0
4
8
2
9
0
श्रावणधारा
आला श्रावण पाऊस, मनी आनंदी आनंद।
धरणीला चिंब करी , दरवळतो सुगंध।।
फुलझाडे व्रुक्षवल्ली , जिवा हर्षाचा सोहळा।
जसा बहरुन आला, सुखी जीवनाचा मळा।।
धरा सजली नटूनी , रुप मनोहर भासे।
ढगाआडून पाहून, रवी मनामंधी हासे।।
टिळा चंद्राचा लावून , भांगी चांदणे भरते।
इंद्रधनू गळसूरी , कंठी सौभाग्य शोभते।।
मनी अधीर अधीर,होते व्याकुळ अंतरी।
विज कडाडून जाते,आस मिलनाची उरी।।
असा पाऊस बेधुंद , रातदिन बरसतो।
ऋतू हिरवा करुनी , रंग ह्रदयी भरतो।।
पशुपाखरं हर्षाने , विहारती रानोवनी।
सारे घेई गळाभेट, आतुरले मनोमनी।।
रिमझिम रिमझिम ,सरी येते आणि जाते।
झिम्मा फुगडीचे गाणे, उन कोवळेच गाते।।
नदी नाले ओसंडून, वाहते डोंगर दरी।
शेत शिवार पाहून ,खूश होतो शेतकरी।।
सदा अशाच जीवनी, झरु दे श्रावणधारा।
या झाडी वस्तीत नाचो,मोर फुलूनी पिसारा।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा
=========
0
4
8
2
9
0



