Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

पूजेची किंवा ईश्वर आराधनेची विविध स्वरूपे

डॉ. अविनाश प. परांजपे. वानाडोंगरी, जि.नागपूर

0 6 2 8 1 8

पूजेची किंवा ईश्वर आराधनेची विविध स्वरूपे

ईश्वराच्या आराधनेची विविध रुपे समाजात आढळतात. प्रत्येक व्यक्तिनुरुप या पूजेचे स्वरूप वेगवेगळे असते. प्राचीन ग्रंथ संपदेच्या अनुसार या पूजेची किंवा ईश्वर आराधनेचे स्थूल मानाने तीन मुख्य प्रकार म्हणजेच स्वरूपे आहेत. ज्या द्वारे मानव त्या सर्वशक्तिमान परमेश्वराशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो. ती तीन स्वरूपे म्हणजे, कायाद्वारे, वाचेद्वारे व मन मार्गे. त्यातील पहिले म्हणजे ‘काया’ म्हणजेच शरीराच्या द्वारे परमेश्वराशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे. ह्याचे अनेक पोट प्रकार आहेत. ह्यालाच बाह्य पुजा असे नाव आहे. या स्वरुपाच्या आराधनेत, ईश्वराला देखील काया म्हणजेच शरीर स्वरूपाचा असल्याचे मानून त्याच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची भौतिक साधने वापरुन पूजा करण्याचा प्रघात आहे. यात पंचोपचारपुजा षोडशोपचार पुजा वगैरे प्रकार येतात.

ज्यामधे ईश्वराच्या मूर्ती किंवा प्रतिमेस आवाहन करणे, हस्त प्रक्षालन मुख प्रक्षालन म्हणजे मूर्तीचे हात पाय धुणे, स्नान अभिषेक घालणे, चन्दन विलेपन, हळद, कुमकुम, शेंदूर, गुलाल, बुक्का वगैरे अर्पण करून नंतर वस्त्रे आभूषणे प्रदान करणे. पुष्पहार , माला अर्पण करणे , नैवेद्य म्हणून फळे, मिष्टन्ने, संपूर्ण भोजनाचे ताट अर्पण करणे वगैरे गोष्टी येतात. यात १. परमेश्वराच्या बालरुप, यौवनरुप, पितृरूप, मातृरूप, पुत्ररूप, कन्यारूप, पतिरूप वगैरे भावना मनात धरून अशी पुजा अर्चना केली जाते. २. साष्टांग प्रणाम दंडवत ३. प्रदक्षिणा ४. व्रत उपास ५. तीर्थयात्रा ६. श्रमदान (कारसेवा ) ७. नृत्य ८.मुद्रा आसन ९. अर्चना अभिषेक १०. माथ्यावर टिळा किंवा गंध लाऊन घेणे. वगैरे प्रकारची स्वत:च्या शरीरास परमेश्वराकरिता कष्टविणे अशी भावना ठेऊन ह्या स्वरुपात श्री ईश्वरपूजा केली जाते.

दुसरा प्रकार अथवा स्वरूप ‘वाचा’ म्हणजेच तोंडाने वाचेद्वारा शब्द उच्चारण करून भाषेतील स्वर, व्यंजने यांचा वापर करून ‘नाद ‘ स्वरुपाच्या साधनाने परमेश्वराची पूजा आराधना करणे अशी भावना यामागे दडलेली असते. यामध्ये खालील पद्धतींचा वापर प्रामुख्याने करण्यात येतो. १. ॐकार मंत्रोच्चारण, २. एकशे आठ वेळा, काही सहस्र, काही लक्षवेळा कोण्या मंत्राचा किवा प्रभूनामाचा जपजाप्य करणे. ३. भजन- संतजनांच्या रचना संगीताच्या चाली वर गायन करणे. ४. कीर्तन- ईश्वराच्या लिलांचे वर्णन करता करता मध्ये मध्ये संगीताच्या चालीवर प्रसंगानुरूप लीला रचना गाणे. या सर्व प्रकारांच्या मध्ये स्पष्ट उच्चार, ध्वनी , कंपने यांची जाण असणे आवश्यक असते.

तिसरे सर्वात महत्वाचे आणि उच्च पातळीवरील स्वरूप म्हणून ‘ मानस’ पूजा हा आराधना प्रकार मानण्यात येतो. याचेही काही पोट प्रकार आहेत. मानस पूजेस सर्व प्रकारातील श्रेष्ठ स्वरूप म्हणून मानल्या जाते. ही पूजा कोठल्याही बाह्य भौतिक साधंनांच्या शिवाय केल्या जाते. जसे की फुले, मूर्ती, दिवा, नैवेद्य वगैरे वगैरे. ह्यात पूजा करणारा अत्यंत एकाग्रतेने आपल्या आराध्य दैवताची मानस प्रतिमा हृदयात धारण करून मन त्या प्रतिमेवर केन्द्रित करून मनातल्या मनातच त्याची तरल मानसिक तरंगांच्या द्वारे आपल्या भावना त्या ईश्वराच्या ठायी अर्पण करतो. काही काही उपासक मनातच मानसिक फळा फुलांनी, मानसिक जल, दिपक खरेच आहेत अशा भावनेने मनातच त्याची पूजा बांधतात. या स्वरूपाचे महत्वाचे उपप्रकार म्हणजे

१. सात्विक पूजा: यात कोणत्याही प्रकारच्या फळाची, इच्छापूर्तीची अपेक्षा न ठेवता ईश्वरास केवळ तूच या विश्वाचा कर्ता धर्ता आहेस म्हणून तुझ्या श्रेष्ठत्वास प्रणाम. या एकाच भावनेने ही पूजा केली जाते.

२. राजस पूजा : धन, संपत्ती ,मान-सन्मान, अधिकार प्राप्ती करीता मनातल्या मनात ईश्वराची अतीव स्तुती, गुण गौरव, विनंती, दया याचना करून आपले ईप्सित साध्य करण्या करीता ह्या स्वरूपाची पूजा केली जाते. या प्रकारेच राक्षसांनी विविध वरदाने मागितली होती असे पुराणात सांगतात. त्यासाठी तेथे ‘तप केले’ हा शब्द वापरला असे दिसते.

३. तामसी पूजा : तामसीक प्रवृत्तीचे लोक आपल्या दुष्ट कामना व उद्देश पूर्ती साठी उग्र रूपात भूत, प्रेत ,पिशाच्य असल्या नीच स्तरातील शक्तींची पूजा करतात असे मानले जाते. परंतु कोणताही खरा धर्मग्रंथ ह्याची पुष्टी करत नाही. कारण सगळे धर्मग्रंथ केवळ परमेश्वरालाच शक्ती मानतात. त्यांच्या नुसार ह्या निम्न शक्तींचे अस्तित्वच नाही. उपरिनिर्दिष्ट पूजेची किंवा आराधनेची स्वरूपे ही मूळ किंवा बेसिक स्वरूपे आहेत. परंतु आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून बर्‍याच लोकांनी या मूळ तीन स्वरूपांच्या उपप्रकारांची एकमेकात सरमिसळ करून वेगवेगळ्या चालीरीती, परंपरा, रूढी असली नावे देऊन शेकडो प्रकारांच्या पूजा पद्धती स्थापित केल्या आणि त्यांचे सर्रास प्रयोग सुरू आहेत.

डॉ. अविनाश प. परांजपे.
वानाडोंगरी, जि.नागपूर
====≠====

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 8 1 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे