काव्यगंधाची उधळण करीत सरला ‘गौरव अभिजात मराठी सोहळा २०२५’
प्रशांत दत्तात्रेय ठाकरे
काव्यगंधाची उधळण करीत सरला ‘गौरव अभिजात मराठी सोहळा २०२५’
विक्रमी उच्चांक गाठत तब्बल २२ कविता संग्रहाचे प्रकाशन
छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीत ‘मराठीचा गजर’
मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे सर्व साहित्यिकांचा मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार
‘मराठीचे शिलेदार’ बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे आयोजित ‘गौरव अभिजात मराठी २०२५’ कार्यक्रमात भव्य दिव्य राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद सभागृह छत्रपती संभाजी नगर येथे नुकताच संपन्न झाला. मराठवाड्याचे लोकप्रिय शिक्षक आमदार आदरणीय विक्रम काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याचे उद्घाटक प्रभारी प्राचार्य डॉ.पद्माताई जाधव वाखुरे होते. सदर कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर बुलढाण्याचे सचिव नरेश शेळके, शिवव्याख्याते डॉ.बालाजी जाधव, शिवव्याख्याते ए.बी.पठाण, मराठीचे शिलेदार समूहाचे विश्वस्त प्रमुख अरविंद उरकुडे ,अशोक लांडगे, ज्येष्ठ कवयित्री साहित्यिका स्वाती मराडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
माय मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर भाषा सक्षमीकरणाच्या उदात्त हेतूने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजक मराठीचे शिलेदार समूह बहुउद्देशीय संस्था नागपूरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राहुल सर्व त्यांची प्रशासक टीम होती. छत्रपती संभाजी नगर येथील आयोजन समितीमध्ये डॉ.पद्माताई जाधव, विजय शिर्के, विष्णू संकपाळ,अकील पठाण, वर्षां मोटे व प्रशांत ठाकरे इत्यादी सदस्यांनी मोलाची कामगिरी बजावली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार विक्रम काळे साहेबांनी मराठीचे शिलेदार समूहाचे मनापासून कौतुक केले व मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध व्हावी यासाठी शिलेदार सैनिक करत असलेल्या प्रयत्नांची वाहवा केली. सोबतच येणाऱ्या काळात प्रत्येक शाळेत मराठी विषय शिकवण्यावर भर असेल व त्यासाठी शासनाच्या प्रयत्नांची ही माहिती दिली. आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. पद्माताई जाधव यांनी मराठीच्या सक्षमीकरणासाठी राबवत असलेल्या अनेक उपक्रमांची थोडक्यात ओळख करून दिली व येणाऱ्या काळात साहित्य विश्वाला अनेक नवीन साहित्य लाभणार असल्याचे अभिमानास्पद उद्गार यावेळेस काढले. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून आदरणीय नरेश शेळके यांनी ‘मराठी हीच आपली मातृभाषा आहे व मराठीतून शिकाल तरच टिकाल हे अधोरेखित करताना माय मराठीच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज विशद केली’. प्रसिद्ध शिवव्याख्याते व कीर्तनकार डॉ. बालाजी जाधव यांनी मराठीच्या सार्वत्रिकरणावर भर दिला. तर ए.बी. पठाण यांनी मराठी हीच आपली कर्मभाषा असल्याचे गौरव उद्गार यावेळेस काढले.
याप्रसंगी तब्बल २२ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन झाले. सर्व सन्माननीय अतिथींच्या हस्ते गौरव अभिजात मराठी २०२५ या विशेषांकाचे ही प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले. सोनप्रहर, मंगलता, काव्यसाधना, सख्या रे, काव्यांजली, विराजणीय भाग २, आठवांचे निखारे, अशा अनेक काव्यसंग्रहांच्या रूपानं मराठीचे साहित्य अधिकाधिक समृद्ध करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सर यांनी माय मराठीच्या सक्षमीकरण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून संस्थेद्वारा करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची उपस्थित यांना ओळख करून दिली व येणाऱ्या काळात त्यांच्या मनात असलेल्या भाषा सक्षमीकरणाच्या अनेक संकल्पनांची उपस्थित यांना कल्पना दिली.
याप्रसंगी सर्व सन्माननीय अतिथीसह मान्यवरांचा सत्कार सोहळाही आयोजित करण्यात आलेला होता. द्वितीय सत्रात ‘राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेत जवळपास 58 कवी कवयित्रींनी भाग घेतलेला होता. यात पुणे जिल्ह्यातील कवयित्री सिंधू बनसोडे यांचा प्रथम क्रमांक, सिंधू बोदले यांचा द्वितीय क्रमांक, तर ज्येष्ठ साहित्यिक नागोराव सोनकुसरे यांचा तृतीय क्रमांक आला. यात प्रथम 3000 रुपये द्वितीय 2000 रुपये व तृतीय 1000 रुपयाचे रोख पारितोषिक व उत्तेजनार्थ प्रत्येकी 500 रुपयाची दहा पारितोषिके मुख्य अतिथींच्या हस्ते वितरित करण्यात आले. काव्यवाचन स्पर्धेसाठी मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध कवयित्री व लेखिका सौ अनिता व्यवहारे, अहिल्यानगर यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार वितरीत करण्यात आले.
मुख्य आयोजक व उद्घाटक डॉ पद्माताई जाधव वाखुरे यांच्याकडून सुरुची भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठीचे शिलेदार समूहाचे सहप्रशासक सौ. वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर, सौ. सविता पाटील ठाकरे, सिलवासा, सौ. तारका रूखमोडे, गोंदिया, सौ उर्मी घरत, पालघर, सौ. प्रतिमा नंदेश्वर, चंद्रपूर, सौ. वृंदा करमरकर, सांगली, श्री. विष्णू संकपाळ, छ. संभाजी नगर, श्री. संग्राम कुमठेकर, लातूर, श्री. हंसराज खोब्रागडे, गोंदिया, श्री. प्रशांत ठाकरे, सिलवासा, श्री. रजत डेकाटे, नागपूर, सौ. स्वाती मराडे आटोळे, पुणे, सौ. शर्मिला देशमुख घुमरे, बीड यांचेही बहुमोल सहकार्य लाभले. या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठीचे शिलेदार समूहाच्या मुख्य परीक्षक व प्रशासक तथा कोषाध्यक्ष सविता पाटील ठाकरे, प्रशांत ठाकरे व विष्णू संकपाळ यांनी केले तर आभार आयोजक व कवयित्री वर्षा मोटे पंडित यांनी मानले. आयोजित समारंभास मराठवाड्यातील तसेच महाराष्ट्राबाहेरील काव्यप्रेमी, कवी, कवयित्री, लेखक, लेखिका, पत्रकार शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत दत्तात्रेय ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
आयोजक व सहप्रशासक
मराठीचे शिलेदार समूह



