साथ तुझी
साथ तुझी सखे लाभता
उजळून निघाले जीवन माझे
झिजलीस तू संसाराकरता
मानू किती ग आभार तुझे
पावसाळ्याच्या जून महिन्यात
आली तू माझ्या जीवनात
एकाकी जीवनात माझ्या
सप्तसुरांची लाभली संगत
चहा पोह्याच्या त्या कार्यक्रमात
गायलेले तुझे नाट्यगीत
मर्मबंधातली ठेव ही
अजून ही माझ्या ह्रदयात
नव्या नवलाईचे दिवस सरले
भांड्याला भांडे लागू लागले
वादविवाद पण रंगू लागले
तुझे मन दुखावले गेले
नोकरी आणि संसार
यात झाली तुझी ओढाताण
मदत तुला कुणाची नव्हती
अपराधी आम्ही ते सर्वजण
गंभीर माझ्या त्या आजारपणी
केली सेवा तू निष्ठेने
खरी तू सती सावित्री
प्राण हे माझे वाचवले
अन्नपूर्णा तू या घरची
सुग्रास भोजन बनवती
तुझ्या पुरण पोळीची
स्तुती सर्वजण करती
सारी किल्मिषं दूर सारुनी
संसार म्हातारपणी करु या
एकमेकांवर प्रेम करुनी
दिवस शेवटचे घालवू या
प्रवीण हरकारे
जि.अहिल्यानगर
=========



