श्री काळभैरव तालीम संघ, आवासचे कुस्ती स्पर्धेत सुयश
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

श्री काळभैरव तालीम संघ, आवासचे कुस्ती स्पर्धेत सुयश
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: (गुरूवार दि. २४ सप्टेंबर २०२६ ) रोजी अलिबाग तालुक्यातील नेहुली येथे विनोद विष्णू पाटील व ग्रामस्थ, नेहुली यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने भव्य – दिव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक / माजी प्राचार्य, तथा रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस, रायगड भूषण प्रमोद मनोहर भगत सर यांच्या अथक परीश्रमातून व बहुमोल मार्गदर्शनातून घडलेल्या पैलवानांच्या श्री काळभैरव तालीम संघ, आवासने नेत्रदिपक खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली आणि या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
संघातील अंश धोंडसेकर या पैलवानाने अंतिम कुस्तीत अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करीत कल्याण [ सरवली ] येथील तेजस माळी या पैलवानाला सुंदररीत्या चितपट केले. आयोजकांच्या वतीने श्री काळभैरव तालीम संघ, आवास मधील विजयी पैलवानांना वैयक्तिक पारितोषिके तर संघाला आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच अंश धोंडसेकर या अंतिम कुस्ती विजेत्या पैलवानला १०,००० रुपये रोख रक्कम पारितोषिक देण्यात आले.
श्री काळभैरव तालीम संघ, आवासचे प्रशिक्षक प्रमोद मनोहर भगत सर व सर्व यशस्वी पैलवानांचे अलिबाग तालुका पंचायत समिती माजी सदस्य रणजीत प्रभाकर राणे, अलिबाग तालुका पंचायत समिती विद्यमान उपसभापती प्रिया प्रमोद भगत, ग्रुप ग्रामपंचायत आवासच्या सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीत प्रभाकर राणे, उपसरपंच राजेंद्र वाकडे, सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आवास व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच कुस्ती प्रेमी कडून श्री काळभैरव तालीम संघ, आवास मधील सर्व पैलवान व प्रशिक्षक प्रमोद मनोहर भगत सर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



