Breaking
कविताक्रिडा व मनोरंजनखानदेशचंद्रपूरचारोळीदेश-विदेशनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“प्रेमाचं ऑडिट करताना हवा विश्वासाचा बॅंकबॅलन्स…!”; वैशाली अंड्रस्कर

शनिवारीय 'काव्यस्तंभ' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 8 2 9 3

“प्रेमाचं ऑडिट करताना हवा विश्वासाचा बॅंकबॅलन्स…!”; वैशाली अंड्रस्कर

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

ऑडिट… लेखापरीक्षण… अंकेक्षण… विविध संस्था, शाळा, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खाजगी प्रतिष्ठाने, व्यावसायिक यांच्या वर्षभरातील जमाखर्चाच्या ताळेबंदाची अचूकता ठरविण्यासाठी शासनाची परवानगी प्राप्त सनदी लेखापालांनी केलेले अंकेक्षण म्हणजे ऑडिट किंवा लेखापरीक्षण. अर्थात वस्तू, सेवा, त्यांचे मोल, पगार यांच्या हिशोबाचा ताळेबंद. त्याच्या अचूकतेची ग्वाही.

परंतु काल मराठीचे शिलेदार समूहात ‘प्रेमाचं ऑडिट’, हा विषय माननीय मुख्य प्रशासक राहुल दादा पाटील यांनी शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेकरीता दिला. विषय बघताच जरा कुतूहलाने हसूच आलं. ‘प्रेमाचं ऑडिट’…! वाटलं प्रेम वस्तू की पैसा ? आणि ते जर नसेल तर त्याला मोजण्याचं माप कोणतं ? जर ते मोजता येत नसेल तर त्याचं ऑडिट कसं ? कारण…एका मराठी गीतामध्ये म्हटल्याप्रमाणे….’प्रेमाला उपमा नाही…ते देवाघरचे लेणे…’, मात्र कधी चित्रपट, मालिकांतले संवाद ऐकून जरा कल्पना येते की, प्रेम हे अजरामर असतं…ते ज्या परिस्थितीत ज्यांना लाभतं त्याप्रमाणे विशाल भासतं…कुणा काश्मिरी प्रेमिकांना चिनार वृक्षांच्या पानासारखे अगणित, सागरकिनारी राहणाऱ्याला अथांग सागराप्रमाणे अमर्यादित, तर कुणी गावकुसात राहणाऱ्याला आपल्या हिरव्यागार रानाप्रमाणे टवटवीत…इथे जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणण्याऐवजी जशी सृष्टी तशी दृष्टी म्हणता येईल. आता सांगा या अशा प्रेमाचं ऑडिट कसं करायचं…?

पण आमचे शिलेदार फार हुशार….ते कुठलाही विषय असो…त्याला कवितेत नाही गुंफले तर ते मराठीचे शिलेदार कसले…? भन्नाट कल्पना आम्हा शिलेदारांच्या…कुणी म्हटले चला आज प्रेमाचं ऑडिटच करून टाकू…आनंदाचा आलेख चढवत नेऊ…तर कुणी विचारतं विश्वासाने… प्रेमाच्या ऑडिट चं ग्रहण येईल तेव्हा माझ्या पाठीशी खंबीर उभा राहशील का ?, तर कुणी म्हणतं, प्रेमाचं ऑडिट करताना तू असशील धनको तर मी असेन ऋणको…आणि अशा निर्व्याज प्रेमासाठी श्वासही गहाण ठेवीन याची हमी देतं….कुणी आईच्या मायेच्या प्रेमाचं ऑडिट कसं होईल ? असा भावस्पर्शी प्रश्न विचारतं…तर मैत्रीच्या खऱ्या दुनियेत प्रेमाचं ऑडिट असूच शकत नाही. तसं झालं तर मैत्रीच्या नात्यावरील विश्वासच उडेल असं कवीला वाटतं…अशा नातेसंबंधातील प्रेमाला ऑडिटची बाधाच नको असं बऱ्याच जणांना वाटतं… आणि खरंही आहे ते…कारण..

प्रेमाचं ऑडिट करताना….
किती प्रेम आलं किती गेलं
याचा काही हिशोब नसतो
आयुष्याचं गणित जुळवताना
खात्यातील दिखाऊ प्रेमापेक्षा
लव्ह इन हार्ट ला मोल असतं
कॅश लेजर कितीही जुळवलं
तरी व्हाउचर हरवलेलं असतं
कारण खऱ्या प्रेमाचं ऑडिट
जीएसटी बिल पुरावा म्हणून
कधी कधीच मागत नसतं..
बॅंक स्टेटमेंटच्या भरवशावर
प्रेमाचं कधी ऑडिट होत नसतं
डोळ्यांतल्या बोलक्या भावना
हेच ताळेबंद जुळल्याचं गड्यांनो
प्रतीक असतं ….प्रतीक असतं….

असं हे प्रे’माचं ऑडिट’ सुफळ संपूर्ण… सर्वांना या आर्थिक वर्षात सॉरी सॉरी प्रेम वर्षात सुखाचा ओपनिंग बॅलन्स, आनंदाची जमा, दुःखाची वजावट होऊन कॅश इन हॅन्ड सारखे लव्ह इन हार्ट राहो…अन् प्रेमाचं ऑडिट तंतोतंत जुळो…सर्वांचे अभिनंदन आणि भावी लेखणीस शुभेच्छा…!

सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे