Breaking
कृषीवार्ताचारोळीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसंपादकीयसाहित्यगंध

“टाहो म्हणजेच काळजाच्या आतून येणारा वेदनेचा हंबरडा”; स्वाती मराडे

'गुरूवारीय चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 6 2 8 1 7

“टाहो म्हणजेच काळजाच्या आतून येणारा वेदनेचा हंबरडा”; स्वाती मराडे

‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

वाळलेलं शेत, मान टाकलेलं पीक, आणि हातात डोकं धरून बसलेला बळीराजा (राजा की परिस्थितीचा बळी ? ) हे केवळ चित्र नाही, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा आरसा आहे. पिकाने मान टाकलीय पण कंबरडं त्याचं मोडलंय, पीक जरी सुकलं‌ असलं तरी स्वप्न त्याचं करपलंय. आता करतोय तो अश्रूंचं सिंचन.. बाहेर पडतंय त्याचं आक्रंदन. पण; काळजातल्या त्या ओलाव्याने पीक तरारेल काय? नाही ना.. त्यासाठी पाऊसच हवा.

पण असा कसा हा पाऊस.? कोसळला तर बेफाम होतो नाहीतर अगदीच दडी मारतो. कुठे गेले ते‌ घन…? घन‌‌ म्हणू की घण..! नेहमीच तडाखा देणारा. पेरलं होतं स्वप्न त्यानं, काळ्या मातीमध्ये, स्वप्नांचं नि भविष्याचं, बीज रोवलं होतं त्यामध्ये. आभाळाने दगा दिला, पावसाने पाठ फिरवली,‌ चिंतेच्या ओझ्याखाली, कंबर त्याची मोडली. ओंजळीत लपवतोय, आसवांचा पूर.. जगाला पोसणारा बाप, आज झालाय मजबूर.

हातात डोकं धरून बसलेला तो शेतकरी.. व त्याचा तो मूक टाहो..!! आजच्या महाराष्ट्रातल्या लाखो बळीराजांची व्यथा आहे. त्याच्या तोंडून शब्द फुटत नाहीत, पण त्याची पाठ, त्याची वाकलेली मानच सांगते – हा आहे ‘टाहो’. “टाहो म्हणजे वेदनेचा असा हंबरडा, जो काळजाच्या आतून येतो”. ते केवळ रडणं नसतं, ती आर्तता असते. शेतकरी कधीच सहजासहजी रडत नाही. तो ऊन, वारा, पाऊस झेलत उभा असतो. पण जेव्हा त्याच्या डोळ्यादेखत त्याने लेकरासारखं वाढवलेलं पीक मरतं, तेव्हा त्याचा बांध फुटतो. चित्रातला तो टाहो याचाच आहे. कसंबसं भांडवल उभारून बी-बियाणं आणलं, खत टाकलं, रात्रंदिवस पाणी दिलं. हिरवं स्वप्न पाहिलं, पण निसर्गाने दगा दिला. कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ.. हातात उरतं फक्त वाळलेलं गवत आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर.

चित्रातील तो शेतकरी आपले अश्रू लपवतोय. कारण शेतकरी रडला तर कुटुंब कसं उभं राहणार? तो जगाचा पोशिंदा आहे, पण आज तोच अनेक स्वप्नांच्या बाबतीत उपाशी आहे. हीच तर शोकांतिका आहे. सरकार मदत जाहीर करतं, पंचनामे होतात, पण तोपर्यंत बळीराजाच्या डोळ्यातील स्वप्न विझून गेलेले असते. त्याला सहानुभूती नको असते. हवी असते ती निसर्गाची साथ, हमीभाव नि सन्मान. जगाचं पोट पोसणारा तो मात्र याबाबतीत कमनशिबीच ठरतो. सदान् कदा निसर्ग हुलकावणी देतच आहे. हमीभाव मिळेलच याचीही खात्री नसते अन् कार्पोरेट जगाला त्याच्या कष्टाच्या, कामाची किंमतही नाही.

आज ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी आलेले चित्र मनात वेदनेची कळ निर्माण करणारे‌. यावर्षी असलेलं दुष्काळाचं सावट व शेतकऱ्याची व्यथा नजरेसमोर उभारली. कवीमन हळहळले नि शब्दातून पाझरले. अनेक रचना मनात आह निर्माण करणाऱ्या. खरेतर व्यथा मांडण्यासाठी अनेकानेक रचना साकार झाल्या. आपल्या या संवेदनास सलामच. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/ लेखिका
©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 8 1 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे