ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये विधी साक्षरता शिबिराचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज मिडीया
अलिबाग : (२२ जुलै २०२६) जनता शिक्षण मंडळ संचलित ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज, अलिबाग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड–अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी महाविद्यालयाच्या जयवंत केळुसकर सभागृहात विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले.
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी आयोजनासाठी मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. या शिबिरात बालकांसाठी सुलभ कायदेशीर सेवा योजना–२०२४, डॉन (DAWN)–२०२५ : अमली पदार्थमुक्त भारत अभियान, कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, २०१३ (POSH Act) तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (POCSO Act), २०१२ या विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
श्रीमती रेवती कंठे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड- अलिबाग यांनी बालकांसाठी सुलभ कायदेशीर सेवा योजना–२०२४ तसेच कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, २०१३ (POSH Act) या विषयांवर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना कायदेशीर हक्क, महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या तरतुदी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध मोफत कायदेशीर सहाय्याची माहिती दिली. ॲड. चंद्रशेखर कामथे, प्रमुख, LADCS यांनी डॉन (DAWN)–२०२५ : अमली पदार्थ मुक्त भारत अभियान या विषयावर मार्गदर्शन करत अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यावरील कायदेशीर कारवाई तसेच युवकांनी व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी घ्यावयाची जबाबदारी याविषयी सविस्तर विवेचन केले. ॲड. विक्रांत पाटील, पॅनेल वकील यांनी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (POCSO Act), २०१२ या विषयावर मार्गदर्शन करत बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी, गुन्ह्यांचे स्वरूप, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि समाजाची जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची मान्यवरांनी समाधानकारक उत्तरे देत शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संदीप घाडगे यांनी केले.महाविद्यालयाच्या विधी सहाय्य समिती मार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रभारी प्राचार्या डॉ. नीलम हजारे आणि IQAC समन्वयक प्रा.नीलम म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी प्रा.चिन्मय राणे,प्रा.पियुषा पाटील, प्रा.कौशिक बोडस, प्रा.सुरज पुरी, प्रा.हर्षदा चेवले, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



