सुखाची चाहूल देणारा.. अंतरपाट”; स्वाती मराडे
गुरुवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“सुखाची चाहूल देणारा.. अंतरपाट”; स्वाती मराडे
गुरुवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
त्याला ती दिसू नये म्हणून मुद्दाम एक पडदा मध्ये धरला होता. एकतर सर्वांची नजर चुकवून पहायचे आणि त्यातही हा पडदा. थोडी चरफडच झाली त्याच्या मनाची. पण तेवढ्यात स्वस्तिश्री.. हे शब्द घुमले नि मग लक्षात आले. बस्स आता काहीच क्षण आणि मग ती माझीच होणार अगदी कायमची. या विचारासरशी तिच्याही गालावर गुलाब फुलले. अंतरपाट दूर झाला नि एकमेकांच्या गळ्यात हार घालताना दोघेही थोडे झुकले. जणू तुझ्यासाठी, तुझ्या मताचा आदर करण्यासाठी मी प्रसंगी नमते वागेन. हे लिहिताना मला मात्र ‘प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश..’ या ओळी आठवल्या.
अंतर.. मन व पट म्हणजे पडदा. मनावरचा पडदा दूर करून मनापासून प्रिय व्यक्तीचा स्विकार करायचा. हे पटवून देण्यासाठीच अंतरपाटाचे प्रयोजन असते की काय? हा पडदा दूर होताच कुठलाही आडपडदा न राहता एक नाते जन्मभरासाठी जुळते नि कायमचे आपलेसे होऊन जाते. अग्नी, सप्तपदी, आप्त, सगे व ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह होतो तेव्हा आणखी एक महत्त्वाचा साक्षीदार तिथे असतो तो म्हणजे ‘अंतरपाट’. तो विवाहविधीत मंगलाष्टके होताना वधूवरांच्या मध्ये धरलेला असतो. मंगलाष्टक होताच हा अंतरपाट दूर होतो. यावेळी अनेक नवी नाती निर्माण होतात. दोन मने, दोन कुटुंबे व सगेसोयरे यांचे ऋणानुबंध जुळतात.
काल आणि आज यामध्ये, एका अंतरपाटाचं अंतर
तो क्षणात दूर झाला नि जुळले नाते, जन्मजन्मांतर..!
“सुखाची चाहूल देणारा हा अंतरपाट.. हा केवळ पडदाच नव्हे तर संयम शिकवणारा एक गुरुही”. स्वस्तिकरूपात त्यावर एक मांगल्यही कोरलेले असते. जमलेल्या मंडळींचे आशीर्वाद व शुभेच्छांचा वर्षाव झाल्यानंतरच वधूवरांनी त्या मंगलतेने भारलेल्या वातावरणातच एकमेकांना पहावे हा हेतूही कदाचित अंतरपाट धरण्यामागे असावा. याचवेळी तो अंतरपाट अनुभवत असतो वराच्या जीवनाला एक नवे वळण देणारा, तर वधूसाठी एकाचवेळी संमिश्र भावनांचे मनात आंदोलन उमविणारा क्षण. तिच्या मायबापाच्या उरातील संमिश्र भावना, एका डोळ्यात हसू व दुसऱ्या डोळ्यात लेक परकी होणार याचा गहिवर मांडणारा क्षण.
आज ‘गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेसाठी’ आलेले चित्र लग्नमंडपाचे, वधूवराच्या मध्ये असणाऱ्या अंतरपाटाचे व त्यांच्या चेहऱ्यावरील भाव दाखवणारे, वऱ्हाडी मंडळींच्या चेहऱ्यावरील गोड हास्य दाखवणारे… ‘अंतरपाट’ हे शीर्षक घेऊन. हेच सर्व क्षण टिपत लेखणीतून व्यक्त होत आपण सर्वांनी केलेल्या रचना मनभावनच. या अनुषंगाने समर्थ रामदास ते आधुनिक काळातही काही ठिकाणी होत असलेल्या बालविवाहविरूद्ध लेखन करत समयसूचकता दाखवली. हळवे क्षण टिपत, गोड नाती जपत.. केलेली शब्दपेरणी अशीच बहरत राहो. या सदिच्छांसह सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
सौ.स्वाती मराडे,इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक,कवयित्री, लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



