“समाजप्रबोधनाचे काम करणा-या संस्था चिरायू होतात”; – प्रदीप रावत
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
“समाजप्रबोधनाचे काम करणा-या संस्था चिरायू होतात”; – प्रदीप रावत
“ओजाशंकर” सह ग्रंथोत्तेजक पुरस्कार प्रदान
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे.: (प्रतिनिधी) “जगाच्या पाठीवर आपला हिंदू धर्म सर्वात उदार मतवादी असून बदलत्या काळाबरोबर हिंदू धर्म अधिकाधिक प्रगत होत गेला. याची अनेक उदाहरणे आपल्या सामाजिक इतिहासात ठळकपणे दिसतात. समाजाच्या प्रगतीचा हा बदलता पट जतन करून ठेवण्याचे कार्य ‘ग्रंथोत्तेजक’ संस्थेसारख्या प्रतिष्ठीत संस्था गेली अनेक वर्ष करीत आहेत. अतिशय निरलसपणे हे मोलाचे कार्य करणा-या अशा संस्था म्हणूनच शतायू होतात आणि चिरायू ठरतात.” अशा शब्दात माजी खासदार प्रदीप रावत यांनी ग्रंथोत्तेजक संस्थेचा गौरव केला. संस्थेच्या ग्रंथपुरस्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ संशोधक गो. बा. देगलूरकर , अरविंद नवरे, डाॅ. अरविंद चाफेकर, आनंद हर्डीकर हे मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार समारंभ कार्यक्रमात सुधीर जोगळेकर लिखित “ओजाशंकर” या पुस्तकास ॲड. वा. स. ओक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ईशान्य भारतात आदिवासी वाड्यावस्त्यांवर शाळांची स्थापना करून “शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता” साध्य करणा-या शंकर दिनकर काणे तथा भैय्याजी यांचे जीवन चरित्र “ओजाशंकर” हे पुस्तकातून मांडण्यात आले असून ईशान्य भारताचे एक आगळे चित्र यातून समोर आले आहे.
या पुस्तकास पुण्यातील प्रतिष्ठीत अशा ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार प्राप्त झाल्याने सुधीर जोगळेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात डाॅ अरविंद चाफेकर यांनी संस्थेची माहिती व पुरस्कारामागची भूमिका मांडली. आनंद हर्डीकर यांनी व पुरस्कार प्राप्त लेखकांचा परिचय करून दिला. अरविंद नवरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले.
कार्यक्रमात श्री. चंद्रकांत शहासने व श्रीमती भारती पांडे यांचा विशेष साहित्यिक योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. एअर मार्शल भूषण गोखले लिखित “आकाशझेप” या पुस्तकासह एकूण 38 पुस्तकांना यंदा ग्रंथोत्तेजक संस्थेने पुरस्कार देऊन गौरवले असल्याची माहिती संस्थेच्या विमलाताई आहिरे यांनी दिली.



