“संघटन शक्तीचा उद्गार म्हणजेच.. हक्क अधिकारासाठी आंदोलनाचा एल्गार”; विष्णू संकपाळ
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

“संघटन शक्तीचा उद्गार म्हणजेच.. हक्क अधिकारासाठी आंदोलनाचा एल्गार”; विष्णू संकपाळ
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की, “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या वाक्याचा बारकाईने अभ्यास केल्यास यातला मतितार्थ लक्षात येतो. सर्वप्रथम “शिका” म्हणजेच शिक्षणाचे महत्त्व जाणून घ्या त्याशिवाय स्वतःची किंमत कळणार नाही. तुमच्यावर खरेच एखाद्या घटकांकडून अन्याय होत असेल तर त्याची जाणीव शिक्षणानेच होऊ शकते. एकदा जाणीव झाली की, संघटित होऊन अशा अन्यायाचा प्रतिकार करण्याचा संदेश बाबासाहेब देतात. कारण संघर्ष केल्याशिवाय कोणतीच गोष्ट सहजासहजी उपलब्ध होत नसते. प्रत्यक्ष अन्याय करणार्या व्यक्ती अथवा संबंधित घटकापेक्षा, तो अन्याय सहन करणारा पण तितकाच दोषी आहे.
आजकाल देशात विद्यार्थी वर्गाला आंदोलने करण्याची वेळ यावी हीच मुळात दुर्दैवाची गोष्ट आहे. याची पाळेमुळे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास शिक्षणाचे झालेले बाजारीकरण, खाजगीकरण आणि मक्तेदारी कारणीभूत ठरत आहे. ज्यातून शिक्षणाचा खरा दर्जा दुर्लक्षित होऊन धनिकधार्जिण्यांचा दबदबा वाढत आहे. नीट, यूपीएस, एमपीएस, सारख्या परीक्षेचे पेपर फुटणे एक नियोजनबद्ध गुन्हा आहे. जो अनेक वर्षे अनेक परीक्षेच्या संदर्भात पद्धतशिरपणे चालू आहे. मात्र एकाही गुन्हेगाराला कठोर शासन झाल्याचे ऐकीवात नाही. मात्र मेहनती विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ होत आहे. हे दुष्टचक्र रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनाच रस्त्यावर उतरावे लागते आहे. हीच आधुनिक शिक्षण पद्धतीची शोकांतिका आहे.
आता ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी दिलेल्या चित्राकडे वळूया. चित्रात एक विद्यार्थ्यांचे आंदोलन दिसत असून, त्यांच्या हातात मागणीचे फलक दिसत आहेत. या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता ५आॅगष्ट २०२६ रोजी शासनाने आदिवासी वसतीगृहासंदर्भात एक जी आर काढला होता. त्यात असा उल्लेख होता की, वसतीगृहातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात, उपोषण, मोर्चात सहभाग घेता येणार नाही. तसेच पत्रकारांशी कोणतेही भाष्य करता येणार नाही. शिवाय वसतीगृह प्रवेशाची वयाची अट २६ वर्षे करण्यात आली होती. या सर्व अटी संबंधित विद्यार्थ्यांना जाचक वाटत होत्या. त्या रद्द करण्यासाठी सर्वानी संघटित होऊन कायदेशीर मार्गाने खूप मोठे आंदोलन उभे केले. तब्बल दिड एक महिने चाललेल्या आंदोलनाची दखल शेवटी शासनाला घ्यावीच लागली. आणि अन्यायकारक जी. आर. मागे घ्यावा लागला.
आंदोलन शेतकरी, कामगार, पिडित, वंचित अथवा आदिवासी विद्यार्थ्यांचे असो. शांततापूर्ण मार्गाने केलेल्या आंदोलनाची दखल घ्यावीच लागते. आपल्या मागण्या रास्त असतील तर न्याय नक्कीच मिळतो. संविधानाने जसे हक्क अधिकार दिलेत. तसेच कर्तव्य सुद्धा सांगितले आहे. आंदोलन करताना शासकीय मालमत्ता, व्यक्ती यांना लक्ष्य करता कामा नये. स्थावर जंगम मालमत्तेला हानी पोहचवता कामा नये. आणि सामाजिक सौहार्द धोक्यात येता कामा नये.
एका ज्वलंत विषयावर हायकूच्या माध्यमातून भाष्य करण्याची संधी आ. राहुल दादांनी उपलब्ध करून दिली. त्यादृष्टीने आपल्या कल्पकतेचे दर्शन होणे अपेक्षित आहे. जाचक अटी, विद्यार्थ्यांची मानसिक, अर्थिक कुचंबणा, शासकीय उदासीनता या मुद्द्यावर भाष्य होणे आवश्यक आहे.. अनेकांनी खूपच छान हायकू लेखन केले आहे. सर्वांच्या भावी लेखनासाठी खूप सार्या शुभेच्छा..!!
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य, सहप्रशासक, परिक्षक मराठीचे शिलेदार समूह



