Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

बिघडणा-या तरुणाईपुढचा प्रश्न, कसा असावा व्हेलेंटाईन?

अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर जि अहिल्यानगर

0 4 8 2 9 7

बिघडणा-या तरुणाईपुढचा प्रश्न, कसा असावा व्हेलेंटाईन?

जानेवारीतल्या संक्रांतीचं ब्रीद तिळगुळ घ्या गोड बोला हवेमध्ये विरलं. फेब्रुवारीच्या प्रेम स्पर्शाने तरुणाईला भुलवलं. तरुणाईला ज्या प्रेम महिन्याचं वेड लागलेलं तो प्रेमाचा महिना सुरू झाला आणि ‘डें चा झाला सुकाळू’. आज काय तर रोज डे, उद्या काय तर हग डे,परवा काय तर,, टेडी डे……. आणि या सर्वांची नोंद ही फक्त तरुणाईपर्यंत नाही, तर प्रसारमाध्यमांनी ही ती अतिशय सजवून बातमीमध्ये गुंफली होती, टीव्हीवर मी हेच पाहत होते… आणि आश्चर्य वाटत होतच तेवढ्यात ‘गुलाबी साडी अन् लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ’. असं गुणगुणत माझी नात माझ्या साड्यांच्या कपाटाकडे वळली. तशी मी तिला थांबवलं.. अग काय हे…? जरा भान ठेव… आजोबा आहेत पलीकडे…! ऐकतील ना…! तर मला म्हणाली, अग आजी, त्यात काय एवढं… मी गाणं तर म्हणतेय…!

बरं ते जाऊ दे, मला तुझी अशी एकदम भारी साडी दे..उद्या कॉलेजमध्ये ‘साडी डे’ आहे.आम्ही सर्व मैत्रिणींनी छान छान पारंपरिक साड्या घालायच्या ठरवल्यात… साडीला मॅचिंग दागिने दे, बांगड्या दे…असं बरंच काहीतरी बोलत होती.तिचं ते बोलणं आणि तिला मध्येच थांबवत मी तिला म्हटलं,, अगं साडी डे तर 21 डिसेंबरला असतो….. पण तेही तिला कुठलं पटतंय..! उलट माझ्याकडे आश्चर्याने पहात ती मला म्हणाली, अग आजी, तुला नाही माहित… तुला नाही कळत काही…साडी डे तर उद्या आहे.. मी पण कुठे तिच्या नादी लागायचं म्हणून विषय सोडून दिला. आणि तिला माझ्या कपाटाकडे जाता जाता अडवत मी स्वतः जाऊन तिला एक सुंदर अशी काठपदराची लाल साडी काढून दिली आणि तिला म्हटलं ही साडी नेस.. अंबाडा घाल आणि मग बघ..

अंबाडा केसांचा त्यावर गजरा
माळलेला मोगरा खेचतोय नजरा
करून शृंगार अशी तू नटणार
नजरेवर नियंत्रण कुणी का ठेवणार

असं होईल… असं काही बोलले खरं पण….पटकन भानावर आले.. आणि माझीच मला लाज वाटली आणि वाटलं… अगं बाई, काय हे…! खरंच ‘साठी बुद्धी नाठी’ असंच झालय माझं.. असो.. तर असं हे डें चं फॅड.. उद्या साडी डे,टेडी डे.., रोज डे.. आणि या सर्व डे चा राजा म्हणजे ’14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे”… ‘प्रेम दिवस’, ‘प्रेमाचा दिवस’!..

बापरे अंगावर शहारे आले.. हीच का ती संस्कृती?आणि हेच का आपले संस्कार….? आपल्या पिढीतले एकादशी, चतुर्थी, अष्टमी, पंचमी हे वेगवेगळे दिवस तर आत्ताच्या पिढीच्या खिजगणतीत ही नाहीत पण मातृ डे, पितृ डे याचेही यांना विशेष महत्त्व वाटत नाही. मी अशी विचारत असतानाच माझी नात मला व्हॅलेंटाईन डे चे महत्व सांगू लागली. अग आजी ऐक, व्हॅलेंटाईन म्हणजे प्रेमाचा संदेश पाठवणार पत्र किंवा भेट कार्ड.. हा दिवस म्हणजे रोमँटिक डे असतो. असं उगीचच बरळत होती. मला माहित असलेल्या व्हॅलेंटाईन डे चं तिने चांगलंच भरीत बनवलं होतं. त्याचा खरा अर्थ तर बाजूला पडला होताचं..! असं वाटलं की हेच डे तर जबाबदार नाहीत नाही या तरुणाईला बिघडवण्यासाठी.

‘प्रेम’ या अडीच अक्षरामागे धावणारी ही पिढी तारुण्य सरलं की मग मात्र प्रेमाला पारखी होतात..आर्ची परश्या सारखा आयुष्य वाटायला येतं..पण हे कोण आणि कसं समजावणार? फेब्रुवारी महिन्यातल्या ‘व्हॅलेंटाईन डे’ प्राण गेलं तरी विसरला जात नाही. त्यांना कोणी सांगावं अरे खरं प्रेम हे असं नसतं.. साता समुद्राच्या पलीकडे जरी आपली एखादी प्रिय व्यक्ती असली तरी ते टिकून राहतं खरं spiritual असतं त्यासाठी दिनांची गरज नसते..पण काय बोलणार? त्यांची मती भ्रष्ट झालेली अन् आता विचार करून माझी मती सुद्धा बंद पडू लागली होती. असं वाटत होतं की,

day ही झालेत दीन
अन् भावना ही झाल्यात क्षीण…!
सुकाळ झालाय दिनांचा
दुष्काळ पडलाय प्रेमाचा

मी एवढ्या विचारात गुंतलेली असताना माझी नात साडी गुंडाळून आली सुद्धा.. साडी नेसली.. वर केस मोकळे.. ओठांना लाली आणि माझ्याकडे येतच होती. तेवढ्यात माझा छोटा नातू तिच्या कडे पाहून म्हणाला, ‘अग नखरेवाली कुठ निघाली’ घालून साडी लाली लाल.. पागल करते तुझी ही मोरनीशी चाल…’ अरे देवा, आता मात्र हसावं की रडावं अशी माझी अवस्था झाली होती. आणि कान धरून त्या सर्वांना व्हॅलेंटाईन चा अर्थ सांगण्याची वेळ आली होती.

प्रेम ही एक भावना आहे, भावनांचा संच आहे. एकमेकांबद्दल आत्मीयता, आपुलकी, आदर ठेवण म्हणजेच प्रेम असतं. कोणाला मिळवणं याला प्रेम म्हणत नाहीत तर कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणं म्हणजेच खरं प्रेम, खरा स्नेह. हाच खरा व्हॅलेंटाईन… त्याला डे ची गरज नाही प्रेम हे निरंतर असतं, चिरंतन असतं दोघे ही ऐकत तर होते पण त्यांना ते कितपत कळलं होतं माहितनाही. शेवटी नातीला थोडी घाई होती. त्यामुळे तिने या या विषयावर पडदा पडला आणि आजोबांना आणि मला पण एक एक फ्लाईंग किस देत.. I love you Grand pa, Grand maa, म्हणून निघून गेली. शेवटी काय… पालथ्या घड्यावर पाणी म्हणत आम्ही एकमेकांकडे बघून खळखळून हसलो आणि… या व्हॅलेंटाईनची संधी न दवडता.. ‘मी सोडूनी सारी लाज, त्यांना म्हणाले आज, ‘आय लव यू माय व्हॅलेंटाईन…’.

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे