
=========



