किल्ले प्रबळगड
किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड हा रायगड जिल्ह्यातील माथेरान डोंगर रांगेतील एक किल्ला आहे. हा किल्ला मुंबई-पुणे हमरस्त्यावरून दिसतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे. तसेच जवळच असलेला इर्शाळगड व उत्तरेस कलावंतीण शिखर आहे. याची उंची २३०० फूट असून गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला असल्याने चढाईची श्रेणी कठीण आहे. उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी असावा.
किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरून त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी या किल्ल्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले ‘मुरंजन’. बहामनीच्या काळात हा किल्ला आकारास आला असावा.
गडावर जाण्यासाठी पनवेल शहरातून खाजगी वाहनाने शेडुंगमार्गे अर्ध्या तासात गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकुरवाडीत पोहचता येते. ठाकुरवाडीतून एक प्रशस्त मळलेली वाट प्रबळगडाच्या माचीवर असलेल्या ठाकुरवाडी ह्या छोट्या वस्तीवर जाते. ही वस्ती माची प्रबळगड या नावाने ओळखली जाते.
माचीवर प्रवेश करताना वाटेवर भग्न दरवाजाचे अवशेष, दगडात कोरलेली गणेश मूर्ती आणि हनुमान मूर्ती दिसून येतात. प्रबळगडचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. गडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच तीन पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत. मात्र ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी सोबत पाण्याच्या बाटल्या घेणे आवश्यक आहे. प्रथम इंग्रजांनी प्रबळगडचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून करण्याचा विचार केला होता मात्र पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे तो विचार मागे पडला. गडावर तीन चार इमारतींचे अवशेष आहेत.
घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत. त्यामुळे वाटाड्या सोबत असावा. गडावरून माथेरानचे विविध पाँईट फार सुंदर दिसतात. गड सध्या पर्यटनस्थळ बनला असून देशातील व देशाबाहेरील बरीच लोक ही महाराष्ट्राची ऐतिहासिक संपत्ती पाहण्यासाठी येत असतात. गडावर चढण्याच्या पहिल्या टप्प्यावर एक ढाबा असून तिथे जेवणाची व राहण्याची उत्तम सोय असते, त्यामुळे पर्यटन प्रेमींची संख्या वाढत चालली आहे.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.
==========



