जी. एम. वेदक महाविद्यालयात NSS स्वयंसेवकांसाठी अभिमुखता कार्यक्रम उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

जी. एम. वेदक महाविद्यालयात NSS स्वयंसेवकांसाठी अभिमुखता कार्यक्रम उत्साहात संपन्न
राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे उत्कृष्ट माध्यम
रायगड जिल्हा समन्वयक डॉ. प्रविण गायकवाड यांचे प्रतिपादान
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग/ तळा, दि. ३० सप्टेंबर २०२६ : श्री. गोपीनाथ महादेव वेदक प्रतिष्ठान संचलित जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स, तळा येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने नव्याने सहभागी झालेल्या NSS स्वयंसेवकांसाठी NSS अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण, संघभावना आणि समाजसेवेची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी NSS रायगड जिल्हा समन्वयक डॉ. प्रविण गायकवाड (जे. एस. एम. कॉलेज, अलिबाग) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन बंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. नसरीन शेख यांनी प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रविण गायकवाड यांचा परिचय करून दिला. त्यानंतर प्राचार्य डॉ. सचिन बंगाळे यांच्या हस्ते डॉ. गायकवाड यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शन करताना डॉ. प्रविण गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची संकल्पना, उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि स्वयंसेवकांची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. NSS ही केवळ सामाजिक उपक्रमांची योजना नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. NSSच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव, संघभावना, शिस्त, जबाबदारीची भावना आणि समाजसेवेची वृत्ती विकसित होते, असे त्यांनी नमूद केले.
तसेच वर्षभर राबविण्यात येणारे सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, आरोग्य, जनजागृती व ग्रामविकासाशी संबंधित विविध उपक्रम, स्वयंसेवकांचे कर्तव्य, उपक्रमांची शास्त्रीय पद्धतीने नोंद ठेवणे तसेच NSSच्या विविध उपक्रमांची प्रभावी प्रसिद्धी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. सचिन बंगाळे यांनी NSS स्वयंसेवकांनी महाविद्यालयीन शिक्षणासोबतच समाजाच्या गरजा समजून घेऊन सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. NSSच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजाशी प्रत्यक्ष जोडले जाण्याची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित करण्याची अमूल्य संधी मिळते. या संधीचा प्रत्येक स्वयंसेवकाने सकारात्मक उपयोग करून समाजासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नंदकुमारजी वेदक, संस्थेचे सचिव श्री. उन्मेशजी वेदक, महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य तथा रायगड भूषण श्री. पुरुषोत्तम मुळे, तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व द. ग. तटकरे महाविद्यालय, तळा चे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अभिमुखता कार्यक्रमास महाविद्यालयातील NSS स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. पारशुराम अभंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
“सेवेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजाच्या प्रगतीत योगदान” या भावनेने प्रेरित झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.



