सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प सेवेचा रौप्यमहोत्सवी सोहळा संपन्न
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प सेवेचा रौप्यमहोत्सवी सोहळा संपन्न
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे.दि.9 (प्रतिनिधी) येरवडा भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत थोर समाजसेवक ‘स्व.नाना पालकर स्मृती समिती’ अंतर्गत स्वराज्याचे सुराज्य करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ” सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प” ह्या सेवाकार्यास यंदा 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त रौप्यमहोत्सवी सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला. पद्मश्री अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले डाॅ. कॅप्टन सी.एम.चितळे यांनी. प्रमुख पाहुणया मधुरा पुणेकर यांच्यासह व्यासपीठावर सुराज्य प्रकल्पाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या रौप्यमहोत्सवा निमित्त कार्यकर्त्यांचा खास एकात्मता उत्सव आयोजित करण्यात आला. येरवडा भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा प्रकल्प ऊभा राहताना सुरवातीच्या काळातला कठीण संघर्ष, त्यावर मात करून लोकसंपर्क व स्थानिकांच्या सहकार्यातून पुढे विस्तारत गेलेल्या कार्याचा आलेख मा॔डणारे , प्रथम अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
वस्तीतील लोकांशी संपर्क, सुसंवाद व सहवास या त्रिसूत्रीतून सुराज्य प्रकल्पाचे निरंतर सेवाकार्य आज जनमानसात स्थान मिळवून लोकप्रिय झाले आहे. महिला, तरूण व कुमार वयीन मुले-मुली यांना केंद्रस्थानी मानून स्वयंरोजगार, शिक्षण व आरोग्य याद्वारे सुरू असलेल्या या सेवा कार्याचे महत्त्वं परिसरातील सर्वांना सुपरिचित आहे. यांच्यापैकी किती तरी वंचित मुले मुली आज उच्च पदी पोहचले असून आपल्याबरोबर इतरांचेही आयुष्य सावरण्यात यशस्वी होत आहेत. संस्थेच्या या रचनात्मक व विधायक कार्यात झोकून देऊन काम करणारे सध्याचे अध्यक्ष- नरेश करपे, संयोजक- विजय शिवले , मार्गदर्शक प्रदीप नाईक यांचे व त्यांच्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांचे निस्वार्थ कार्य तळागाळात पोहचलेले पाहून कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन सी.एम.चितळे व प्रमुख पाहुणया मधुरा पुणेक यांनी आपल्या मनोगतात मनःपूर्वक गौरव करून संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास येरवडा भागातील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, महिला व मुले तसेच परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक आवर्जून उपस्थित होते.



