नागपूरचे ज्येष्ठ कृषी अभ्यासक अमिताभ पावडे यांचे अपघाती निधन
जिल्हा प्रतिनिधी
नागपूरचे ज्येष्ठ कृषी अभ्यासक अमिताभ पावडे यांचे अपघाती निधन
नागपूर: (दि १९) ज्येष्ठ कृषी अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्ते अमिताभ मोतीरामजी पावडे यांचे आज (सोमवार, १८ ऑगस्ट) अपघाती निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते.
दुपारी धंतोली येथील त्यांच्या राहत्या घराजवळ दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला. त्यांना तातडीने धंतोलीतील इस्पितळात दाखल करण्यात आले; मात्र अती रक्तस्त्रावामुळे त्यांचे निधन झाल्याचे समजते. बुधवार, २० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मोक्षधाम घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी संजीवनी, परदेशात स्थायिक असलेली मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे.
अल्प परिचय:
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोतीरामजी पावडे आणि संस्कृत पंडिता डॉ. कुमुद पावडे यांचे ते सुपुत्र होते. अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. नॅशनल ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे माजी कार्यकारी अभियंता असलेले अमिताभ पावडे हे जवाहर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. तसेच ते जनमंचचे सक्रिय सभासद होते. शेतकऱ्यांच्या समस्यांवर लढा देणारा भूमीपूत्र व हाडाचा शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती.
अमिताभ पावडे यांचा अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ, पूर्वोत्तर प्रांतातील २४ विमानतळे तसेच भोपाळ व इंदूर विमानतळाच्या बांधकामात सहभाग होता. रनवे, टर्मिनल, शासकीय व निवासी इमारती, टॉवर्स, रडार, टॅक्सीवे आदी बांधकामातही त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. १९९८ पासून ते शेतकरी व चळवळीतील कार्यकर्ते म्हणून सक्रिय झाले. शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक जागरूकता कार्यक्रम राबवले. प्रयोगशील शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख होती.



