
0
4
8
2
9
7
महाराज पुन्हा येऊ नका…!
राजं पुन्हा जन्माला या म्हणून
गगनभेदी ललकारी घुमते
डीजेच्या कर्णकर्कश तालावर
आजची बेधुंद तरुणाई थिरकते
रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या
माताभगिनींची छेड काढली जाते
स्वतःला शिवभक्त म्हणणाऱ्यांच्या
विचारांची गती षंढ का होते
शेतकरी कष्टकरी बळीराजा
आज देशोधडीला लागतोय
पाषाणह्रदयी मायबाप सरकार
कर्जमाफीचे मृगजळ दाखवतोय
पूर्वी फितूर शोधावा लागायचा
आता मात्र गल्लोगल्ली पडलेत
स्वार्थापायी लाचारी पत्करणाऱ्या
नामर्दांचे जणू मेंदू सडलेत
महाराज पुन्हा येऊ नका….
म्हणायला मन धजावत नाही
पण स्वराज्यात मातलेला स्वैराचार
तुमच्या मनाला पटणार नाही….
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
0
4
8
2
9
7



